biofertilizers: जैव/जीवाणू खते भागवू शकतात वाढत्या जगाची भूक…

नत्र, स्फुरद व पालाश (एन.पी.के.) हे पिकांना लागणारे महत्त्वाचे अन्नघटक आपण रासायनिक खतामार्फत जमिनीतून देतो. शेतकऱ्यांनी टाकलेली किंवा जमिनीत उपलब्ध असलेली ही रासायनिक खते (अन्नद्रव्ये) पिकांना जशीच्या तशी लागू होत नाहीत. त्यांचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जमिनीतील सूक्ष्मजीव/जीवाणू  करत असतात.

biofertilizers जैव/ जीवाणू खते म्हणजेच जमिनीत आढळणारे उपयुक्त जीवाणू असतात जे नैसर्गिक स्त्रोतापासून प्रयोगशाळेत तयार केले जातात. जीवाणू खते ही सेंद्रीय व सजीव असतात. त्यांचा पिकावर, जमिनीवर आणि एकूणच पर्यावरणावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. याउलट जीवाणू खतांच्या वापरामुळे जमिनी जिवंत होतात. मातीची सुपीकता वाढते आणि त्यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो. रासायनिक खतांच्या तुलनेने जीवाणू खते स्वस्त असतात. यांच्या वापरामुळे रासायनिक खतांची बचत होते.

biofertilizers
biofertilizers

मातीमध्ये विपूल प्रमाणात जीवाणू उपलब्ध आहेत. या जैवविविधतेचा पिकांच्या वाढीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. कारण हे मातीतील जीवाणूच वाढत्या जगाची भूक भागवू शकतात असे संशोधकांचे मत आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी ही खते वरदानच आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम भोगणाऱ्या आजच्या जगाला जीवाणू खतांचे महत्त्व पटले आहे. म्हणूनच आधुनिक शेतीमध्ये यांचा वापर वाढला आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया.

Biofertilizers: जीवाणू खते म्हणजे काय?

जैव/ जीवाणू खते हे असे पदार्थ आहेत, की ज्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात. हे जमिनीत मिसळल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढवतात. वनस्पतींना आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा वाढवून पिकांच्या वाढीसाठी चालना देतात.

जीवाणू खतांचे प्रकार:

जीवाणू खतांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत

1. नत्राचे स्थिरीकरण करणारी जीवाणू खते:

यामध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, निळे/ हिरवे शेवाळ इत्यादींचा समावेश होतो.

i) रायझोबियम-

हे जीवाणू  शेगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी तयार करतात. या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन तो मुळावाटे पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जीवाणू करतात. एकच रायझोबियम जीवाणू  खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. वेगवेगळ्या पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम खतच वापरावे.

ii) ॲझोटोबॅक्टर-

हे जीवणू पिकांच्या मुळाभोवती राहून नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना नायट्रोजन उपलब्ध करून देतात. हे जीवाणू  खत शेंगवर्गीय पिके सोडून(वगळून) इतर सर्व एकदल, तृणधान्य, फळ पिकांना वापरता येते.

iii) निळे, हिरवे शेवाळ-

ही एकपेशीय तंतुमय शरीर रचना असलेली पानवनस्पती आहे. हे पाण्यात राहून हवेतील मुक्त स्थितीतील नत्राचे स्थिरीकरण करते. भात खाचरामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे या शेवाळाची चांगली वाढ होते. त्यामुळे भात शेतीत याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

2. स्फुरद विरघळणारे जीवाणू खते (PSB):

यामध्ये रायझोबियम, बेसिलस पॉलिमिक्झा, ॲस्परजिलस, स्ट्रेप्टोमायसिस आवामोरी इ. समावेश होतो.

