जमिनीची(मातीची) सुपीकता म्हणजे काय?
तर ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता म्हणजेच Soil fertility जमिनीची सुपीकता होय. जमिनीच्या या सुपीकतेवरच शेतीचे उत्पन्न अवलंबून आहे. पूर्वी शेतीतून भरपूर उत्पादन मिळत असे. अगदी “शेतात सोनं पिकवलं जायचं” अशी जुन्या शेतकऱ्यांची म्हण आहे. एका दाण्याचे हजार दाणे करून देणाऱ्या आपल्या शेतीला (जमिनीला) ते माता मानत.
मग आत्ताच शेतीचे उत्पन्न कमी का झाले? असा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? आणि पडला असेल तर याचे उत्तर शोधण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय का? या उलट उत्पन्न कमी झाल्यामुळे आपण शेती करायला टाळाटाळ करायला लागलोय. म्हणूनच या उत्तराची कारणमीमांसा करताना जमिनीची सुपीकता, उत्पादकता कमी होण्याची कारणे काय आहेत? ती वाढवण्यासाठी काय करावे लागेल? याविषयीची शेती अभ्यासक आणी मृदा तज्ञांची मते आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी आपण जमिनीचा कधी विचार केला नाही. याउलट जमिनीतून फक्त घेणेच चालू ठेवले. पण जमिनीला नेमके काय हवे आहे? याचा विचार न करता फक्त रासायनिक खतेच टाकत राहिलो. उत्पादन वाढीच्या या शर्यतीमध्ये आपण फक्त रासायनिक खतांवरच अवलंबून आहोत.
या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ लागले. रासायनिक खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी झाली. याचा परिणाम उत्पादनावरती झाला, यालाच शेतकरी म्हणू लागले जमिनीची उत्पादकता- सुपीकता कमी झाली. तसे पहिले तर सुपीकता आणि उत्पादकता या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. परंतु सुपीकतेचा परिणाम उत्पादकतेवर होतो.
पहिला पाऊस पडल्यावर मातीचा सुगंधी वास येतो. परंतु हल्ली हा सुगंधही कमी झाला आहे. तो या जीवाणूंच्या घटणाऱ्या संख्येमुळेच. यासाठी आपल्याला जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढवण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी जाणीवपूर्वक सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जीवाणूंचे खाद्य म्हणजेच सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिले पाहिजेत. उन्हाळ्यात सुप्तावस्थेत असणारे ऍक्टिनोमायसीटस सारखे जीवाणू पहिल्या पावसानंतर क्रियाशील होऊन, सेंद्रिय पदार्थावर कुजवण्याची जी प्रक्रिया करतात त्यामधून Geosmin and 2methyl isoborneol हा वायू बाहेर पडतो. त्यामुळे मातीला हा सुगंधित वास येतो. याचाच अर्थ जमिनीत असंख्य प्रकारचे जीवणू असतात. त्यातील बहुसंख्य जिवाणू हे मातीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.
जमिनीला दिलेले कोणतेही रासायनिक खत त्याच स्वरूपात पिकांना उपलब्ध होत नाही. त्याचे स्वरूप बदलून देण्याचे काम हे जिवाणू करत असतात. जसे की उदाहरणार्थ, आपण जेव्हा शेतामध्ये युरिया वापरतो तेव्हा त्या युरियाचे रूपांतर जोपर्यंत नायट्रेट (NO3) मध्ये होत नाही, तोपर्यंत त्यातील पोषणद्रव्य पिकांना मिळत नाहीत. नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोसोमोनास हे जिवाणू युरियाचे नायट्रेट मध्ये रूपांतर करण्यास मदत करतात. यासाठीच आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू असणे खूप गरजेचे आहे. या जिवाणूंचे खाद्य आहे सेंद्रिय पदार्थ, म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंड, हिरवळीचे खत इ. यापैकी कोणत्याही सेंद्रिय पदार्थांचा वापर करूनच आपण Soil fertility जमिनीची सुपीकता वाढवू शकतो.
जमिनीच्या सुपीकतेचे 3 प्रकार:
जमिनीची सुपीकता ही खालील घटकावर अवलंबून असते.
1.रासायनिक सुपीकता:
यामध्ये जमिनीचा सामू(pH), क्षारांचे प्रमाण, पिकासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता (जसे की मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये) यांचा समावेश होतो.
2. भौतिक सुपीकता:
जमिनीची भौतिक सुपीकता ही जमिनीची जलधारण शक्ती, सच्छिद्रता, घनता, पाण्याचे वहन आणि निचरा, एकूणच जमिनीची घडण या घटकावर अवलंबून असते.
3. जैविक सुपीकता:
जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या किती आहे, यावर जैविक सुपीकता अवलंबून आहे. कारण हे सूक्ष्मजीवाणूच मातीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात. यासाठी शेती करताना या तीनही घटकांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
रासायनिक सुपीकतेसाठी आपण बाहेरून रासायनिक खतांचा वापर करू शकतो. परंतु भौतिक आणि जैविक सुपीकतेसाठी सेंद्रिय खतांचा वापर हा एकमेव रामबाण उपाय आहे. जमिनीच्या सुपीकतेचा निर्देशांक म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करणेच गरजेचे आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण (0.2 ते 0.4%पर्यंत) कमी होत चालले आहे, जे की 0.60 पेक्षा जास्त असावे असे अभ्यासकांचे मत आहे.
