Pest management in rice: भातावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

भात पिकावर खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, निळे भुंगेरे, सुरळीतील अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे पिकाचे बरेचसे नुकसान होते. त्यामुळे या किडींचे प्रभावी नियंत्रण Pest management in rice करण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करावी.

Pest management in rice
Pest management in rice

1. खोडकिडा: Pest management in rice

ही भात पिकावर वाढणारी सर्वात महत्त्वाची किड असून, ही फक्त भातावरच उपजीविका करते.

या किडीचा पतंग पिवळसर रंगाचा व मध्यम आकाराचा असून मादी पतंगाच्या पुढील पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो.

नुकसानीचा प्रकार:

या किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे रोपवाटिकेत तसेच लावणीनंतर पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये आढळून येतो. अळी सुरुवातीस कोवळ्या पानावर आपली उपजीविका करते, नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते. खोडाचा आतील भाग पोखरून खाते. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला गाभा मर असे म्हणतात, तर पोटरीतील पिकावर या किडीचा उपद्रव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. त्यालाच पळींज किंवा पांढरी पिसे असे म्हणतात. यामुळे भाताच्या उत्पादनात मोठी घट येते.

नियंत्रणाचे एकात्मिक उपाय:

  • ही किड खोडाच्या आत राहत असल्याने केवळ कीटकनाशकांचा वापर करून तिचे नियंत्रण करण्यापेक्षा एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.
  • निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • किडीचे अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
  • कीडग्रस्त फुटवे उपटून नष्ट करावेत.
  • जैविक नियंत्रणासाठी लावणीनंतर 30 दिवसांनी ट्रायकोग्रामा जापोनीकमची  50 हजार अंडी 3 ते 4 वेळा 10 दिवसांच्या शेतात सोडावी.
  • रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये
  • एसीफेट (75 टक्के) 625 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस (25% प्रवाही) 1250 मिली किंवा कारटाप हायड्रोक्लोराइड (50% प्रवाही) 600 ग्रॅम किंवा फ्ल्यूबेन्डामाईड (20%)125 ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5%प्रवाही) 500 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावे.

2. पाने गुंडाळणारी अळी:

अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली ही अळी पांढरट हिरव्या रंगाची असते व पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट दिसते. या किडीचा पतंग सोनेरी फिकट पिवळसर रंगाचा असून त्याच्या पंखावर काळी नागमोडी नक्षी असते, तसेच पंखाच्या कडा काळसर असतात. ही अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत राहते. तिला स्पर्श केल्यास अतिशय जलद गतीने आपल्या शरीराची वेडी वाकडे हालचाल करते.

नुकसानीचा प्रकार:

या किडीची अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिटकून गुंडाळी करते व त्यात राहून आतील पृष्ठभागातील हरिद्रव्य खाते. त्यामुळे पिकाची वाढ मंदावते आणि पीक निस्तेज दिसते.

एकात्मिक व्यवस्थापन:

  • शेताच्या बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
  • ट्रायकोग्रामा जापोनीकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी कीटकांची 50000 अंडी प्रती हेक्टरी पिकामध्ये सोडावीत.
  • कीडग्रस्त पाने दिसल्यास प्रतिहेक्टरी क्लोरोपायरीफॉस (20% प्रवाही) 2 लिटर किंवा कार्टाप हायड्रोक्लोराइड (50%) 1 किलो किंवा क्विनॉल्फोस (25% प्रवाही) 1250 मिली किंवा फ्ल्यूबेन्डामाईड (20%प्रवाही) 125 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पानेगुंडाळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशक कार्टाप हायड्रोक्लोराइड(4%) दाणेदार 18.75 किलो किंवा क्लोरंट्रानिलीप्रोल (0.4%) दाणेदार 20.8 किलो प्रती हेक्‍टरी या प्रमाणावर जमिनीतून द्यावे.

3. लष्करी अळी:

ही अळी सुरुवातीला हिरवट रंगाची असते व तिच्या दोन्ही बाजूस पिवळसर पट्टा असतो. नंतर ती किंचित करड्या रंगाची होते. या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा असतो.

ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या किडीच्या वाढीस अनुकूल असते.

नुकसानीचा प्रकार:

या किडीचा उपद्रव हंगामाच्या सुरुवातीस बांधावरील गवतावर होतो. बांधावरील गवत स्पष्ट केल्यानंतर अळ्या मुख्य पिकाकडे वळतात. दिवसा ही जमिनीत लपून राहते व रात्रीच्या वेळी बाहेर येऊन पाने खाण्यास सुरुवात करते. रोपवाटिकेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात. पिकामध्ये लोंबित दाणे भरल्यानंतरही या किडीचा उपद्रव होतो. रात्रीच्या वेळी अळ्या लोंब्यावर चढतात आणि लोंब्या कुरतडून खातात. ही अळी अतिशय खादाड असल्यामुळे पिकावर अधाशासारखी तुटून पडते. या किडीचा सामूहिक हल्ला हा एखाद्या लष्करासारखा असतो, म्हणून या किडीस लष्करी अळी असे म्हटले जाते.

