शेतीमधून दिवसेंदिवस उत्पादन कमी निघत आहे. तुलनेने खर्च मात्र वाढत आहे. उत्पादन वाढीबरोबरच हा वाढता खर्च कमी करण्यासाठी आपल्याला पर्याय शोधावे लागणार आहेत. मिश्र पीक पद्धतीचा वापर, महागड्या खतांचा संतुलित वापर, पाण्याचे योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास करूनच पिकाचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. हे सर्व करत असताना बऱ्याच शेतकऱ्याकडून दुर्लक्षित होणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीचे आरोग्य, ढासळणारा पोत.
जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काही शेतकरी महागड्या सेंद्रिय खतांचा वापर करत आहेत. हिरवळीची खते घेत आहेत. शेणखत, मळी वापरत आहेत. यावर खर्च जास्त होतो. कमी खर्चात जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा एकमेव उपाय म्हणजे शेत जमिनीत जीप्समचा वापर करणे Use of gypsum in agriculture.
जिप्सम म्हणजे काय?
जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट(CaSO4). हे कॅल्शियम आणि सल्फर चे एक नैसर्गिक संयुग आहे. जिप्सम हे एक सर्वोत्कृष्ट भूसुधारक आहे. परंतु Use of gypsum in agriculture जिप्समच्या वापराबद्दल शेतकऱ्यांना फारशी माहिती नाही. त्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. अज्ञानीपणा किंवा माहितीच्या अभावामुळे अनेक शेतकरी याचा वापर करत नाहीत. आपण ज्यावेळी कोणत्याही पिकाची लागवड करतो; त्यावेळेस फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) चा विचार करतो. पिकांच्या योग्य वाढीसाठी 17 पोषक तत्त्वांची गरज असते. NPK च्या बरोबरीने सल्फर हे चौथे मुख्य पोषक तत्व आहे. सल्फर च्या पूर्तीसाठी शेतकरी डी.ए.पी., सिंगल सुपर फॉस्फेट, बेन्सल्फ अशा महागड्या खतांचा वापर करतात.
सल्फर हा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेच. परंतु तो बुरशीनाशक म्हणूनही काम करतो. सल्फरमुळे जमिनीचा pH कमी होतो. pH वाढलेल्या जमिनीत आपण कितीही खते टाकली तरी पिकांना त्याचा फायदा होत नाही. अशा वेळेस जिप्सम चा वापर केल्यास जमिनीचा pH कमी होण्यास मदत होते. तर जिप्सम मधील फ्री फॉर्म मध्ये असलेला कॅल्शियम हा जमिनीतील कार्बनशी संयुग तयार करतो, जे पिकासाठी फायदेशीर असते. गरजेनुसार पीक त्याचा वापर करते. कॅल्शियमच्या अभिक्रियेमुळे जमीन भुसभुशीत होते. म्हणजेच जमिनीची सच्छिद्रता(porosity) वाढते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. पाणी साठून राहत नाही. पिकांच्या वाढीसाठी (पेशी विभाजनासाठी) कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होतो.
एकूणच सर्व पिकांना कॅल्शियम व सल्फर ची आवश्यकता असते. द्विदल पिके, तेलबिया यांना या दोन पोषक तत्त्वांची खूप गरज असते. भुईमुगाच्या पिकास विशेषतः शेंगा भरण्याच्या काळात कॅल्शियमची अधिक आवश्यकता असते. त्यावेळी जिप्सम चा वापर केल्यास शेंगा पोचट न राहता पूर्ण भरल्या जातात. म्हणून पेरणीपूर्वी जिप्सम दिल्यास याचा खूपच फायदा होतो. अशा या कॅल्शियम आणि सल्फर चा सर्वात किफायतशीर स्त्रोत म्हणजे जिप्सम.
