हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य वर्गीय पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे बाजारपेठेत या पिकाला चांगली मागणी असते. हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज आणि कमीत कमी उत्पादन खर्च येतो, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारे हे पीक आहे आहे. तसेच हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्रांचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढवते.
प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावरील नवीन सुधारित वाणांचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विंटल पर्यंत घेतलेले आहे या अनुभवानुसार पारंपारिक पद्धतीमध्ये थोडाफार बदल करून, सुधारित वाण आणि आधुनिक उत्पादन तंत्र यांची सांगड घातल्यास कोरडवाहू क्षेत्रात सुद्धा चांगले उत्पादन मिळते.
Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती, या लेखातील खालील शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित भरघोस वाढ होईल.
जमिनीची निवड:
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार भुसभुशीत जमीन आवश्यक असते. हलकी चोपण किंवा पाणथळ क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
पूर्व मशागत: Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती
खरिपाचे पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल (किमान 25 से.मी.) नांगरट करावी. त्यानंतर कोळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी.
हवामान:
हरभरा या पिकासाठी थंड व कोरडे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात असते.
पेरणीची योग्य वेळ:
रब्बी हंगामातील या पिकाला कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. कोरडवाहू जमिनीसाठी जमिनीतील ओल कमी होण्याच्या आधी म्हणजेच 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पेरणी पूर्ण करावी. बागायतीसाठी जिथे पाण्याची सोय आहे तेथे 10 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधी पेरणी केली तरी चालते.
पेरणीची पद्धत:
देशी हरभऱ्याची पेरणी 30 x 10 सेंटिमीटर वर करावी तर काबुली हरभऱ्याची 45 x 10 सेंटिमीटर अंतरावर पेरणी करावी. पेरणी उशिरा किंवा डिसेंबर नंतर केल्यास उत्पादनात घट येते आणि पीक किडीला आणि रोगांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. जमिनीत ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी.
सुधारित आणि अधिक उत्पादन देणारे वाण:
देशी हरभऱ्याचे सुधारीत वाण:
अ. क्र. | `वाणाचे नाव | परिपक्वतेचा कालावधी (दिवस) | उत्पन्न (क्वी./हे.) | बियाण्यांचे प्रमाण (किलो/प्रतीएकर) |
1 | विजय (फुले जी-81-1-1) | 100-105 | 12-14 कोरडवाहू 20-22 बागायत | 20 ते 25 |
2 | दिग्विजय | 105-110 | 14 कोरडवाहू 23 बागायत | 30 |
3 | जॅकी 9218 | 105-110 | 18-20 | 30 ते 35 |
4 | फुले विक्रम | 105-110 | 16-22 | 30 |
5 | पीडीकेव्ही कांचन (AKG-1109) | 105-110 | 21-23 | 20 ते 25 |
6 | पीकेव्ही हरिता (AKG 9303-12) | 105-110 | 12-18 | 30 ते 35 |
7 | बीडीएनजी -797(आकाश) | 100-105 | 15-16 | 30 |
8 | विशाल | 110-115 | 13 कोरडवाहू 20 बागायत | 35 ते 40 |
काबुली हरभऱ्याचे सुधारीत वाण:
अ. क्र. | `वाणाचे नाव | परिपक्वतेचा कालावधी (दिवस) | उत्पन्न (क्वी./हे.) | बियाण्यांचे प्रमाण (किलो/प्रतीएकर) |
1 | कृपा | 105-110 | 18 | 40 |
2 | पीकेव्ही काबुली -2 | 105-110 | 12-15 | 40 ते 45 |
3 | पीकेव्ही काबुली -4 | 100-110 | 16-18 | 45 ते 50 |
4 | बीडीएनजीके – 798 | 105-110 | 16-18 | 40 |
5 | विराट | 110-115 | 11 कोरडवाहू 19 बागायत | 35 ते 40 |
बीज प्रक्रिया:
Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती- बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी तसेच रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. यासाठी पेरणीपूर्वी प्रत्येक किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्राम कार्बेन्डीझम एकत्रित करून प्रत्येक किलो बियाण्यास लावावे.
