प्रस्तावना:
नमस्कार शेतकरी मित्रानो. आपल्या रोजच्या आहारातील हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक, आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे. आपण halad lagvad/ हळद लागवड तंत्रज्ञान या लेखामध्ये हळद लागवडीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
हळद हे मसालावर्गीय एक प्रमुख नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे या पिकाखाली 8500 हेक्टर क्षेत्र असून, उत्पादन 42500 मेट्रिक टन इतके होते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सांगली, सातारा आणि हिंगोली या जिल्हांमध्ये जास्त प्रमाणामध्ये हळदीची लागवड केली जाते. देशपातळीवरील उत्पादनाचा विचार करता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. जगभरामध्ये वापरल्या जाणाऱ्या हळदीपैकी 80% हळद भारतात उत्पादीत होते. हळद लागवड करताना लागवडीची योग्य वेळ, सुधारित जातींचा वापर, रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर, पाणी नियोजन, कीड तसेच रोग व्यवस्थापन या गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच अधिक उत्पादन मिळेल. यासाठी नियोजनामध्ये या बाबींचा सातत्याने विचार होणे गरजेचे आहे.
हवामान:
भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण आहे. हळदीला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. कडाक्याची थंडी या पिकास मानवत नाही. थंडीमुळे हळदीच्या पानाची वाढ थांबते व जमिनीतील कंदांची वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद चांगले पोसण्यासाठी उपयुक्त असते.
जमीन:
हळद हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरीसुद्धा त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म लागवडीपूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जमिनीचा अभ्यास करूनच हळद लागवड करावयाची की नाही हे ठरवावे लागते. या पिकासाठी चांगला निचरा होणारी, तसेच मध्यम प्रतीची जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होत नाही. काही ठिकाणी हलक्या व माळरान जमिनीवर हळदीचे पीक घेता येईल. यासाठी त्या जमिनीची चांगली मशागत करणे, पोत सुधारणे, सुपिकता वाढवणे, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर करणे. या गोष्टी केल्यास माळरानावर सुध्दा या पिकातून फायदेशीर उत्पादन मिळू शकते.
पूर्व मशागत:
हळद लागवडीसाठी जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने 25 ते 30 सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. मोठी ढेकळे फोडण्यासाठी तव्याचा कुळव मारून नांगरट करावी. शेताच्या कडा 1 फुटांपर्यंत कुदळीने किंवा टिकावाणे खणून घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी जमिनीमधील काशाकुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या चिवट तणांचे अवशेष मुळांसह काढून, जाळून नष्ट करावेत.
हळद लागवडीच्या पद्धती: halad lagvad
1) सरी वरंबा पध्दत:
हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास 75 ते 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे 6 ते 7 सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
2) रुंद वरंबा पध्दत:
काही ठिकाणी अधिक उत्पादन घेण्यासाठी रुंद वरंबा पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात 20 ते 25 % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे तसेच पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना 150 सें.मी. अंतरावर प्रथम सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजरून 80 ते 90 सें.मी. माथा असलेले 15 सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करावी.
लागवडीचा कालावधी/हंगाम:
स्थानिक परिस्थितीनुसार हळद लागवडीचा कालावधी मागेपुढे होऊ शकतो. लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
halad lagvad बियाणे/बेणे निवड:
बेणे सर्वसाधारणपणे 50 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, रसरशीत असावे.
बियाणांची सुप्तावस्था नुकतीच संपून डोळे नकळत फुगलेले, थोडेसे कोंब आलेले असावेत.
गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात.
कुजलेले, अर्धवट सडलेले लागवडीसाठी वापरू नये.
लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात, मात्र हळकुंड बियाणे 30 ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत.
निवडलेली हळकुंडे निरोगी, ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, आणि एकसमान आकाराची भेसळमुक्त असावीत.
अंगठे गड्डे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक मिळते.
halad lagvad बीजप्रक्रिया:
क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 2 मिलि, आणि कार्बेन्डाझिम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) 2 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
या द्रावणात निवडलेले गड्डे 15 ते 20 मिनिटे बुडवावेत. नंतर बेणे सावलीत सुकवावे.
