गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३१.७२ क्वि./ हेक्टर) तुलना करता महाराष्ट्र राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी, योग्य रितीने पेरणी, पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, बियाण्याचे योग्य प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याच्या योग्यवेळी पाळया, आंतरमशागत , किड व रोग यापासून पीक संरक्षण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या सर्व बाबींची सर्वसमावेशक माहिती आपण gahu lagwad 2024-गहू लागवड या लेखामध्ये पाहणार आहोत.
जमिनीची निवड:
बागायती गव्हासाठी भारी व खोल, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जिरायत गव्हासाठी मात्र जास्त पाऊस पडणाऱ्या व जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी अशा जमिनीची निवड करावी. हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.
पूर्व मशागत:
गहू पिकाच्या मुळया जमिनीत खोलवर जातात, म्हणून या पिकासाठी जमिन चांगली भुसभुशीत असावी. गव्हाच्या योग्य वाढीसाठी खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १०ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत पसरवून टाकावे.
पेरणीची वेळ:
गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. या परिस्थितीचा विचार करता जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडयात करावी. बागायत गव्हाची पेरणी वेळेवर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी उशिराने केल्यास, गव्हाचे उत्पादन घटते असे आढळून आलेले आहे. पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी.
पेरणी पद्धत:
गव्हाची पेरणी उभी आडवी अशा दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी जेणेकरून अंतर्गत मशागत करणे सोयीचे होते. बागायत गव्हाची वेळेत पेरणी करत असल्यास, दोन ओळीतील अंतर २० ते २२ सेंटीमीटर व पेरणी उशिरा करत असल्यास पेरणीतील अंतर १८ सेंटिमीटर ठेवावे. बियाणे जास्त खोलवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी, ५ ते ६ सेंमी. वर पेरणी केल्यास केल्यास बियाणाची उगवण चांगली होते.
बियाणे:
gahu lagwad 2024-गहू लागवड- गव्हाच्या भरघोस उत्पादनाकरीता एकरी ८ ते ९ लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी एकरी:
जिरायत पेरणी ३५ ते ४० किलो
बागायत वेळेवर पेरणी ४० किलो
बागायत उशिरा पेरणी ५० ते ६०किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सुधारित वाण: gahu lagwad 2024-गहू लागवड
पेरणीच्या वेळेनुसार खालील सुधारित वाणांचा वापर केल्यास आपल्या उत्पादनात निश्चित वाढ होईल. पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरून १२९२ किलोपर्यंत वाढले आहे. आपल्या सोयीसाठी खाली हा तक्ता दिला आहे.
वाण | पेरणीची वेळ | वैशिष्ट्य |
त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू: ३०१) | बागायत वेळेवर पेरणी | १. दाणे टपोरे आणि आकर्षक. २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. चपाती साठी उत्तम ४. पीक ११० ते ११५ दिवसांत कापणीस तयार होते |
तपोवन (एन आय ए डब्ल्यू :९१७) | बागायत वेळेवर पेरणी | १. दाणे मध्यम परंतु ओब्यांची संख्या जास्त २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. चपाती साठी उत्तम ४. पीक ११० ते ११५ दिवसांत कापणीस तयार होते. |
गोदावरी (एन आय डी डब्ल्यू: २९५) | बागायत वेळेवर पेरणी | १. दाणे टपोरे, चमकदार, आकर्षक २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३.रवा,शेवया,कुरड्या यासाठी उत्तम वाण ४. पीक ११० ते ११५ दिवसात कापणीस तयार होते. |
सरबती (एम ए सी एस-६२२२) | बागायत वेळेवर पेरणी | १. दाणे टपोरे आणि आकर्षक. २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. चपाती साठी उत्तम ४. पीक ११० ते ११५ दिवसांत कापणीस तयार होते |
५. निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू: ३४) | बागायती उशिरा पेरणी | १. दाणे मध्यम आकर्षक २. तांबेरा रोगास प्रतिकारक. ३. चपाती साठी उत्तम वाण ४. पीक १०५ ते ११० दिवसांत कापणीस तयार होते. |
६. लोक -1 | बागायत वेळेवर किंवा उशिरा पेरणी | १.दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक.२.चपाती साठी उत्तम ३. पीक ११० ते ११५ दिवसांत पक्व होते. |
७. फुले समाधान (एनआयए डब्ल्यू: १९९४) | बागायत वेळेवर किंवा उशिरा पेरणी | १. तांबेरा रोगास तसेच मावा किडीस प्रतिकारक २.चपाती साठी उत्तम ३.प्रचलित वाणापेक्षा ९ ते १० दिवस लवकर कापणीस तयार होतो. ४.वेळेवर पेरणी केल्यास १०५ ते ११०दिवसांत पक्व होतो. ५.उशिरा पेरणी केल्यास ११० ते ११५ दिवसात फक्त होतो. |
८. पंचवटी (एन.आय.डी.डब्ल्यू: १५) | जिराईत पेरणी | १.दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक. २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. रवा, शेवया,कुरड्या साठी उत्तम. ४. पीक १०५ ते ११० दिवसांत कापणीस तयार होते. |
९. नेत्रावती (एन आय ए डब्ल्यू: १४१५) | जिराईत किंवा मर्यादित सिंचनाखालील क्षेत्र | १. तांबेरा रोगास प्रतिकारक २. जिरायती क्षेत्रात १०५ ते १०८ दिवसात व मर्यादित सिंचनाखाली १०८ ते १११ दिवसात कापणीस तयार होतो. |
खत व्यवस्थापन:
माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याचे प्रमाण कमी- जास्त असल्यास त्याप्रमाणे रासायनिक खते कमी करावीत किंवा वाढवावीत. गव्हाच्या पिकासाठी २५ किलो नत्र (५५ कि. युरिया), २५ किलो स्फुरद (१५५ कि. सिंगल सुपर फॉस्फेट) व २० किलो पालाश प्रति एकरी पेरणीच्या वेळी द्यावे. तसेच मायक्रोनुट्रीएंट १० किलो आणि सल्फर ९०% – ८ किलो प्रति एकरी द्यावे. पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी २५ किलो नत्र दयावे.
