Soil testing माती परीक्षण करणे का गरजेचे आहे?

नमस्कार मंडळी, माती परीक्षण (Soil testing) हि काळाची गरज झाली आहे. शेतामध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी  मुख्य खतांबरोबरच, सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. वेळोवेळी माती परीक्षण करणे का गरजेचे आहे?  तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी शेतीचे उत्पन्न वाढत नाही.   शेतीतील एक नियम असा सांगतो की तुम्ही, तुमच्या पिकाला सगळे  पोषक घटक दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पन्नात खूप घट होत असते.  आपण बारमाही  उत्पादन (पिके) घेतो तेव्हा, पिक अन्नद्रव्य ची उचल करत असते. पण  कोणते पीक कोणत्या खताची, किती उचल करतात हे माहीत होण्यासाठी किमान 3 वर्षातून एकदा  माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षण म्हणजे, आपल्या शेतजमिनीत असणाऱ्या रासायनिक व जैविक घटकांचे विश्लेषण.

जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या हेतूने, जमिनीची सुपिकता वाढविणे, जमिनीची पोत सुधारणे व भरघोस उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. शेतातील खरीप पिकाची काढणी केल्यानंतर लगेचच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत.

                                प्रयोगशाळेतील Soil testing चाचण्या या 3  प्रकारांमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांचे परीक्षण करतात.

1.महत्वाचे पोषक:  नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K)      

2.माध्यमिक पोषक:  कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर

3.सूक्ष्मपोषक:  बोरॉन (boron – B), क्लोरीन (chlorine – Cl), तांबे (copper – Cu), लोह (iron – Fe), मॅगनीज(manganese – Mn), मोलिबडेनम (molybdenum  – Mo) आणि जस्त (zinc – Zn).

 ह्या खेरीज मातीची pH पातळी पण तपासली जाते.  त्यावरून मातीची आम्लता (अम्लीय किंवा अल्कधर्मी), विद्राव्य क्षाराचे प्रमाण (विद्युत वाहकता), सेंद्रिय कर्ब या गुणधर्माचे पृथ:करण करण्यात येते व त्यानुसार अहवाल तयार केला जातो. यानुसार जमिनीत अन्नद्रव्य (सेंद्रिय व रासायनिक) किती उपलब्ध आहेत, याची माहिती मिळते.

माती तपासणीचा उद्देश:

1. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे उत्पादन खर्चावर नियंत्रण येते.

2.  पोषक घटकांच्या पातळीनुसार मातीची विभागणी करणे.

3. त्यानुसार खत शिफारस करणे. खत निवडीला अचूक मार्गदर्शन करणे.

4. पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो.

5. अतिरिक्त खते शेतकऱ्यांकडून जमिनीत दिली जात नाहीत.

6. जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता येतात.

Soil testing माती परीक्षण
Soil testing माती परीक्षण

माती परिक्षणाची जागा कशी निवडावी :

  1. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी सर्वप्रथम  नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात.   त्यासाठी शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाची माती गोळा करावी.
  2. नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही (V)आकाराचा 15 ते 30 सेंमी. खोल खड्डा घ्यावा. खड्ड्यातील माती बाहेर काढून टाकावी.
  3. नमुना चाचणीसाठी खड्ड्याच्या 2-3 सेंमी.  कडेची माती वरून खालपर्यंत काढावी. सर्व खड्ड्यातील माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा, दगड, पालापाचोळा वेगळे करावे.
  4. गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे समान 4 भाग करावेत.  समोरासमोरील 2 भागांची माती काढून टाकावी आणि उर्वरित मातीचा ढीग करावा. त्याचे पुन्हा 4 समान भाग करावेत. पुन्हा समोरासमोरील दोन भागांची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहीपर्यंत करावी.
  5. त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी.  माती कापडी पिशवीत भरावी आणि प्रयोगशाळेत परीक्षणासाठी Soil testing पाठवून द्यावी.

नमुना घेण्यासाठी आवश्यक साधने/साहित्य:

मातीचा नमुना घेण्यासाठी टिकाव, कुदळ, फावडे, खुरपे, घमेले, पहार किंवा गिरमिट (मूठ असलेला आगर/ पाइप), लाकडी टोकदार काठी, १० ते १५ लाकडी खुंट्या, स्वच्छ गोणपाट, कापडी पिशवी इ. साहित्यांची आवश्यकता असते.

avjar
Soil testing माती परीक्षण

मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी:

  1. पाण्याच्या स्त्रोता जवळील नमुना घेऊ नये.
  2. जनावरे नेहमी बसण्याची जागेवरील नमुना घेऊ नये.
  3. विविध खते किंवा कचरा टाकण्याच्या जागेरील नमुने घेऊ नयेत.
  4. बांधावरील किंवा झाडाच्या खालील जागेवरील नमुना घेऊ नये.
  5. जमिनीला खत पुरवठा केला असल्यास, अडीच ते 3 महिन्यांनंतरच मातीचा नमुना घ्यावा.
  6. Soil testing मातीचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ आणि कापडी पिशव्या वापराव्यात. रासायनिक खतांच्या, सिमेंटच्या पिशव्या वापरू नयेत.