त्यानंतर लागवडीपूर्वी 1 लि. जर्मिनेटर 100 लि. पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये 100 किलो बेणे 10 मिनिटे भिजवून नंतर सुकवून लावावे.
यामुळे कंद मर, कंदकूज होत नाही. बियाणे लवकर, एकसारखे उगवते.
हळदीच्या सुधारित जाती:
1. फुले स्वरूप: या जातीची हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे 5.19% इतके असून उतार 22% इतका मिळतो.
2. सेलम: हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण 4.5 % असते. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी या जातीची शिफारस केली आहे.
3. कृष्णा (कडाप्पा ): ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन 1984 साली प्रसारित केली आहे. या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो.
4) राजापुरी: या जातीमध्ये हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. हळदीच्या वायदे बाजारातील भाव बऱ्याच वेळा या जातीवरून ठरला जातो. म्हणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.
5. खाण्याची हळद (Curcuma Longa ): या जातीची 96% लागवड भारतात होते. ही बहुवर्षीय जात असून बोंड, कंद आखूड व जाड असतो.
6. कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia): ही जात वार्षिक असून कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फुले सुवासिक असतात, औषधासाठी उपयोग होतो. .
7. इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot): मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च 12.5 % असून त्याचा उपयोग मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.
8. आंबेहळद (Curcuma Amada): कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. ही हळद थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते.
9. काळी हळद (Curcuma Caesia): या हळदीचे ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक असल्याने सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये 9.76% सुवासिक तेल असते. बंगालमध्ये आढळते.
10. कचोर (Curcuma Zedoria): या जातीची ताजी मुळे औषधाकरिता व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो. ही जात वार्षिक असून कोकणात सर्वत्र या जातींची लागवड आढळते.
बेणे लागवड:
हळदीची मातृकंदापासून करतात. एकरी 1000 किलो बियाणे आवश्यक असते. या कंदापासून तयार केलेल्या 30 दिवसाच्या वयाच्या रोपापासूनही लागवड करतात.
लागवडीच्या वेळी गड्डे पुर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
आंतरमशागत (भरणी करणे):
हळद लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरीमधील माती कुदळीच्या सहाय्याने दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजे ‘भरणी करणे’ होय. माती लावताना कंद पूर्णपणे झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पिकास हलकेसे पाणी द्यावे. यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते.
खत व्यवस्थापन:
हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकास सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी एकरी 5 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत, करंजी किंवा निंबोळी पेंड लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार एक एकर क्षेत्रासाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश, 10 किलो मायक्रोनुट्रीएंट (मिक्सकॉम्बी) द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावे. नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी द्यावे. राहिलेला दुसरा हप्ता भरणीच्यावेळी द्यावा. या पिकास शक्यतो भरणीनंतर कोणतीही खते देऊ नयेत.
पाणी व्यवस्थापन:
हळदीची लागवड एप्रिल ते जून महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात या पिकास पाण्याची नितांत आवश्यकता असते. या कालावधीत आंबवणीचे पाणी लगेच 4 ते 6 दिवसांच्या अंतराने द्यावे. पाऊस पडेपर्यंत, जमिनीच्या प्रत वारीनुसार हा कालावधी कमी-जास्त ठेवावा लागतो. तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर, पावसाचे पाणी शेतजमिनीत साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळयामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर किमान 12 ते 5 दिवस ठेवावे. परिपक्वतेनंतर म्हणजेच पीक काढणीच्या 15 दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा.
आंतरपिकांची लागवड:
मुख्य पिकाशी स्पर्धा न करता हळद पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करणाऱ्या आंतरपिकांची निवड करावी.
हळदीची मुळे आणि आंतरपिकाची मुळे जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
आंतरपिके ही हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत.
तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये हळद पीक चांगले वाढते.
हळद लागवड केल्यापासून 3 ते 3.5 महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. म्हणून हळकुंडे येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी/ कापणी झाली पाहिजे.
आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड करावी.
halad lagvad फवारणी:
कीड नियंत्रण:
1. कंदमाशी: या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात. याच्या नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी प्रोटेक्टंट 30 ग्रॅम आणि क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मी.ली. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान 1 ते 2 फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.
