ऊसामध्ये आंतरपीक घ्यावे की नाही? आणी घ्यायचेच तर कोणते आंतरपीक घ्यावे? असा प्रश्न प्रत्येक हंगाम सुरू होताना शेतकऱ्यांना पडलेला असतो. या साध्या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला, त्यावेळी कृषी तज्ञांची तसेच शेतकऱ्यांची अनेक मतांतरे आढळली. कोणी म्हणतात intercropping आंतरपीक घेऊच नका तर काहीजणांच्या मते योग्य आंतरपीकाची निवड आणि योग्य व्यवस्थापन असेल तर शेतकरी या दुसऱ्या पिकातूनही उत्पन्न मिळू शकतात. यदाकदाचीत जर एका पिकाला दर मिळाला नाही तर दुसऱ्या पिकातून उत्पादन खर्च तरी निघेल. हवामानातील बदल किंवा अतिवृष्टीमुळे एक पीक वाया गेले, तरी दुसरे पीक तरी पदरात पडेल.
असो, या प्रश्नाच्या अधिक खोलात न जाता आपण आंतरपीक म्हणजे काय? ऊस पिकात कोणते आंतरपीक घेऊ शकतो? याविषयीची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. ऊसातील आंतर पिकाचीच चर्चा का? तर भारत व ब्राझील हे मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेणारे देश आहेत भारतात उत्तर प्रदेश व महाराष्ट्र ही राज्ये ऊस उत्पादनात अग्रेसर आहेत.
intercropping आंतरपीक म्हणजे काय?
एका शेतात, एकाच वेळी/हंगामात, एकापेक्षा अनेक पिके घेणे म्हणजेच आंतरपीक पद्धती होय. मुख्य पिकाबरोबर कमी कालावधीचे आणखी एखादे आंतरपीक घेतल्यामुळे intercropping शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते. कमी कालावधीत अधिकचे उत्पादन मिळते. आंतरपीक पद्धती ही हवामानातील बदलानुसार अनुकूलन साधण्यासाठी महत्त्वाची आहे.
आंतरपीक पद्धतीसाठी पिकांची निवड:
* मुख्य पीक आणि आंतरपीक वेगवेगळ्या कुळातील असावे. उदा. ऊस हे एकदल वर्गीय पीक आहे त्याच्यासोबत आंतरपीक म्हणून एक जर एकदल वर्गीय पीक घेतल्यास दोन्ही पिकांची अन्न, पाणी व सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा सुरू होते. याचा परिणाम मुख्य पिकाच्या वाढीवर होतो. या उलट द्विदल वर्गीय पिकामुळे मोठ्या प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होऊन ऊस पिकाची नत्राची आवश्यकता पूर्ण करता येते.
* मुख्य पीक आणि आंतरपीक हे वेगवेगळ्या कालावधीत परिपक्व होणारे असावे.
* आंतरपीकांना मुख्य पिकाव्यतिरिक्त शिफारशीत खतमात्रा द्याव्यात.
intercropping आंतरपीक पद्धतीचे फायदे:
1. मुख्य पिकामध्ये जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी आंतरपीक घेतले जाते. त्यामुळे शेतजमीनीतील अन्नद्रव्ये आणी पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होतो. तणाचे प्रमाणही कमी होते.
2. आंतरपीक पद्धतीमुळे आपल्या शेतजमिनीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो.
3. आंतर पिकामुळे ओलावा टिकून राहिल्याने पाण्याची बचत होते. जमिनीची धूप थांबते.
4. आंतर पिकामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याने निव्वळ नफ्यात वाढ होते..
5. आंतरपीक निघाल्यानंतर त्या पिकांचे अवशेष/उरलेला भाग सरीत कुजवल्याने मातीतील सेंद्रिय कर्ब वाढते.
6. जमिनीचा पोत सुधारल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.
7. द्विदल वर्गातील पिकाने जमिनीत स्थिर केलेले नत्र ऊसासारख्या पिकांना फायद्याचे ठरते.
8. एका पिकाला दर मिळाला नाही, तर दुसऱ्या पिकांमधून उत्पादन खर्च निघतो.
9. कोरडवाहू शेतीमध्ये पावसातील खंड, अतिवृष्टी, गारपीट यामुळे बरेचदा हातचे पीक जाऊ शकते. त्यामुळे एका पिकाचे नुकसान झाले तरी दुसरे पीक पदरात पडू शकते.