एकात्मिक व्यवस्थापन: Pest management in rice

  • भाताची कापणी केल्यानंतर लगेच शेतीची नांगरट करावी. यामुळे किडींचे जमिनीतील सुप्तावस्थेतील कोश उघडे पडतात आणि सूर्यप्रकाशामुळे त्यापैकी काही मारतात तर काही पक्षांच्या भक्ष्यस्थानी पडतात.
  • लावणी केलेल्या शेतात पाणी बांधून ठेवावे, त्यामुळे अळ्यांना लपायला जागा मिळत नाही आणि अळ्या रोपावरती चढतात. पुढे या अळ्या पक्षांच्या भक्षस्थानी पडतात.
  • बेडकांचे शेतात संवर्धन करावे कारण बेडूक या किडीच्या अळ्या खातो.
  • पीक फुलोऱ्यावर असताना क्लोरोपायरीफॉस (20% प्रवाही) 2.5 लिटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5% प्रवाही) 500 मिली या प्रमाणात मिसळून हेक्‍टरी फवारणी करावी.

4. तपकिरी तुडतुडे:

हे तुडतुडे तपकिरी रंगाचे त्रिकोणी पाचरीच्या आकाराचे असतात.

लहान आकाराचे हे तुडतुडे व त्यांची पिल्ले नेहमी तिरकस व भरभर चालतात.

खोडावर ते मोठ्या संख्येने दिसून येतात.

नुकसानीचा प्रकार:

हे तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात. शेतात ठिकठिकाणी करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.

एकात्मिक व्यवस्थापन:

  • रोपांची लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर 20 सें.मी. आणि  2 चुडातील अंतर 15 सें.मी. ठेवावे. रोपांची पट्टा पद्धतीने लागण करावी.
  • शक्यतो तपकिरी तुडतुड्यांना कमी बळी पडणाऱ्या जातीची लागवड करावी.
  • आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे म्हणजेच प्रत्येक चुडात 5 ते 10 तुडतुडे दिसताच कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • यासाठी इमिडाक्लोप्रीड (17.8% प्रवाही) 125 मिली किंवा थायोमेथॉक्झाम (25% प्रवाही) दाणेदार कीटकनाशक 100 ग्रॅम किंवा फिप्रोनिल (5% प्रवाही) 1100 मिली किंवा क्विनॉलफॉस (25% प्रवाही) 1500 मिली. यापैकी कोणतेही एक कीटकनाशक  हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

5. गादमाशी:

गादमाशीला लांब पाय असून तिचा आकार डासासारखा असतो. या किडीची मादी तांबूस रंगाची असते तर नर पिवळट करडया रंगाचा असतो. या किडीची अळी पाय विरहित व गडद तांबूस रंगाची असते. या माशीचा उपद्रव प्रामुख्याने सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आढळून येतो.

नुकसानीचा प्रकार:

अंड्यातून बाहेर पडलेली अळी रोपाच्या खोडात शिरून त्यामध्ये असलेले कोवळे अंकुर कुरतडून खाते. अंकुर कुरतडताना तिच्या तोंडातून लाळ बाहेर पडते. या लाळेत ‘सीसीडोजन’ नावाचे द्रव्य असते. या द्रव्याची प्रक्रिया होऊन अंकुराचा भाग फुगतो व त्याची कांद्याच्या पातीसारखी चंदेरी रंगाची नळी तयार होते. यालाच नळ किंवा गाद किंवा पोंगा असे म्हटले जाते. अशा अंकुराला लोंब्या येत नाहीत. पीक फुटव्याच्या अवस्थेत असताना गादमाशीचा उपद्रव जास्त असतो. कीडग्रस्त रोपाला अधिक फुटवे येतात, परंतु ते खुरटे राहतात.

एकात्मिक व्यवस्थापन:

  • लागवडीपूर्वी रोपाची मुळे क्लोरोपायरीफॉस (20% प्रवाही) प्रति लिटर 1मिली या द्रावणात 3 तास बुडवून ठेवावीत.
  • कीडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळून टाकावेत.
  • खतांचा संतुलित वापर करावा.
  • लागवडीनंतर 20 दिवसांनी दाणेदार कार्टाप हायड्रोक्लोराइड (4%) 25किलो किंवा फिप्रोनिल (0.3%) 18.50 किलो प्रती हेक्टरी जमिनीत टाकावे.
  • भात पिकाची लागवड शक्यतो एकाच वेळी करावी.

हे ही वाचा: कीटकनाशक खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…

Leave a Comment