Soil fertility-जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे:
•जमिनीची सुपीकता ही वरील 3 घटकावर अवलंबून आहेच. तसेच मशागत करण्याच्या पद्धतीवर ही अवलंबून आहे.
•वातावरणातील बदलामुळेही जमिनीची सुपीकता कमी झाली आहे.
•अति पावसाच्या प्रदेशात जमिनीतील अन्नद्रव्य वाहून गेल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.
•कमी पावसाच्या प्रदेशात जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे वेगाने विघटन होऊन, खनिजिकरणाची प्रक्रिया होते त्यामुळे जमीन नापीक बनते.
•शेतातील सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा, काडीकचरा जाळणे.
•टेकड्यांच्या उतारावरील जमिनी सुपीक असतात, कारण घाटमाथ्यावरून वाहून येणाऱ्या गाळाबरोबरच अन्नद्रव्ये उताराच्या दिशेने येतात व साठतात.
•वर्षातून दोन-तीन पिके सलग घेणे म्हणजेच जमिनीला विसावा न मिळणे.
•रासायनिक खतांचा अतिरेकी वापर.
•रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच पर्याय होऊ शकत नाहीत.
•पाण्याचे योग्य व्यवस्थापन न करणे.
या व अशा कारणामुळेच जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे.
जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकवण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करावा…
1.एकाच जमिनीत दरवर्षी एकच पीक घेतल्यास सेंद्रिय कर्बाचे असंतुलन होते, म्हणून पिकांच्या फेरपालटीत कडधान्य (मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर) पिकांचा समावेश करावा.
2.सेंद्रिय खते जसे की शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत (ताग,बोरू,शेवरी, धैंच्या) इत्यादीचा शेतात नियमित वापर करावा.
3.शेणखत रासायनिक खतासोबत वापरावे. शक्य तेवढे कुजलेले शेणखतच वापरावे.
4.शेणखताचा वापर पेरणीच्या 15 ते 20 दिवस आधी करावा, खूप आधी टाकल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते.
5.माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
6.रासायनिक खताबरोबर निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर केल्यास सेंद्रिय कर्बाच्या वाढीबरोबरच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
7.जैविक खतांचा बीज प्रक्रियेद्वारे तसेच जमिनीत शेणखतात मिसळून वापर करावा.
8.क्षारपड तसेच चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जीवामृत किंवा शेणस्लरीचा वापर पाटपाण्याद्वारे किंवा आळवणीतून करावा.
9.ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.
10.वरखते ही शक्यतो पिकांच्या ओळींमधून किंवा रोपाभोवती द्यावीत. खतांच्या मात्रा विभागून द्याव्यात.
11.शेतातील सर्व मशागती उताराच्या आडव्या कराव्यात. बांधबंधिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.
12.क्षारपड जमिनीत ताग किंवा धैंच्या जमिनीत पेरून दीड महिन्यात फुले येताच जमिनीत गाडावा.
13.शेतातील पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
14.चोपण जमिनीत सेंद्रिय भू-सुधारक (मळी, कंपोस्ट) व रासायनिक भू-सुधारक (जिप्सम) हे शेणखतात मिसळून वापर करावा. तसेच आम्लयुक्त जमिनीत चुन्याचा वापर हा सामूच्या (pH) प्रमाणानुसार करावा.
15.जमिनीची कमीत कमी मशागत करावी. म्हणजे धूप कमी होऊन कार्बन हवेत उडून जाणार नाही.
निष्कर्ष:
Soil fertility-मातीची सुपीकता महत्त्वाची आहे, कारण ती मानवी अस्तित्वाचा आधार आहे.
माती वनस्पतींना खायला देते, जी शेवटी मानव आणि प्राण्यांना खायला देते.
वनस्पती, प्राण्यांची जैवविविधता आणि मातीची सुपीकता यांच्यात सकारात्मक संबंध आहे.
सध्या जिवाणूविरहित माती मृतप्राय अवस्थेकडे जात आहे. ती जर जिवंत ठेवायची असेल, जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल, म्हणजेच तिची उत्पादकता टिकवायची असेल तर जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा (शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत निंबोळी किंवा करंजी पेंड, पालापाचोळा, काडीकचरा) वापर करणे अनिवार्य आहे.
अन्यथा भविष्यात जमीन (माती) नापीक झाल्याशिवाय राहणार नाही.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, त्याचे गांभीर्य लक्षात आल्यास इतर शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा.
तुमच्या काही सूचना, अभिप्राय असल्यास खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.
Nice information.
Very nice information.
Very useful information for farmers. Keep doing this good work.
Your writing style is cool and I have learned several just right stuff here. I can see how much effort you’ve poured in to come up with such informative posts. If you need more input about Search Engine Optimization, feel free to check out my website at Webemail24