Potassium Schoenite (पोटॅशियम शोनाईट) हे १०० % पाण्यात विरघळणारे (Water Soluble) खत आहे. त्यामुळे हे जमिनीतून (फेकून/ विस्कटून), ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते. हे खत म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.या खतामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे ऑक्साईड फॉर्ममध्ये असते त्यामुळे पिकाला या अन्नघटकासोबतच ऑक्सीजन ची उपलब्धता वाढते. म्हणजेच पिकाच्या वाढ व विकासाला चालना देणारे हे एक आदर्श खत आहे.
हे खत पिकाच्या कोणत्या अवस्थेत (कधी)वापरावे?
● पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होतेच, याशिवाय पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियम मुळे कायम राहते.
● कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर गरज लागते, कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.
● पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो. उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
● गंधकामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते तसेच पिकाची पक्वता लवकर व एकसारखी होते.
● जमिनीतील कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम या धनभारित (कॅटायन्स) अन्नद्रव्यांचे परस्पर प्रमाण त्या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी (धन व ऋण आयन यांची देवाण- घेवाण करण्याची क्षमता) ठरवण्यासाठी Potassium Schoenite कारणीभूत ठरते.
● पोटॅशियम शोनाईटमध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये असल्याने, मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारते. त्यामुळे मुळांच्या टप्यातील अन्नद्रव्ये जास्तीत जास्त प्रमाणात मुळांकडून शोषून घेतली जातात.
Potassium Schoenite वापरण्याची पद्धत व फायदे:
● ऊस पिकासाठी देत असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, फळ पिकांसाठी फळवाढीच्या काळात, कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात.
● पोटॅशियम शोनाईटमुळे पिकाला वातावरणाशी अनुकूलन साधण्यास मदत होते. म्हणजेच पिकावर पाण्याचा ताण येत नाही. हिवाळ्यात थंडीचा फारसा परिणाम होत नाही एकंदरीत पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
वापरण्याचे प्रमाण :
● जमिनीतून – फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे.
● ड्रीपमधून – फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे.
● फवारणीतून –फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात एकरी १ किलो फवारणीसाठी वापरावे.
कोणकोणत्या पिकामध्ये शेतकरी वापरू शकतात?
फर्टिगेशनसाठी: ऊस, आले, हळद, कांदा, द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती.
पानांवरील फवारणीसाठी: सर्व पिकांना वापरता येते परंतु, स्फुरद युक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फेट सारख्या खतामध्ये मिसळून Potassium Schoenite फवारणी साठी वापरू नये.
आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कमेंट करा, लेख आवडल्यास शेअर करा…
खूप छान माहिती दिली सर