nimboli ark किड नियंत्रणासाठी असा तयार करा घरच्या घरी लिंबोळी/ निंबोळी अर्क:

nimboli ark/निंबोळी अर्क: मागील काही वर्षापासून हवामानात अनेक विपरीत बदल होत आहेत. याचे अनेक दूरगामी परिणाम होत आहेत. यापैकी शेतीवर होणारा परिणाम म्हणजे, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण. सध्या ऊस, कापूस, हळद, आले, भुईमूग, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, मका यासारख्या मुख्य पिकावर रोग आणि किडींचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादनात बरीच घट होत आहे. याचे नियंत्रण करताना शेतकऱ्यांना वेळ आणी पैसा दोन्हीही खर्च करावा लागत आहे. इतके करूनही नियंत्रण मिळाले तर ठीक, नाहीतर पदरी निराशाच येते. कीड व रोग नियंत्रणासाठी शेतकरी रासायनिक औषधांचा जास्त वापर करतात.

यामुळे खर्च वाढतो, उत्पादनाचा दर्जा तर घसरतोच पण त्याचे पर्यावरण,जमिनीवर आणि मानवी आरोग्यावरही घातक परिणाम होतात.

म्हणूनच कृषी क्षेत्रातील जाणकार लोक, रोग व किडनियंत्रणासाठी जैविक आणि सेंद्रिय औषधांचा वापर करण्याचा सल्ला देतात. यापैकीच एक म्हणजे निंबोळी अर्क nimboli ark.

निंबोळी अर्काचा वापर पिकावर फवारणी मधून केल्यामुळे अनेक कीटकांचे सहज नियंत्रण होते.

nimboli ark 1
nimboli ark किड नियंत्रणासाठी असा तयार करा घरच्या घरी लिंबोळी/ निंबोळी अर्क

निंबोळी अर्कातील महत्त्वाचा घटक त्याचे कार्य:

कडुलिंबाच्या पाने आणि बियांमध्ये(निंबोळी) ॲझाडीरेक्टीन, निंम्बिन व निंम्बिडिन, मेलियानट्रीओल सालांन्नीन हे महत्त्वाचे घटक आहेत. जे कीटकनाशकाचे काम करतात.

मावा,  रसचुसक किडी, तुडतुडे, पाने व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, घाटेअळी, पिठ्याढेकुन,अमेरिकन बोंडअळी यांच्या बंदोबस्तासाठी या अर्काचा प्रभावी उपयोग होतो असा दावा तज्ञांनी केला आहे.

निंबोळी अर्क (5%) तयार करायला लागणारे साहित्य:

1.कडुलिंबाच्या सुकलेल्या 5 किलो निंबोळ्या

2. साबणाचा चुरा 200 ग्रॅम

3. स्वच्छ पाणी 100 लिटर

4. गाळण्यासाठी कापड

अर्क तयार करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना:

  • निंबोळ्या जमा करताना शक्यतो झाडावरून गोळा करा.
  • पडलेल्या गोळा केल्या असतील तर साफ करून घ्या.
  • त्या सावलीत वाळवा.
  • फवारणी करण्याच्या आधी एक दिवस निंबोळ्या बारीक कराव्यात.
  • 8 महिन्यापेक्षा जुन्या निंबोळ्या वापरू नये कारण, त्यातील कीडनाशक शक्ती कमी होते.              

nimboli ark निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत/ कृती:

  1. 5 किलो चांगल्या साफ केलेल्या व वाळलेल्या निंबोळ्या घ्या.
  2. त्या कुटुन किंवा दळून बारीक करा.
  3. ही बारीक केलेली पावडर किंवा भुकटी साधारण 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
  4. त्याचवेळी दुसऱ्या भांड्यात 1लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम साबणाचा चुरा देखील भिजत ठेवा.
  5. हे दोन्ही मिश्रण वेगवेगळे ठेवायचे आहे, एकत्र मिसळू नये.
  6. दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे द्रावण दुधासारखे दिसेपर्यंत ढवळावे.
  7. त्यानंतर निंबोळी अर्क स्वच्छ कपड्याने गाळून घ्या व तो कपडा ही चांगला पिळून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त निंबोळी अर्क निघेल.
  8. साबणाचा चुरा विरघळलेले पाणी त्यामध्ये टाकून चांगले ढवळा. यामुळे द्रावण पिकाच्या पानावर चिटकून राहण्यास मदत होते.
  9. यामध्ये जवळपास 90 लिटर पाणी मिक्स करा.
  10. हा झाला तुमचा 5% निंबोळी अर्क तयार.

तयार झालेला निंबोळी अर्क हा शक्यतो त्याच दिवशी (ताजा अर्क) फवारणीसाठी वापरा.

प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी दुपारी 4.00 नंतर याची फवारणी करावी.

nimboli ark निंबोळी अर्काचे फायदे:

  • निंबोळी अर्काचा मित्र कीटकावर किंवा परभक्षी घटकावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही.
  • ॲझाडीराक्टीनचे नैसर्गिक अपघटन होत असल्याने पिकामध्ये कोणतेही अवशेष राहत नाहीत.
  • मानवी आरोग्यावर कोणतेही घातक परिणाम होत नाहीत.
  • सर्व प्रकारच्या पिकांवर 15 दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते.
  • फवारणीच्या खर्चात बचत होते.
  • कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही. यामुळे निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फवारणी फायदेशीर ठरते.
  • इतर कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येते.
  • कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे  पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

FAQ: निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो?

निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडीवर वेगवेगळ्या प्रकारे होतो काही केळी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर बऱ्याच किडी या अर्काच्या कडवटपणामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत. त्यामुळे उपासमारीने मरून जातात.

हा अर्क किडींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो. तसेच मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करतो.

निंबोळी अर्क कीटकांवर आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात.

हे ही वाचा
सेंद्रिय शेती म्हणजे काय?

जीवामृत घरच्याघऱी कसे तयार करावे?

Leave a Comment