जिप्सम हे चांगल्या प्रकारचे भूसुधारक आहे. खरिपाच्या सुरुवातीला पेरणीपूर्वी याचा जरूर वापर करावा. यामुळे जमीन भुसभुशीत तर होतेच पण जमिनीची सुपीकताही वाढते. मातीचे आरोग्य सुधारते. ऍसिडिक (6.5 पेक्षा कमी pH असलेल्या) जमिनीमध्ये अल्युमिनियम सारख्या घटकांचा प्रभाव कमी होतो. क्षारीय जमिनीत तर खूपच चांगले परिणाम दिसतात. जिप्समच्या वापरामुळे क्षार (सोडियम) जमिनीत खोलवर झिरपत जातात आणि त्याची जागा जिप्सम मधील कॅल्शियम घेते. मातीच्या कणांना एकसंध बांधण्याचे काम करतात. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पोषक मूलद्रव्ये पाण्याबरोबर खोल जमिनीत जात नाहीत. पिकांना योग्य पोषण मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होते.
चिकण माती, चोपण किंवा भारी जमिनीत जिप्सम, मातीच्या कणांना विभक्त करून जमीन भुसभुशीत करण्याचे काम करते. परिणामी जमिनीत सूक्ष्मजीवांची वाढ होते. शेत जमिनीत पाणी साठून राहत नाही. जमिनीत हवा खेळती राहते, त्यामुळे मुळांचा चांगला विकास होतो. याच्या वापरामुळे जमिनीची ताकद तर वाढतेच पण पिकही वातावरणातील जास्तीचे तापमान सहन करू शकते. इतर खतांच्या तुलनेत याची किंमत ही खूपच कमी आहे. Use of gypsum in agriculture त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सल्ल्यानुसार याचा वापर जरूर करावा.
जिप्सम शेतजमिनीत कधी आणि कसे वापरावे?
पावसाच्या सुरुवातीला जिप्सम शेतामध्ये वापरण्याचा सल्ला कृषी तज्ञ देतात. माती परीक्षण अहवालानुसार त्याचे प्रमाण ठरवावे. तरीही असेच कॅल्शियम आणि सल्फर च्या पूर्तीसाठी आपल्याला जिप्सम वापरायचे असेल तर एकरी 100 किलो वापरता येते. पेरणीपूर्वी किंवा लागणीपूर्वी जिप्सम वापरणे फायदेशीर ठरते. सर्वच पिकासाठी किमान वर्षातून एकदा तरी याचा वापर करावा.
Use of gypsum in agriculture पेरणीपूर्वी जमिनीवर किंवा बेडमध्ये पसरवून (फेकून) द्या. त्यानंतर लगेच हलके पाणी पाजा. यामुळे जिप्सम जमिनीत विरघळेल. जिप्सम हे एक नैसर्गिक खनिज असल्याने हळूहळू विरघळते. त्यामुळे ते पिकांना हळुवार लागू होते. युरियाप्रमाणे 3-4 दिवसात लगेच पिकांना फरक दिसत नाही. जिप्सम चे परिणाम कालांतराने दिसतात पण खूपच आश्चर्यकारक असतात.
जिप्सम वापरण्याचे फायदे: Use of gypsum in agriculture
1.जमिनीची सुपीकता वाढून माती भुसभुशीत होते.
2.बियाणाची उगवण चांगली होते.
3.क्षारपड जमिन जिप्समच्या वापरामुळे सुधारते.
4.जिप्सम जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
5.जिप्सम कॅल्शियम तसेच सल्फरची कमतरता भरून काढून पिकांच्या मुळांचा विकास करते.
6.जिप्सम मध्ये मुबलक प्रमाणात सल्फर असल्यामुळे पिकांचे संरक्षण होते. हुमणीचे नियंत्रण होते.
7.जिप्समच्या वापरामुळे मातीतील कॅल्शियम बरोबरच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांची उपलब्धता वाढते.
8.जिप्सममुळे पाण्यातील क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
9.जमिनीची सच्छिद्रता वाढल्यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
10.पिकांची फळांची गुणवत्ता सुधारते.
11.जमिनीत वाढणाऱ्या कंदवर्गीय पिकासाठी जिप्सम खूपच फायदेशीर आहे. याच्या वापराने माती कंद पिकांना चिटकत नाही.
12.जिप्समच्या वापराने पिकांची मुळे जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे जमिनीची धूप कमी होते.
13.पाण्याचा निचरा झाल्यामुळे जमीन पाणथळ होत नाही.
14.जिप्सम मुळे जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
15.जिप्समच्या वापराने पीक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकते.
हे ही वाचा
रासायनिक खतांचा समतोल वापर
खूपच छान माहिती दिली👏
Helpful information 👍