कमी कष्टात, कमी मेहनतीत, कमी मशागतीत आणि महत्वाचे म्हणजे कमी उत्पादन खर्चात (मजूरी, बियाणे, वीज, पाणी) आपण khodava-खोडवा ऊस पिक घेऊ शकतो. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते की ज्याप्रमाणे मुलीचे लग्न लावून तिला सासरी पाठवतो, तसे एकदा ऊस कारखान्याला गेला की त्या आनंदात तो खोडव्याकडे लक्षच देत नाही. ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रमुख नगदी पीक आहे. परंतु दिवसेंदिवस ऊसाच्या दर हेक्टरी उत्पादन क्षमतेत घट होत आहे. महाराष्ट्रामधील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पीकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. खोडवा ऊसाचे व्यवस्थापन आधुनिक तंत्राने केल्यास, कमी खर्चात लागवडीच्या ऊसाएवढेच उत्पादन नक्की मिळू शकते.
ऊस तुटून गेल्यानंतर त्यापासून खोडवा पीक घेतले जाते. इतर प्रगत ऊस उत्पादक देशाचा विचार करता भारतामध्ये 2 किंवा 3 खोडव्यापेक्षा जास्त खोडवे घेतले जात नाहीत; पण ऑस्ट्रेलियात सरासरी 5 ते 6, ब्राझील 7 ते 8 आणि क्युबामध्ये 12 ते 13 खोडवे उत्पादन घेतले जाते आणि प्रत्येक खोडव्याचे उत्पादन जवळपास लागणीच्या ऊसाइतके असते. आपल्याकडे मात्र शेतकरी khodava-खोडवा ऊसाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे उत्पादन कमी येते. परंतु पश्चिम महाराष्ट्रात असेही काही यशस्वी शेतकरी आहेत कि ज्यांनी 8 ते 10 खोडवे घेऊन चांगले उत्पादन घेतले आहे. पूर्वहंगामी खोडवा ऊसाचे उत्पादन हे सुरु आणि आडसाली khodava-खोडवा ऊसापेक्षा जास्त व चांगले मिळते.
ऊसाचे दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असेल तर खोडव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी खाली सांगितल्याप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने खोडवा व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा.
बुडखे छाटणी – khodava
ऊस तुटून गेल्यानंतर सर्वप्रथम शेतात पडलेल्या कांड्या गोळा करून घ्याव्यात. तोडणीनंतर बुडख्यावर असलेले पाचट सरीमध्ये दाबून घ्यावे. बुडखे उघडे करावेत जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून, जमिनीखालील कोंब / डोळे फुटण्यास वाव मिळतो व नवीन कोंब जोमदार येतात. फुटव्यांची एकूण संख्या वाढते . तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास आणि उसाचे बुडखे जमिनीवर, राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात व क्वचितच त्यांचे उसात रूपांतर होते .
ट्रॅक्टर यंत्राद्वारे बुडखा छाटणी आणि पाचटाचे तुकडे करणे ही कामे करणे आता सहज शक्य झाली आहेत. पाचटामुळे जमिनीतील ओलीचे संरक्षण होऊन पाण्याचा ताण पीक सहन करते. जमिनीचे तापमान 2अंश सेल्सिअसने कमी झाल्याने खोडव्याची उगवणक्षमता वाढून फुटवे जगण्याचे प्रमाण वाढते. बुडख्याच्या छाटणीनंतर लगेचच, 15 ग्राम बाविस्टीन बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.
पाचट व्यवस्थापन
सेंद्रिय कर्ब हा शेतजमिनीचा आत्मा आहे. पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलधारण शक्ती वाढते. ऊस तुटल्यानंतर साधारणत: 15 ते 20 दिवसांनी पाचट कुट्टी करून घ्यावी. पाचटामध्ये 0.5% नत्र, 0.2% स्फुरद आणि 0.7 ते 1% पालाश आणि 35 ते 40 % सेंद्रिय कर्ब ही अन्नद्रव्य असतात. एक हेक्टर क्षेत्रामधून सरासरी 8 ते 10 टन पाचट मिळते. त्यापासून 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फुरद, 75 ते 100 किलो पालाश आणि 30 ते 40 हजार किलो सेंद्रिय कर्ब आणि 2.5 टन सेंद्रिय खत उपलब्ध होते. पाचट जाळल्याने त्यातील नत्र आणि स्फुरदाचा 90 टक्क्याहून अधिक भाग जळून जातो. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत जाते.
खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीवर अच्छादन तयार होऊन ओलावा टिकून राहतो. जमिनीचे तापमान थंड राहते, त्यामुळे नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर गांडुळांची वाढ होते. पाचट कुजत असताना त्यातून पिकाला आवश्यक असणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो त्यामुळे khodava पिकाची जोमदार वाढ होते.म्हणून शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी, 80 किलो युरिया + 100 किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट पसरून पाणी द्यावे. पाणी देण्याच्या अगोदर पाचट कुजवणारे जिवाणू 1 ते 2 लिटर प्रति एकरी पाचटावर फवारणी करावी.
बगला फोडणे
ऊस लागणीवेळी पूर्व मशागत केल्यामुळे मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते.
अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी, सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते.
त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात. नवीन मुळ्याची वाढ होते.
खत व्यवस्थापन
रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक असे एकात्मिक खत व्यवस्थापन केल्यास खोडवा पिकातून भरघोस उत्पादन मिळते. खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि हलके पाणी देणे अतिशय महत्त्वाचे असते.
*त्यासाठी ऊस तुटल्यावर 15 दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी 75 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फास्फेट व 50 किलो पोटॅश किंवा 100 किलो 10:26:26, 50 किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी.
*ऍझोटोबॅक्टर, अझोस्पिरीलम, ऍसिटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जीवाणू या खतांचा प्रत्येकी 1.25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जिवाणू खते वापरावीत. ही जिवाणू खते साधारणपणे 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र मिसळून पिकाला द्यावीत.
*खते माती आड करून पाणी द्यावे.
*पहिल्या मात्रेनंतर 6 आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी 75 किलो द्यावी.
*उर्वरित मात्रा एकरी 100 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फास्फेट व 50 किलो पोटॅश किंवा 100 किलो 10:26:26 व 75 किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी.
*ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास, शिफारशीत मात्रेपैकी 60 टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा.
*उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून द्यावी.
(*दर 15 दिवसांनी एकरी 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट व 250 ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत.)
*ठिबक सिंचन ची सोय नसल्यास सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता टाळण्यासाठी एकरी 10 किलो फेरस सल्फेट, 8 किलो झिंक सल्फेट , 4 किलो मैंगनीज सल्फेट व 2 किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते शेणखतात किंवा शेंद्रीय खतात मिसळून दयावीत.
*खोडवा ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी एकरी 25 किलो सल्फर हे (महाधन बेंसल्फ) या खतातून द्यावे.
अधिक व हमखास उत्पादनासाठी, khodava-खोडवा ऊसावर विद्राव्य खतांच्या किमान 3 फवारण्या साधारणत: 30 ,50 व 70 दिवसांनी घ्याव्यात.
फवारणी नियोजन
कीड व रोगाचा खोडवा पिकावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशक व बुरशीनाशकाची khodava पिकावर फवारणी करावी. पीक पिवळे पडू नये म्हणून 1% फेरस सल्फेट (10 ग्रॅम प्रतिलिटर) + 1% मॅग्नीज सल्फेट + 2.5% युरियाची (25 ग्रॅम प्रतिलिटर) 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारणी करावी.
1)पहिली फवारणी: (30दिवसानी)
या फवारणीत संजिवके,पोषण द्रव्ये सोबत बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे. यामुळे नवीन मुळे व जोमदार फुटवे येतात. याच दरम्यान खोड किड, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
कॅल्शियम नायट्रेट – 600 ग्राम
6 BA – 2 ग्राम
क्लोरोपायारिफोस – 150 मिली
बाविस्टिन – 150ग्राम
*एकरी 6 पम्प पुरतात.
2) दुसरी फवारणी: (50दिवसानी)
19:19:19 + 12:61:0 – 800 ग्राम
चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये – 200 मिली
GA – 3 ग्राम
6 BA – 3 ग्राम
सी विड एक्स्ट्राक्ट – 400 मिली
*एकरी 8 पम्प पुरतात.
*कीटकनाशक, बुरशीनाशक आवश्यकतेनुसार वापरा.
3)तीसरी फवारणी: ( 70 दिवसानी)
13:40:13 – 1500 ग्राम
चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये -300 मिली
GA – 5 ग्राम
सी विड एक्स्ट्राक्ट(टॉनिक) -500 मिली
आवश्यकतेनुसार – कीटकनाशक, बुरशीनाशक
*एकरी 10 पम्प पुरतात.
4)चौथी फवारणी: ( 90 दिवसानी)
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे देता येणेची शक्यता कमी असते.
13:00:45 -1000 ग्राम
कॅल्शियम नायट्रेट(चिलेटेड) – 500 ग्राम
GA – 7 ग्राम किंवा
ट्रायकाँन्टेनाँल 0.1% – 500 मिली
*एकरी 10 पम्प पुरतात.