रासायनिक खतामधून दिलेला बराचसा स्फुरद/ फॉस्फेट जमिनीतील रासायनिक प्रक्रियेमुळे स्थिर झालेला असतो. अशा घट्ट स्वरूपातील स्फुरद विरघळवून, द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू  करतात. जेणेकरून पिकांची मुळे तो सहज शोषून घेऊ शकतात. यामुळे पिकांच्या वाढीला चालना मिळते. पेशींच्या जलद वाढीमुळे वनस्पतीची रोगप्रतिकारशक्ती आणि दुष्काळ सहनशीलता वाढते.

3. पालाश विरघळणारे जीवाणू (KSB):

जमिनीमध्ये पालाश/ पोटॅश या अन्नद्रव्याची भरपूर उपलब्धता आहे. परंतु तो स्थिर स्वरूपात असल्यामुळे पिकांना उपलब्ध होत नाही. फ्राटेरीया ऑरेंशिया हे जीवाणू  रासायनिक क्रियेद्वारे पालाश मुक्त करून पीकांना उपलब्ध करून देतात. KSB च्या वापरामुळे धान्य आणि फळे यांचा आकार व गुणवत्ता सुधारते.

जीवाणू  खतांचा वापर:

माती उपचार-

जीवाणू खतांचा वापर हा जमिनीवर उपचार करण्यासाठी केला जातो. माती उपचारांमध्ये biofertilizers जीवाणू खते ही कंपोस्ट खतात मिसळून दिली जातात. एकरी 2 किलो जीवाणू खत हे कंपोस्ट खत, चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खताबरोबर व्यवस्थित मिसळून देता येते.

उभ्या पिकामध्ये वापर करावयाचा झाल्यास 500 ग्रॅम जीवाणू खत 200 लिटर पाण्यामधून आळवणी करू शकतो किंवा ड्रिप मधून सोडता येते.

यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो. जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम न होता, जमिनीची उत्पादकता जीवाणू खतांमुळे वाढते.

biofertilizers: बीज प्रक्रिया-

  • बियाण्यांची चांगली आणि लवकर उगवण होण्यासाठी जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
  • साधारण  1लिटर स्वच्छ पाण्यामध्ये 200-250 ग्रॅम जीवाणू  संवर्धन मिसळावे.
  • 10 ते 15 किलो बियाणे प्लास्टिक कागद किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरून घ्यावे.
  • या बियाण्यावर एकसारखा लेप बसेल असे biofertilizers जीवाणू संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.
  • नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. हे करत असताना बियाण्याच्या पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून 24 तासाच्या आत पेरावे.

अशाच प्रकारे उसाच्या कांड्या, आले, हळद, बटाट्याचे बेणे यावर या खतांचा बीजप्रक्रियेसाठी वापर करता येतो.

जीवाणू खतांचे फायदे:

1. जीवाणू खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते.

2. ही खते तुलनेने स्वस्त असून वापरणे सोपे आहे.

3. यांच्या वापरामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते.

4. पुढच्या पिकांनाही त्याचा फायदा होतो.

5. यांच्या वापरामुळे रोगांचे संक्रमण रोखले जाते.

6. नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकांची जोमदार वाढ होते.

7. biofertilizers जीवाणू खते वापरल्याने रासायनिक खतांची बचत होते.

8. जमीन, पर्यावरण व एकूणच मानवी जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

जीवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी:

1. जीवाणू  खतांची पाकिटे/बाटली थंड व कोरड्या जागी ठेवावी.

2. कोणत्याही रासायनिक खताबरोबर biofertilizers जीवाणू  खते मिसळू नयेत.

3. बीजप्रक्रिया करताना अगोदर बुरशीनाशक, किटकनाशक आणि त्यानंतर (ते सुकल्यावर) जीवाणू खताची प्रक्रिया करावी.

4. प्रत्येक पिकाचे जीवाणू संवर्धन वेगवेगळे असते शिफारसीनुसार त्या पिकाचे जीवाणू संवर्धन असेल ते त्याच पिकास वापरावे.

5. जीवाणू खताच्या पाकिटावर जी अंतीम तारीख (Expiry date) दिलेली असेल त्या तारखेपर्यंतच वापर करावा.

Leave a Comment