2. पानातील रस शोषून घेणारा ढेकूण: या किडीची पिल्ले पानाच्या पाठीमागे एकत्रितपणे आढळून येतात. ते पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषून घेतात. या किडींचा उपद्रव झालेली पाने तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात. तिच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट 25 ग्रॅम + मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस. सी. 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
3. पाने गुंडाळणारी अळी: हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते. किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
4. सुत्रकृमी : काही भागामध्ये या पिकावर सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस 5 किलो /हे. शेणखतात मिसळून द्यावा किंवा फोरेट 10 जी. हेक्टरी 25 किलो याप्रमाणात द्यावे किंवा 18 ते 20 क्विं/हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.
रोग नियंत्रण:
1. कंदकूज (गड्डे कुजव्या) : हळद तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे 50% पर्यंत नुकसान होऊ शकते. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला दिसतो. हा गड्डा दाबून पाहिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना/आंतरमशागत करताना कंदास ईजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्सिल 8% + मॅकोझेब 64% हे संयुक्त बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडॅझिम (50 डब्ल्यू. पी.) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशाकांची आलटून पालटून फवारणी करावी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस पाच किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावा.
2. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) : या रोगामध्ये पानावरती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून येते. हा रोग कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे होतो. यांच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डोमिश्रण तयार करून फवारणी करावी.
3. पानावरील ठिपके (टिक्का) : हा बुरशीजन्य रोग असून टॉंफ्रिन मॅक्यूलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आर्द्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात. जमिनीलगतच्या पानावर होऊन तो वरील पानावर पसरतो. या रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. त्यासाठी लिफ ब्लॉच या रोगासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो.
काढणी :
हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय. चांगल्या उत्पादन देणाऱ्या हळद पिकाची काढणी 8.5 ते 9 महिन्यांनी करावी. पक्व झालेल्या हळद पिकाच्या झाडाचा पाला जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.
हळद शिजवणे वाळविणे व पॉलिश करणे:
हळद शिजवताना डिझेलच्या बॅरलपासून बनविलेले 1.5 फूट उंचीचे व 2 फुट व्यासाचे, 4ते 5 सच्छिद्र ड्रम 5 फुट व्यासाच्या मोठ्या कढईमध्ये पाणी ओतून आतील पाण्याची पातळी ड्रमच्या उंचीच्या वर 4 ते 5 से.मी. इतकी ठेवली जाते. नंतर ड्रम जाड गोणपाटाने झाकून घेतले जातात. या पद्धतीने हळद फक्त 25 ते 30 मिनिटात चांगल्या प्रकारे शिजते. त्यावेळी पाण्याचे तापमान 90 डी. ते 100 डी. सेंटीग्रेट असते. हळद शिजल्यानंतर चुलवानामध्ये इंधन टाकण्याने प्रमाण कमी केले जाते. शिजवलेली हळद वाळवण्यासाठी उन्हात 10-15 दिवस जमिनीवर पसरवावी. अशा हळदीस वाळविल्यानंतर पॉलिश केल्यास आकर्षक रंग प्राप्त होतो आणि उताराही चांगला मिळतो. या हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारभावही चांगला मिळतो.
FAQ – प्रश्नउत्तरे:
- हळद लागवडीसाठी एकरी किती बेणे लागते.
हळद लागवडीसाठी एकरी 1000 किलो पर्यंत बेणे / कंद लागते.
- हळदीची लागवड कधी करावी?
हळद लागवडीसाठी 15 मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी उत्तम समजला जातो.
- हळद पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे ?
हळद लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना फुस्ट (ॲट्राझिन) हे तणनाशक 300 ग्रॅम प्रति एकरी फवारणी करावी
- हळदीसाठी सर्वोत्तम रासायानिक खत कोणते आहे ?
हळद लागवडीसाठी शिफारसी प्रमाणे खत व्यवस्थापन करावे. खते वापरताना युरिया,डी ए पी, 10:26:26 तसेच पांढऱ्या पोटॅशचा वापर करावा.
Nice information
Thanks 👍