दिवसेंदिवस शेतीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ‘ए आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेळेत किडींची ओळख आणि प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य होते. AI technology for pest control ‘ए आय’ आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कीटकनाशकांचा योग्य आणि संतुलित वापर करता येतो. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये रासायनिक अंश शिल्लक राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
कृषी क्षेत्रात किड नियंत्रण हे खूप महत्त्वाचे असते. बरेचदा अयोग्य कीड व्यवस्थापनामुळे मोठे आर्थिक नुकसान होते व उत्पादनातही घट होते. सध्या शेतकरी विविध किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात परंतु या कीटकनाशकांचे अंश माती, पाणी आणि पीक उत्पादनामध्ये शिल्लक राहतात. त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. यासाठीच एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती फायदेशीर ठरते. एकात्मक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जैविक, भौतिक, यांत्रिक आणि रासायनिक पद्धतींचा समावेश होतो. यामुळे केवळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून राहण्याऐवजी निसर्गपूरक आणि विज्ञानाधिष्ठित उपायांचा अवलंब केला जातो.

कीडनाशक अंशाचे परिणाम
अति प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे त्याचे पीक उत्पादन, माती आणि पाण्यात अंश शिल्लक राहतात. त्याचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.
कीटकनाशकांचे अंश दीर्घकाळ अन्नधान्यत राहिल्यास मज्जासंस्थेचे विकार, कॅन्सर, प्रजनन समस्या आणि शारीरिक दुर्बलता निर्माण होण्याची शक्यता असते.
पर्यावरणीय धोका
माती आणि जल प्रदूषणात वाढ होते. तसेच निसर्गातील जैवविविधतेला धोका निर्माण होतो.
मधमाशीसारखे उपयुक्त मित्र कीटकांवर परिणाम होतो.
निर्यातीवर परिणाम
पीक उत्पादनामध्ये कीटकनाशकांचा अधिक प्रमाणात वापर केल्यास त्याचे अंश उत्पादनामध्ये शिल्लक राहतात. असे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, निर्यातीवेळी नाकारले जाते.
‘ए आय’ तंत्रज्ञानावर आधारित कीड नियंत्रण
ड्रोन आणि सेन्सरद्वारे निरीक्षण
ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांचे नियमित निरीक्षण करता येते. कीडग्रस्त क्षेत्र ओळखण्यासाठी थर्मल इमेजिंग आणि मल्टीस्पेक्ट्रल कॅमेऱ्यांचा वापर केला जातो.
मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्स (माहितीचे विश्लेषण)
ड्रोन आणि उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती आणि ‘ए आय’ च्या मदतीने हवामान अंदाज, मातीचे आरोग्य, कीड प्रादुर्भावाचा अंदाज लावणे शक्य होते. या माध्यमातून मागील काही हंगामातील माहिती संकलित केली जाते. उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने ‘ए आय’ तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप द्वारे किडींची ओळख आणि नियंत्रणासाठी उपाय सुचवले जातात. त्यामुळे कीड नियंत्रण अधिक सोपे होते.
प्रादुर्भावाच्या ठिकाणीच फवारणी
‘ए आय’ आधारित फवारणी तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण पिकातील केवळ किडीचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी अचूक फवारणी करणे शक्य होते. जेणेकरून रासायनिक कीटकनाशकांचा अतीवापर टाळला जातो आणि अतिरिक्त खर्चही कमी होतो.

‘ए आय’ आधारित स्मार्ट ट्रॅपिंग सिस्टम (कीटक सापळे )
स्मार्ट फेरोमन(कामगंध) सापळे हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे सापळे प्रत्येक किडीची ओळख पटवून, संकलित माहितीच्या आधारे विशिष्ट कीटकांच्या फेरोमनचा वापर करून किडींना आकर्षित करतात.
हे सापळे किडींच्या हालचालींचे निरीक्षण, नोंद आणि विश्लेषण करण्यास सक्षम असतात. पारंपारिक फेरोमन सापळ्यापेक्षा हे अधिक अचूक असून यामध्ये सतत माहितीचे संकलन होते. त्यामुळे प्रभावी किड नियंत्रण होण्यास मदत मिळते.
आय.ओ.टी. तंत्रज्ञान आणि माहिती विश्लेषणातून किड नियंत्रण
आय.ओ.टी. सेन्सरद्वारे मातीतील आर्द्रता, तापमान आणि किडींच्या उपस्थितीची सतत माहिती घेतली जाते. उपलब्ध माहितीचे ‘ए आय’ आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने विश्लेषण केले जाते. आधी संकलित केलेली माहिती आणि नुकतीच संकलित केलेली माहिती यांचे विश्लेषण करून, त्यानुसार किड नियंत्रणासाठी उपाय सुचवले जातात.
किडींच्या ओळखीसाठी मोबाईल ॲप
- अनेकदा शेतकऱ्यांना किडींची योग्य ओळख न पटल्यामुळे प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य होत नाही. त्यासाठी ‘ए आय’ आधारित मोबाईल ॲप फायदेशीर ठरतात. या ॲपमध्ये किडींचे छायाचित्र काढून ते अपलोड केल्यानंतर त्वरित माहिती मिळते.
- विशिष्ट ठिकाणी आढळणारे किडींची माहिती ॲप द्वारे संकलित केली जाते. जेणेकरून परिसरातील इतर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मिळतो.
- किडीची त्वरित ओळख पटल्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होते त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येते.
‘ए आय’ तंत्रज्ञानाचे फायदे
*’ए आय’ च्या मदतीने कमी वेळेत किडींची ओळख आणि व्यवस्थापन शक्य होते.
*रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळता येतो, त्यामुळे माती आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते.
*प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रामध्येच कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे, वेळीच कीड नियंत्रण होते त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढून गुणवत्ताही सुधारते.
*पर्यावरण पूरक शेतीला चालना मिळते.
*पारंपरिक नियंत्रण उपायांच्या तुलनेत स्वयंचलित कीड नियंत्रणामुळे वेळ, श्रम आणि पैशाची बचत होते.