ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग (cactus) कुटुंबातील फळ आहे. हे मूळचे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील फळ पिक आहे. मुख्यतः कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशाबरोबरच सध्या भारतासारख्या पाश्चात्य देशांमध्ये याची लागवड सुरू झाली आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे पीक घेतले जाते. पारंपरिक शेतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करतो परंतु अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. आर्थिक उन्नती तर सोडाच परंतु दैनंदिन गरजा ही पूर्ण होत नाहीत . त्यामुळेच आधुनिक शेतीच्या माध्यमातून पर्यायी पिकाचा विचार केल्यास Dragon Fruit Cultivation/ ड्रॅगन फ्रुट हे फायदेशीर आहे. भारतीय बाजारात याची मागणी वाढत आहे.
हे फळ मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेतच पण याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढण्यास मदत होते. या व्यतिरीक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे याला सुपर फूड असे नाव दिले आहे. सध्या आईस्क्रीम, जेली, जाम, वाईन आणि फेस पॅक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या फळाचाऔद्योगिक वापर होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेवुन सन 2021-22 या वर्षापासुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी, कृषी विभागाने प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. आजच्या या लेखात आपण Dragon Fruit Cultivation/ ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
हवामान:
ड्रॅगनफ्रूट या पिकाच्या वाढीसाठी उष्णकटिबंधीय हवामान म्हणजेच सुमारे 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकते परंतु सेंद्रिय कर्ब चांगल्या असणाऱ्या पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत याचे चांगले उत्पन्न मिळू शकते.
ड्रॅगनफ्रूट ची नर्सरी:
ड्रॅगनफ्रूटची रोपे बियांद्वारे किवा छाट कलम पध्दतीने तयार केली जाऊ शकतात. कलम पध्दतीद्वारे अगदी सोप्या पद्धतीने, जलद रोपे तयार केली जातात. साधारण 1 वर्ष वयाची गडद हिरव्या रंगाची 20-25 सेमी. लांबीची फांदी, रोपे तयार करण्यासाठी निवडावी. निवडलेल्या फांदीवर कोणत्याही प्रकारच्या रोगाची लक्षणे नसावीत, जेणेकरून नवीन शेतामध्ये रोगाचे संक्रमण होणार नाही.
फांदी लावण्यापूर्वी फांद्यांना बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावे व पॉलिथीनच्या पिशवीमध्ये (10×25 सेंमी) तसेच गादी वाफा तयार करून रोपण करता येते. गादी वाफ्यावर रोपे बनवण्यासाठी अंदाजित 3 फुट रुंद आणि 1फुट उंच असा गादी वाफा शेणखत मिसळून तयार करून घ्यावा. या गादी वाफ्यावर 15-20 सेंमी च्या अंतरावर ड्रॅगनफ्रूट ची कटिंग लावावीत. नियमित अंतराने पाणी देत रहावे. गादी वाफ्यावर रोपे तयार केल्याने पॉलिथीनचा खर्च कमी होऊन खूप सोप्या पद्धतीने ड्रॅगनफ्रूट ची नर्सरी तयार केली जाऊ शकते. 1.5 ते 2 महिन्यानंतर निरोगी रोपांची मुख्य शेतजमिनीवर लागवड करावी.
लागवड पद्धती:
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर निश्चित करावे लागते. ड्रॅगनफ्रूट हे वेलवर्गीय फळपीक आहे त्यामुळे याच्या वाढीसाठी, आधारप्रणाली उभारणे आवश्यक असते. लागवडी पूर्वी सिमेंटचे खांब उभे करावे लागतात. या खांबांचे आकारमान खालीलप्रमाणे —
उंची: 6 ते 7 फुट
रूंदी / जाडी: 4 इंच
वजन: 40-45 किलो
खांबाच्या टोकावर 8 ते 10 मिलिमीटर रॉड असावा, ज्याच्यावर आपण चौकोनी अथवा गोलाकार प्लेट बसवणार आहोत. चौकोनी प्लेटची मोजमापे खालील प्रमाणे असावीत.
लांबी- 50 ते60 सेमी., रुंदी- 50 ते60सेमी., जाडी- 3ते4 सेमी., वजन- 20ते25किलो.