नमुना तपासणीसाठी देताना द्यावयाची माहिती:

1.शेतकऱ्यांचे नाव:

2. गाव:

3. शेताचा सर्व्हे किंवा गट क्रमांक:

4. नमुना घेतल्याची तारीख:

5. जमिनीचा प्रकार (वाळू/पोयटा/चिकणमाती/क्षारयुक्त/विम्ल/चुनखडीयुक्त):

6. मागील हंगामातील पिक:
7. पुढील हंगामातील पीक:

माती परीक्षण अहवालाची वैधता:

 माती परीक्षण Soil testing अहवालाची वैधता ही साधारणत:  2  ते 3  वर्षांपर्यंत असते.

तक्ता क्रं. 1: जमिनीतील विविध घटकांचे आवश्यक प्रमाण:

अ. क्रं.घटक किमान – कमाल मर्यादा
1सामू6.5 ते 7.5
2क्षारता0 ते 2.00 डेसी सायमन/मी
3सेंद्रिय कर्ब0.51 ते 0.75
4नत्र280 ते 560 की/हे.
5स्फुरद10 ते 25 की/हे.
6पालाश145 ते 337 की/हे.

Soil testing माती परीक्षणावरून खतांची शिफारस:

जमिनीमधील नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण व पिकांची इतर अन्नद्रव्यांची गरज पाहून  हेक्टरी खतमात्रेची शिफारस केली जाते. मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे कमी, मध्यम व भरपूर या वर्गवारीत केले जाते.

तक्ता क्रं.2: मातीपरीक्षण अहवालानुसार  जमिनीतील उपलब्ध सुपीकता पातळी व शिफारशीत हेक्टरी खतमात्रा.

अ. क्रं.वर्गवारीसेंद्रिय कर्बनत्र की./ हे.स्फुरद की./हे. पालाश की./हे.  द्यावयाची खतमात्रा
1अत्यंत भरपूर1.00 पेक्षा जास्त700 पेक्षा जास्त40 पेक्षा जास्त560 पेक्षा जास्तशिफारशीच्या 66% कमी खतमात्रा
2भरपूर0.75 – 1.00560 – 70025 – 40280 – 560शिफारशीच्या 33% कमी खतमात्रा
3मध्यम0.50 – 0.75280 – 56010 – 15120 – 280शिफारशीनुसार
4कमी0.25 – 0.50140 – 2805 – 1060 – 120शिफारशीच्या 33% जास्त खतमात्रा
5कमी अत्यंतपेक्षा कमीपेक्षा कमीपेक्षा कमीपेक्षा कमीशिफारशीच्या 66% जास्त खतमात्रा

तक्ता क्रं.3: सुक्ष्म व दुय्यम मूलद्रव्यांची कमतरता असल्यास खालील प्रमाणे खते द्यावीत.

अ. क्रं.अन्नद्रव्याचे नावसर्वसाधारण मर्यादाशिफारस
1लोह4.50 पी.पी.एम.फेरस सल्फेट 25 ते 30 की/हे.
2मॅंगनीज (मंगल)2.00 पी.पी.एम.मँगेनीज सल्फेट 10 ते 15  की/हे.
3जस्त0.60 पी.पी.एम.झिंक सल्फेट 25 ते 30 की/हे.
4तांबे0.20 पी.पी.एम.कॉपर सल्फेट 10 ते 25 की/हे.
5बोरॉन0.5 ते 1 पी.पी.एम.बोरॉक्स 5 ते 10 की/हे.
6गंधक10 ते 20 पी.पी.एम.गंधक 20 ते 40 की/हे.

प्रमुख पिकाकरिता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हेक्टरी खतमात्रा.

अ. क्रं.पिकनत्र की/हे.स्फुरद की/हे.पालाश की/हे.जैविक खते
1ऊस आडसाली पूर्वहंगामी सुरू/ खोडवा400 340 250170 170 115170 170 115* शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टर *एसिटोबॅक्टर 10किलो + पी.एस.बी. 1 ते 1.5 किलो = हे 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात उसाच्या  कांड्या 30 मिनिटे बुडवून लागण करावी.
2रब्बी ज्वारी804040अॅझोटोबॅक्टर 25 ग्रॅम + पी.एस.बी. 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
3मका1206040अॅझोटोबॅक्टर 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे.
4गहू1206040अॅझोटोबॅक्टर 250 ग्रॅम + पी.एस.बी. 250 ग्रॅम प्रति  10 किलो बियाण्यास चोळावे.
5बाजरी502525अॅझोटोबॅक्टर 25 ग्रॅम + पी.एस.बी. 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
6भात1005050निळे हिरवे शेवाळ 20 किलो/हे. किंवा रायझोबियम 250 ग्रॅम + पी.एस.बी. 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे.
7भुईमूग255000रायझोबियम 250 ग्रॅम + पी.एस.बी. 250 ग्रॅम प्रति  10 किलो बियाण्यास चोळावे.
8हरभरा255030रायझोबियम 250 ग्रॅम  प्रति  10 किलो बियाण्यास चोळावे.
9सोयाबीन507500रायझोबियम 250 ग्रॅम + पी.एस.बी. 250 ग्रॅम प्रति  10 किलो बियाण्यास चोळावे.
10तूर255000रायझोबियम 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे.

सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येते की, आपणही या मृदा आरोग्य अभियानात सहभागी होऊन शिफारशीत खतमात्रेचा अवलंब करून आपल्या उत्पादन खर्चात बचत करावी. आपली जमीन सुपीक शाश्वत ठेवून भरघोस उत्पादन घ्यावे.

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा, काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कमेंट करा…

5 thoughts on “Soil testing माती परीक्षण करणे का गरजेचे आहे?”

  1. Nice information, farmers should do soil analysis annually as well as water testing also important…

Leave a Comment