रासायनिक खते:
रासायनिक खताची मात्रा ही माती परीक्षण करूनच ठरवावी. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 12 किलो पालाश प्रति एकरी हरभरा पिकास द्यावे. हे नियोजन करत असताना 22 किलो युरिया +125 किलो सुपर फॉस्फेट + 20 किलो एमओपी किंवा 45 किलो डीएपी पेरणी सोबत द्यावा. गंधकाची कमतरता असणाऱ्या जमिनीत एकरी 5-8 किलो गंधक पेरणीपूर्वी जमिनीतून द्यावे.
फवारणी नियोजन: Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती
हरभरा वाढीच्या स्थितीनुसार फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच भरघोस उत्पादनात वाढ होईल.
- हरभरा लागवडी नंतर 10 ते 15 दिवसांनी,19:19:19 , 3 ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी करावी.
- त्यानंतर हरभरा पिकास 1 महिना झाल्यावर सूक्ष्म अन्नद्रव्य 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
- हरभरा फुलोरा अवस्थेत आल्यावर 00:52:34, 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी + बोरॉन(20%) 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
- घाटे पोसत असताना 00:00:50, 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 13:00:45, 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
आवश्यकतेनुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा फवारणीत समावेश करावा.
पाणी व्यवस्थापन:
हरभरा हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पिक उभडते (काडावर जाते) आणि यामुळे उत्पादनात मोठी घट येते. बागायती हरभऱ्याची पेरणी जमिनीत ओल असताना केली असल्यास पहिले पाणी 25 ते 30 दिवसांनी गरज असल्यास द्यावे. पेरणी जर पाणी पाजून केली असल्यास 35 ते 40 दिवसांनी द्यावे. दुसरे पाणी घाटे भरतेवेळी (70 ते 75 दिवसांनी) व घाटे भरतेवळी तिसरे पाणी द्यावे.
पीक संरक्षण :
हरभऱ्याच्या लागवडीमध्ये सर्वात त्रासदायक अडचण म्हणजे अळीचा प्रादुर्भाव. अळीचा जीवनक्रम, अंडी – अळी – कोष – पतंग या चार अवस्था असतात. विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव दिसतो.
हरभरा कीड नियंत्रण : रासायनिक नियंत्रण:-
1) लष्करी अळी (स्पोडोपटेरा) : ही अळी पानावर आणि घाटयावर प्रादुर्भाव करते. या अळीचा प्रादुर्भाव दिसताच क्लोरोपायरीफॉस 20%, 30मिली. प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी. किंवा फ्लूबेंडीअमाईड 48%प्रवाही 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
2)गोनोसेफँलम भुंगा : या भुंग्याचा रंग काळपट,भुरकट असतो. याच्या नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी फोरेट (10 जी) प्रति व्हेक्टरी 10 किलो जमिनीत मिसळावे. पीक उगवणीनंतर 20दिवसांनी क्लोरोपायरीफॉस 20 ई .सी., 30मिली. प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी. क्विनॉलफॉस 25% प्रवाही, 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
3) देठ कुरतडणारी अळी : ही अळी तपकिरी रंगाची मऊसर चपटी असते. रात्रीच्या वेळी जमिनीलगत रोपांची देठे तसेच फांद्या व खोड कुरतडून खातात. या किडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन 2.8 % प्रवाही, 15 मिली. प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी. किंवा क्विनॉलफॉस 25% प्रवाही, 30 मिली, प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
4) घाटे अळी : घाटे अळी ही हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे. यामुळे हरभऱ्याचे आर्थिक नुकसान होते. सुरुवातीच्या काळात अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात,यामुळे पानावर पांढरे डाग आढळून येतात.
या अळीचा प्रादुर्भाव दिसताच ईमामेकटिन बेंझोएट 5%, 7ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी किंवा क्लोअँन्ट्रीनिलीप्रोल 18.5% प्रवाही, 5मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पॉवर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकाचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
एकात्मिक कीड नियंत्रण :
- उन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी,त्यामुळे किडीचे कोष उघडे पडतात व पक्षी ते वेचून खातात. पक्षी थांबे (अँटिना) एकरी 10 ते 20 लावावे, त्यावर पक्षी बसून आळ्या नियंत्रणाचे काम होईल.
- रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे, तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
- मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
- अळीचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क 5%, फवारणी करावी.
रोग नियंत्रण:
1) मर रोग : मर हा रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डझिम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. या रोगास प्रतिकारक्षम अशा विजय, दिग्विजय, विशाल या देशी व विराट या काबुली वाणाची पेरणी करावी.
2) मूळकूज : हा रोग फ्युजेरियम सोलेनी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत अधिक ओलावा असेल तर आढळतो. जास्त ओलाव्यामुळं खोड व मुळे कुजतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीतील पाण्याचा निचरा उत्तम असावा, पिकाला जास्त पाणी देऊ नये, पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
3) मानकुजव्या : मानकुजव्या रोगाचा प्रादूर्भाव रोपावस्थेत म्हणजे पीक साधारणतः 40 ते 45 दिवसापर्यंत दिसून येतो. याच्या नियंत्रणासाठी, सोयाबीन पिकानंतर हरभरा पीक घ्यायचे असल्यास सोयाबीन पिकाचे अवशेष, काडीकचरा वेचून टाकावा. खरिपातील पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करावी.
4) करपा रोग : या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर तसेच घाटयावर लहान गोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाविस्टिन 0.1% किंवा डायथेन एम-45 (0.25%) किंवा थायोफिनेट मिथाईल 70% डब्लू पी. यापैकी एक फवारणी करावी.
काढणी :
हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडून घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी. नंतर 6-7 दिवस चांगले कडक ऊन द्यावे. हरभरा साठवून ठेवताना, त्यामध्ये कडूलिंबाच पाला घालावा जेणेकरून कीड लागणार नाही.
FAQ: शेतकऱ्यांच्याकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न-
प्रश्न: जिरायत हरभऱ्याच्या चांगल्या उगवणीसाठी काय करावे?
उत्तर: यासाठी बियाणे 4-5 तास पाण्यात भिजवून त्याची पेरणी करावी. पेरणी शक्यतो 10 सेमी. खोलीवर करावी.
प्रश्न: ढगाळ हवामानाचा हरभऱ्यावर काय विपरीत परिणाम होतो ?
उत्तर: हरभरा हे पीक थंड हवामानास प्रतिसाद देणारे पीक आहे. तथापि ढगाळ वातावरण या पिकास मानवत नाही. पिकास फांद्या, फुले लागणे तसेच घाटयामध्ये दाणे भरण्यावर सुध्दा विपरीत परिणाम दिसुन येतो. एकुणच पिकाची वाढ मंदावते आणि उत्पादनात घट होते. या व्यतिरिक्त ढगाळ हवामानामुळे घाटे अळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
प्रश्न: हरभऱ्याची खुडणी करावी की करू नये?
उत्तर: हरभरा पिकास फुलोरा येण्यापूर्वी पिकाचे शेंडे (भाजी) खुडली तरी चालते, त्याचा उत्पादनवर कुठलाही दुष्परीणाम होत नाही.
प्रश्न: हरभ्याच्या शेतात काही जागी मर होते ती टाळण्यासाठी काय करावे?
उत्तर: हरभरा पिकावरील मर रोग टाळण्यासाठी या रोगास प्रतिकारक्षम असणार्या वाणांचीच लागवडीसाठी निवड करावी. उदा. विजय, दिग्विजय, विशाल, विराट, बी.डी.एन.जी. 797, साकी 9516, जाकी 9218 ई. तसेच बियाणे पेरणी करण्यापूर्वी 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम बावीस्टिन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. यामुळे हरभरा पिकाचे रोपावस्थेत मर रोगापासुन संरक्षण होते.
प्रश्न: झाडाची पाने जांभळट झाली असतील किंवा फुलगळ होत असेल तर काय करावे?
उत्तर: 00:52:34 – 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
लेख आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद…
2 thoughts on “Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती”