काकडी हे भारतीय पीक असल्यामुळे, देशभर याची लागवड केली जाते. काकडी लागवड Kakdi lagwad प्रामुख्याने उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात काकडीचे पीक घेतले जाते. काकडीचा गर थंड असल्यामुळे तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने काकडीला उन्हाळ्यात भरपूर मागणीअसते व चांगला बाजारभाव मिळतो.
हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर भाजीपाला पिक आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक शेती पद्धती वापरून अधिक उत्पादन कसे घेता येईल ते आपण या लेखात पाहूया.

हवामान आणि जमीन:
* काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे.
*25-30°C तापमान या पिकासाठी सर्वोत्तम मानले जाते.
* पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते.
* वालुकामय चिकणमाती जमीन या पिकासाठी चांगली आहे.
* काकडीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू (PH) 5.5 ते 7 या दरम्यान असावा.
लागवडीचा हंगाम:
* काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात करतात.
* खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून-जुलै महिन्यात करतात.
* उन्हाळी हंगामासाठी काकडीची लागवड जानेवारी ते 15फेब्रुवारी पर्यंत करतात.
सुधारित/ संकरीत वाण:
खरिपासाठी: फुलेसुंदरी, फुले शुभांगी, शीतल, सलोनी, प्राजक्ता, कोकण किरण
उन्हाळ्यासाठी: सलोनी, पूसा उदय, पूसा संप्रदा, पुना खीरा, पॉइनसेट, फुले शुभांगी, हिमांगी
हायब्रिड वाण: इंद्रायणी, महिको, NS 404, क्रिश, प्रिया, जिप्सी, बीजसिद्धी
Kakdi lagwad बियाणे प्रमाण:
* एक एकर लागवडीसाठी 200 ते 400 ग्रॅम बियाणे लागते.
* बियाणे खरेदी करताना ते चांगल्या प्रतीचे आणि रोगमुक्त असल्याची खात्री करा.
पूर्व मशागत आणि लागवड:
* शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत.
* शेतात चांगले कुजलेले शेणखत टाकून जमीन सपाट करावी.
* सरी पद्धतीने लागवड करताना 1.5 ते 2.5 असे दोन ओळीतील अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूस मध्यभागी 45 ते 60 सेमी दोन वेलीतील अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 बिया टोकाव्यात. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी 2 जोमदार रोपे ठेवावीत.
* पेरणीसाठी 1.5-2.5 सेमी खोलीवर बी लावावे.
* लागवडी पूर्वी बियाणे बाविस्टीन(20ग्रॅम 10लिटर पाणी) या बुरशीनाशकाच्या द्रावणात भिजवून लागवड करावी.
* बेडवर काकडी लागवड करताना शिफारसी प्रमाणे रासायनिक खताने बेड भरून घ्यावेत. (युरिया -23 kg + 10:26: 26- 65 kg + मॅग्नेशियम सल्फेट – 4 kg + दाणेदार गंधक 12 kg + निंबोळी पेंड 100 kg + सूक्ष्म पोषक खत – 10 kg + शेणखत, कंपोस्ट, किंवा वर्मीकंपोस्टचा प्रति एकर नुसार बेड भरून घ्यावेत.)
* काकडी लागवडीसाठी बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे तणाचा बंदोबस्त होतो, तसेच मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते.
खते आणि पाणी व्यवस्थापन:
- काकडी पिकास 50 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यावे.
- लागवडीनंतर 1 महिन्याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यावा.
- खत टप्प्याटप्प्याने द्यावे (पेरणीवेळी, फुलोरा टप्प्यावर, फळधारणेच्या वेळी).
* पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
* उन्हाळ्यात 3 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
*अतिरिक्त ओलावा टाळा, अन्यथा बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता वाढते.
**ठिबक सिंचन: काकडी पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग केला जातो, यामध्ये रोपाच्या वाढीनुसार पाण्याचा व खताचा समतोल राखला जातो. रोपाच्या मुळांच्या कक्षेत ओलावा राहील याची शेतकऱ्याने काळजी घेणे जरुरीचे आहे.
आंतरमशागत:
* काकडीच्या वेलांना आधार दिल्यास फळांची प्रत सुधारते, परंतु ते खर्चिक असल्याने महाराष्ट्रात काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते.
*आर्थिक नियोजन असेल तर लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.
* लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे.
* फळे लागल्यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्हणून फळांखाली वाळलेल्या काट्या घालाव्यात.
Kakdi lagwad रोग आणि किड नियंत्रण:
* काकडी पिकावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
* रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य वेळी कृषितज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.
* किडींच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा वापर करावा.
* प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळे व निळे चिकट सापळे एकरी 20 नग लावावेत.
सर्वसाधारण कीड:
फुलकिडे व तुडतुडे: डायमेथोएट 25 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.1% हे 10 मिली प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी.
मावा: डायमेथोएट (15 मि.ली./15ली.) फवारणी करावी.
पांढरी माशी: नियंत्रणासाठी उलाला 6 ग्राम प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी.
पाने खाणारी अळी व फळातील अळी: नियंत्रणासाठी एमामेक्टिन बेंझोएट 10 ग्राम किंवा बायर फेनोस क्विक 10 मिली प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी
सर्वसाधारण रोग:
डाऊनी मिल्ड्यू(केवडा): एम-45 हे औषध लक्षणे दिसताच 30-45 ग्राम 15 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा (अझोक्झिट्रोबिन 15 मि.ली. /15ली.) फवारणी करावी.
पावडरी मिल्ड्यू(भुरी): सल्फर पावडर (40 ग्रॅम/15ली.) फवारणी करावी. किंवा
रोको 10 ग्राम किंवा टाटा ताकत 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
मर रोग (Fusarium Wilt): मर रोगामुळे झाडे पिवळी पडतात आणि नंतर सुकून मरतात. मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने मुळांची वाढ थांबते.
उपाय: बियाण्यांना पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडे नष्ट करावी.
काढणी व उत्पादन:
फळे कोवळी असतानाच काढणी करावी जेणेकरून बाजारात चांगला भाव मिळेल. कोवळ्या फळांना ग्राहकांची मागणी अधिक असते. फुले आल्यापासून 8-10 दिवसांनी फळे काढणीस तयार होतात. काकडीची तोडणी दर 2 ते 3 दिवसांच्या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्टरी 25 ते 30 टन उत्पादन मिळू शकते.
निष्कर्ष:
सुधारीत जातींची लागवड, नियोजनबद्ध खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड-रोगांचे नियंत्रण या गोष्टींचे योग्य नियोजन केल्यास Kakdi lagwad काकडीच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न–
- काकडी लागवड कधी करायची?
उत्तर – काकडीची लागवड उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगामात केली जाते.
उन्हाळी पीक: जानेवारी ते फेब्रुवारी
पावसाळी पीक: जून ते जुलैमध्ये बियाणे पेरले जाते.
- काकडीची बांधणी कधी करावी?
उत्तर- लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.
- काकडी किती दिवसात येते?
उत्तर -बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात.
- काकडी मध्ये किती टक्के पाणी असते?
उत्तर – काकडीमध्ये 95% पाणी असते, ज्यामुळे ते शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते आणि उन्हाळ्यात थंडावा देते.
- काकडीचे एक एकर लागवडीसाठी किती बियाणे लागते?
उत्तर- काकडीचे एक एकर लागवडीसाठी 200 ते 400 ग्रॅम बियाणे लागते.
- पॉलिहाऊस मध्ये कोणत्या प्रजातीची काकडी लावावी?
उत्तर- काकडी पिकाच्या फळधारणा होणेसाठी, परागीकरण होणे आवश्यक असते. हे परागीकरण मधमाश्या द्वारे व इतर कीटकामार्फत होते. पण पॉलीहाऊसमध्ये मधमाश्या व त्यासारख्या किटकाना आत प्रवेश करणे अवघड जाते, म्हणून पॉलीहाऊसमध्ये पिकाची लागवड करत असताना “पार्थेनोकार्पिक” प्रजातीच्या काकडीची लागवड करणे आवश्यक आहे.
- काकडीचे औषधी गुणधर्म कोणते?
उत्तर- काकडीमध्ये तंतूंचे प्रमाण असल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
काकडीमधील ‘अ’ जीवनसत्व डोळ्यांचे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
काकडीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तशुद्धी करतात.
काकडीचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.