10. काही पिके ही नैसर्गिक कीटकनाशके म्हणून काम करतात. आंतरपिकामुळे रोग व कीड नियंत्रणात राहते.
आंतरपीक पद्धतीचे काही तोटे:
* आंतर मशागतीसाठी यंत्रसामग्रीचा वापर करता येत नाही.
* पोषणद्रव्ये, सूर्यप्रकाश आणि पाण्यासाठी दोन पिकांमध्ये स्पर्धा वाढते.
* पीक कापणी/काढणी मध्ये अडचणी येतात.
* अपुऱ्या नियोजनामुळे नुकसान होऊ शकते.
अशाप्रकारे योग्य व्यवस्थापन केले तर आंतरपीक शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते. परंतु जर आपल्याला मुख्य पिकावरच लक्ष केंद्रित करायचे असेल तर शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याअगोदर, योग्य विचारांती निर्णय घ्यावा.
ऊसातील काही फायद्याची आंतर पिके:
ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ऊसामध्ये कमी कालावधीचे द्विदल वर्गातील आंतरपीक घेतल्यास त्याचा ऊसाला फायदाच होतो.
ऊस आणि मेथी/ कोथिंबीर/ फुलकोबी:
उन्हाळ्यामध्ये पालेभाज्यांना बाजारात खूपच मागणी असते सुरू ऊसामध्ये या भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देतात. ऊसाची उगवण झाल्यानंतर वरंब्याच्या दोन्ही बाजूने याची लागवड करावी. याच्यासाठी काही वेगळे खत व पाणी नियोजन करावे लागत नाही. एखादी फवारणी गरज पडल्यास करावी. शहराजवळ असणाऱ्या ऊस क्षेत्रामध्ये कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देणारी ही पिके आहेत.
intercropping ऊस आणि भुईमूग:
ऊसाचे कोंब जमिनीतून वर आल्यावर किंवा रोप लागणीनंतर तीन आठवड्यांनी, वरंब्यावर/डुंब्यावर भुईमुगाची टोकण करावी. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हे पीक उपयुक्त आहे. याच्यासाठी काही वेगळी खते किंवा पाणी द्यावे लागत नाही. कीड व रोग व्यवस्थापनासाठी एखादी फवारणी करावी. अतिरिक्त नफ्याबरोबरच ऊस पिकालाही याचा फायदा होतो.
ऊस आणि कांदा:
ऊसाची लागण केल्यानंतर साधारण दीड महिन्यानंतर कांद्याची रोप लागण करावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूला कांद्यांची रोप लागण केल्यामुळे ऊसाबरोबरच त्याला खत आणि पाणी मिळते. कांद्याची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत. त्यामुळे मुख्य पिकावर याचा काहीच परिणाम होत नाही. साडेतीन ते चार महिन्यात म्हणजे ऊसाला भर लावण्यापूर्वीच हे पीक निघते.
ऊस आणि हरभरा:
हरभरा या पिकाची टोकण पद्धतीने ऊसामध्ये लागवड केली जाते. या पिकाचा बेवड जमिनीसाठी खूप चांगला असतो. यामुळे एकाच वेळी पीकाची फेरफारट साधली जाते. हरभऱ्याच्या मुळावर गाठी असतात. त्यामधील रायझोबियम हवेतील नत्राचे शोषण करून जमिनीला पुरवितात/साठवतात त्याचा फायदा ऊसाला होतो. त्यामुळे युरियाचा अतिरिक्त खर्च वाचतो.
ऊस आणि काकडी किंवा कलिंगड:
सुरू ऊस लागणी मध्ये या आंतर पिकांची लागवड केल्यास ऐन उन्हाळ्यात भरपूर नफा मिळतो. कारण उन्हाळ्यात या दोन्ही पिकांना खूपच मागणी असते. ऊसाची पूर्ण उगवण झाल्यानंतर वरंब्यावर एका कडेला साधारण दोन फूट अंतरावर एक बी याप्रमाणे याची टोकणी करावी. हे वेलवर्गीय फळपीक जमिनीला समांतर वाढते. वरंब्यावर या वेलवाढीचे नियोजन केल्यास तीन महिन्यात चांगला नफा मिळतो.
याबरोबरच ऊस पिकात मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, सूर्यफूल, झेंडू, मिरची, बटाटा, आले, हळद, कोबी, गहू, मका ही intercropping आंतरपिकेही घेतली जातात.
आपल्याला ही माहिती आवडल्यास, तुमच्या मित्रांना शेअर करा…
धन्यवाद आप्पा