गहू फवारणी:
पीक वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी घेताना आपल्या शेती सल्लागाराची मदत घेऊन नियोजन करावे.
गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन खालील फवारण्या घेता येतील.
- पेरणीनंतर ४५ दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी.
- ७० दिवसांनी १३:४०:१३ या विद्राव्य खताची फवारणी करावी.
- पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के युरीयाची फवारणी करावी.
आंतरमशागत:
गहू पिकात हराळी, चांदवेल, चिमणचारा, गाजर गवत यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. यामुळे तणांचा नाश तर होतोच पण जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
गव्हातील तण (अरूंद पानांचे आणि रूंद पानांच्या) नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी UPLया कंपनीचे वेस्टा हे तणनाशक १६० ग्राम किंवा डूपॉन्ड या कंपनीचे अलग्रीप हे तणनाशक ८ ग्राम प्रति २०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या २ ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस पाणी देऊ नये.
पाणी व्यवस्थापन: gahu lagwad 2024-गहू लागवड
पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. मध्यम ते भारी जमिनीत २१ दिवसांच्या अंतराने गहू पिकास पाणी द्यावे. आपल्या अनुभवानुसार जमीन मागेल त्यानुसार पिकास पाणी द्यावे.
पीक वाढीच्या खालील महत्वाच्या अवस्थेत पिकाला पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
१. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था : पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
२. कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
३. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था : पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस
४. दाणे भरण्याची अवस्था : पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
पीक संरक्षण:
गहू या पिकाचे खोडकिडा, मावा, उंदीर व तांबेरा यांच्यापासून जास्त नुकसान होते.
- मावा, खोडकिड या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यूजी ५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- तांबेऱ्याची लक्षणे दिसून आल्यास मॅन्कोझेब ३५% एस.सी. किंवा प्रोपीकोनॅझोल २५% एस.सी हे बुरशीनाशक फवारावे.
कापणी व मळणी:
पीक पक्व होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास गव्हाचे दाणे शेतात झडून नुकसान होऊ शकते. म्हणून पीक पक्व होण्याच्या २-३ दिवस अगोदर कापणी करावी. कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ % असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा उपलब्धतेनुसार गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.
FAQ: शेतकऱ्यांच्याकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न : पेरणीपूर्वी गव्हाच्या बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी ?
उत्तर : पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ७५ % डब्ल्यू एस या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी, तसेच प्रति दहा किलो बियाण्यास २५०ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी यामुळे आपल्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते.
प्रश्न : गहु पेरणीची योग्य वेळ कोणती ?
उत्तर : जिराईती गव्हाची पेरणी पाऊस बंद झाल्यावर, परंतु वाफसा आल्यानंतर करावी. पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी.
प्रश्न : बागायत गव्हाची पेरणी उशिरात उशिरा कधीपर्यंत करावी?
उत्तर: गहू पिकासाठी उत्पादन व हवामान यांचा परस्पर संबंध आहे. याचा विचार करता गव्हाची पेरणी उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत करावी.
प्रश्न : गव्हाची प्रत सुधारण्यासाठी काय उपाय योजना करता येईल ?
उत्तर : गव्हाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच दाण्यांना रंग आणि चकाकी येण्यासाठी,
पेरणीनंतर ४५ दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी.
७० दिवसांनी १३:४०:१३ या विद्राव्य खताची फवारणी करावी.
पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के युरीयाची फवारणी करावी.
प्रश्न : गव्हावर येणाऱ्या करपा रोगाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल ?
उत्तर : करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी या रोगाची लक्षणे दिस लागताच मॅन्कोझेब ३५%एस.सी या बुरशीनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.
हा लेख तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांना, ग्रूपमध्ये जरूर शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा…
ityambhut mahiti dilyabaddal aabhar.
Very useful information.keep doing this work.