Dragon Fruit लागवडीचे अंतर:
रोपांच्या लागवडीकरीता 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खोदुन घ्यावेत. या खड्डयाच्या मधोमध 1 फुट खाली व 5/6 फुट जमिनीच्या वर राहील अशा पध्दतीने सीमेंटचे खांब उभे करावेत. त्यानंतर प्रत्येक खांबाच्या ठिकाणी 10-15 किलो शेणखत मिसळून वाफे बनवावेत. वाफे तयार करताना 4 झाडांना सर्व बाजूंनी एकसमान खते द्यावीत. जमिनीच्या प्रकारानुसार खत मात्रेचे प्रमाण ठरवावे . खांबाच्या चारही बाजूंनी प्रत्येकी 1रोप लावावे. रोपे खांबाच्या जेवढ्या जवळ लावता येतील तेवढी जवळ लावावीत जेणेकरून, नवीन फुटवा खांबाला योग्य रीतीने बांधता येईल. येणारे नवीन फुटवे खांबाच्या टोकाला बसवलेल्या प्लेट मधील छिद्राद्वारे खांबाला बांधावेत. एका खांबाजवळ 4 रोपे लावली जातील याप्रमाणे 4.5 x 3 मी. अंतराकरीता एकरी 1200 रोपे लागतील.
Dragon Fruit Cultivation खत व्यवस्थापन:
या पिकासाठी रासायनिक खते खूपच कमी प्रमाणात वापरली जातात. सेंद्रिय खते जसे की गांडूळ खत, शेणखत, लिंबोळी खत यांचा अधिक वापर होतो. रासायनिक खताचा समतोल प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. खडकाळ जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी 500 ग्रॅम नत्र, 500ग्रॅम स्फुरद आणि 300ग्रॅम पालाश या प्रमाणात, चार भागांमध्ये विभागणी करून पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी देण्यात यावीत. ठिबकद्वारे विद्राव्य खते,सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. योग्य वाढ झालेल्या झाडांना दरवर्षी 15 ते 20 किलो शेणखत द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
हे पीक कमी पाण्यावर येणारे आहे, तसेच ते दीर्घकाळपर्यंत पाण्याचा ताण सहन करू शकते. कडक उन्हाळ्यामध्ये प्रत्येक झाडाला रोज 1 ते 2 लिटर पाणी देण्याची शिफारस केली जाते. हिवाळा व उन्हाळ्यात नियमित अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. परंतु पाण्याची मात्रा एका वेळेस खूप जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी. योग्य वाढ झालेल्या पिकास एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याचा ताण दिल्याने अधिक प्रमाणात फुलधारणा होण्यास मदत होते. ठिबक सिंचनाचा अवलंब फायदेशीर ठरतो.
छाटणी:
लागवडीनंतर, सरळ वरच्या दिशेने वाढणाऱ्या फांद्याना प्लेटच्या दिशेने वाढू द्यावे आणि जमिनीच्या दिशेने वाढणारे किंवा आडवे वाढणारे फुटवे काढून टाकावेत. रोगट व अनावश्यक असणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात आणि त्या जागी बुरशीनाशकाची फवारणी करावी. झाडाला छत्रीचा आकार द्यावा. फळांची काढणी संपल्यानंतर झाडांची दरवर्षी नियमित छाटणी करणे आवश्यक आहे.
रोग/ कीड व्यवस्थापन:
या पिकावर शक्यतो रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही, रोगप्रतिरोधक असे हे पीक आहे. मिलीबग सारखी सामान्य समस्या या पिकावर उद्भवू शकते की जीचे नियंत्रण सहज शक्य आहे. परंतु काही ठिकाणी खोड कूज (Stem rot), कँकररोग (Canker), अँथ्रॅक्नोस( Anthracnose) यांसारखे रोग व फळमाशीसारखे कीटक आढळून येतात. यासाठी एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे.
Dragon Fruit Cultivation फळांची काढणी:
लागवडीनंतर 18 ते 22 महिन्यांनी फुले व फळे येण्यास सुरुवात होते. फुले आकाराने मोठी असतात आणि ती संध्याकाळी बहरतात. या पिकामध्ये फळ धारणा होण्याकरिता प्रभावी परागीकरण होणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी लागवड करताना मिश्र प्रजाती एकत्रितपणे रोपण केल्याने फायदेशीर ठरू शकते. हे फूल संध्याकाळी-रात्री उमलत असल्याने वटवाघूळ, होक पतंग, आणि मधमाशी इत्यादी पासून मुख्यतः परागीकरण होते.
हिरव्या रंगाचे हे फळ 30 ते 35 दिवसात परिपक होते. पिकल्यानंतर याचा रंग लाल किंवा गुलाबी दिसतो. फळधारणेचा हा हंगाम जूनपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत असतो या दरम्यान 4 ते 5 वेळा फळांची काढणी केली जाते. सुरुवातीपासून योग्य नियोजन केल्यास ड्रॅगन फ्रुट चे चांगले उत्पादन मिळू शकते. एका झाडाला साधारण 40 ते 100 फळे येतात. एका वर्षात एका झाडापासून 15 ते 20 किलो उत्पन्न मिळते. एक एकर शेतीतून दरवर्षी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र त्यासाठी सुरुवातीच्या काळात चार-पाच लाख रुपये खर्च करावे लागतील…