पाणी नियोजन
*खोडवा व्यवस्थापनामध्ये 25 ते 28 पाण्याचा पाळ्या पुरेश्या आहेत.
*पाचट आच्छादन तंत्रज्ञानामुळे 40 ते 45 दिवस पीक पाण्याचा तग दारू शकते त्यामुळे 12 ते 15 पाण्यात ऊस निघतो.
*ठिबक सिंचनाचा वापर केल्यास 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होते.
ऊस परिपक्वता व तोडणी
*खोडवा पीक 12 महिन्यात पक्व होते.
*ऊस तोडणी पूर्वी 15 ते 25 दिवस अगोदर पाणी देऊ नये, उसाची तोडणी जमिनीलगत करावी आणि तुटलेला ऊस 24 तासाचा आत कारखान्याला पाठवावा जेणेकरून साखर उताऱ्यात घट येणार नाही.
khodava-खोडवा पीक घेण्याचे फायदे
1.पूर्व मशागतीची आवश्यकता नसल्याने खर्चात, वेळेत व श्रमात बचत होते.
2. लागवड ,बेणेप्रक्रिया, मशागती वरील खर्च वाचतो. लागणीच्या ऊसापेक्षा खोडवा पिकाला 35 ते 40 टक्के खर्च कमी लागतो.
3. पहिल्या पिकाची मुळे, डोळे तयार असल्यामुळे खोडवा ऊसाचे फुटवे झपाटयाने वाढतात.
4.ऊसाची सर्व फुटवे एकाच वेळी फुटतात व पक्व ऊसाची संख्या चांगली मिळते.
5.उगवणीसाठीचा कालावधी जास्त लागत नसल्याने खोडव्याला 1 ते 2 महीने लागणीच्या ऊसापेक्षा लवकर पक्वता येते.
6.खोडव्यात पाचटाचे अच्छादन करता येत असल्यामुळे तण काढणे व आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
7.लागणीच्या ऊसापेक्षा खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त सहन करत असल्यामुळे पाण्याच्या खर्चात बचत होते.
खोडवा पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे
- ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. 15 फेब्रुवारी नंतर khodava-खोडवा शक्यतो ठेवू /धरू नये .
- ऊसाचे पाचट जाळणे. पाचट जाळल्याने त्यातील नत्र आणि स्फुरदाचा 90 टक्क्याहून अधिक भाग जळून जातो. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत जाते.
- पाणी आणि खत नियोजन नसणे.
- कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव.
- लागवडीच्या ऊसाची उगवण विरळ असेल ऊसाची संख्या कमी होऊन उत्पादन कमी येते.
- लागण ऊस पिकास मोठी बांधणी चांगली झाली नसल्यास खोडव्यात फुटव्याची संख्या कमी मिळते.
- सुधारित खोडवा व्यवस्थापन आणि नियोजनाचा अवलंब केला जात नाही.
- लावणीच्या ऊसाची तळापासून बुडखे न छाटल्यामुळे खोडवा पिकात फुटव्याची वाढ योग्य होत नाही. त्यामुळे उत्पादन घटते.
- बुडख्यावरील पाचट बाजूला केले जात नाही.
- ऊसाच्या khodava-खोडवा पिकाकडे फारच दुर्लक्ष केले जात असल्यामुळे खोडव्याचे उत्पादन कमी येते.
FAQs / वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. खोडवा-khodava ऊस म्हणजे काय?
उत्तर – ऊस तुटून गेल्यानंतर जमिनीत शिल्लक राहिलेल्या खोडापासून खोडवा पीक घेतले जाते. किंवा
पहिल्या तोडणीनंतर नवीन बियाणे न वापरता वाढवलेले उसाचे पीक.
2. उसाचा खोडवा घेण्यासाठी उसाच्या कोणत्या जातीं उत्तम आहेत?
उत्तर- को-86032, को-एम-265, को-8040, को-7219, को-8014, को-युएआय 9805, फुले 10001, फुले 11082, फुले ऊस 15012 इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.
3. ऊसाचा खोडवा कधी ठेवू /धरू नये?
उत्तर – 15 फेब्रुवारी नंतर खोडवा शक्यतो ठेवू /धरू नये .
4. खोडवा उसाचे फुटवे वाढवण्यासाठी काय करावे?
उत्तर- खोडवा उसाचे फुटवे वाढवण्यासाठी 6 बी. ए. आणि जिब्रालिक ऍसिड या संजीवकांची तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
आपल्याला हा लेख आवडल्यास तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…
Mast mahiti number 1