ऊस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख बागायती नगदी पीक आहे. राज्यातील बहुतांशी भागात ऊस शेती केली जाते. ऊसाच्या विविध जाती आहेत. आपल्या जमिनीनुसार किंवा हंगामानुसार आपण कोणत्या Sugarcane Variety/ऊसाच्या जातीची लागवड केली पाहिजे, याविषयीची माहिती आपण या लेखात पाहूया.

Sugarcane Variety/ऊसाच्या जाती: को(CO-86032) 1996मध्ये प्रसारीत
ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऊसाची जात आहे. हा ऊस रंगाने लालसर असतो. ऊसाची कांडी मध्यम जाड असून डोळा गोल असतो. पाने लांब, रुंद व टोकाला वळलेली असतात. या ऊसात जास्त फुटवे निघतात व तुरा उशिराने येतो. कानीरोगास मध्यम प्रतिकारक असा हा ऊस आहे. मात्र खोडकीड व शेंडा पोखरणारी अळीला ही जात बळी पडते.
ही जात उशिरा पक्व होणारी असून ऊस व साखरेचे चांगले उत्पादन देते. या ऊसाचा खोडवा ही चांगला येतो. यामुळे तिन्ही हंगामासाठी या व्हरायटीची शिफारस केली जाते.
को एम-265 (फुले 265) 2007मध्ये प्रसारीत
फुले 265 हा ऊस रंगाने हिरवट असून पाने सरळ व टोकाची असतात. कांड्या आखूड, मध्यम जाड व मध्यभागी फुगीर आणि टोकाला निमुळत्या असतात. ऊसाची संख्या ज्यादा तसेच वजनाला भारी असल्याने उत्पादन जास्त मिळते. या जातीमध्ये ऊस पडण्याचे/लोळण्याचे प्रमाण जास्त आहे. भारी चोपण, खारवट जमिनीसाठी या ऊसाची शिफारस केली जाते. याचा खोडवा ही चांगला येतो. या जातीला तुरा लवकर येतो. कांड्यावर आन्सा/पांगशा फुटतात. तिन्ही हंगामासाठी या वाणाची शिफारस केली जाते.
को व्ही एस आय- 9805
आडसाली व पूर्व हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली, मध्यम व उशिरा पक्व होणारी ही जात आहे. उथळ, मध्यम खोल आणि नीचऱ्याच्या जमिनीला ही जात चांगला प्रतिसाद देते. सरळ वाढणारा ऊस आणि सहज निघणारे पाचट हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. हे वाण गवताळ रोगास थोड्या प्रमाणात बळी पडते. आंतरपीक व ठिबक सिंचन साठी ही जात योग्य आहे.
को-92005 (फुले- 92005)
को-671 को-820 यांच्यापासून निर्मित झालेली ही ऊसाची जात आहे. लवकर पक्व होणारे हे वाण गुळ उत्पादनासाठी चांगले आहे. या व्हरायटी पासून उच्च प्रतीचा गूळ मिळतो. या ऊसाला तुरा येत नाही परंतु पानावरील तपकिरी ठिपके व तांबेरा रोगास बळी पडते. सुरू,पूर्व हंगामी लागवडीसाठी तसेच जास्त पावसाच्या भागात लागवड करण्यासाठी या वाणाची शिफारस केली जाते.
एम एस-10001 (फुले-10001) 2017 मध्ये प्रसारीत
हा ऊस जाड असून हिरवट, पिवळसर रंगाचा असतो. हा ऊस 10 ते 12 महिन्यात पक्व होतो, त्यामुळे लवकर तोडायला येतो. या वाणास तुरा येतो व पक्व ऊसाचे डोळे फुटतात. यावर थोडे मेणाचे प्रमाण आहे. हे वाण पूर्व हंगामी व सुरू लागवडीसाठी तसेच खारवट, चोपण जमिनीसाठी शिफारशीत केले आहे.
व्ही एस आय-8005
पाण्याचा ताण सहन करणारी ही ऊस व्हरायटी आहे. ऊसाला तुरा येण्याचे प्रमाण कमी आहे. खोडकिडीस कमी प्रमाणात बळी पडते. कानी व तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. या ऊसाचा खोडवा चांगला येतो.
व्ही एस आय-434
ही जात लवकर वाढते व ऊसाची जाडी मध्यम असते. पाण्याचा ताण सहन करणारी व उत्तम खोडवा उत्पादन देणारी ही जात आहे. या वाणाची शिफारस पूर्व हंगामी व सुरू लागवडीसाठी केलेली आहे.
व्ही एस आय-3102
जास्त पाण्याचा ताण सहन करणारी ही जात असल्यामुळे अति पर्जन्य भागासाठी, पूर्व हंगाम व सुरू लागवडीसाठी शिफारस केली जाते. या ऊसाला उशिरा तुरा येतो तसेच कानी व तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. खोडकीड, पिठ्या, लोकरी मावा या किडींना मध्यम प्रतिकारक आहे. या ऊसाची जाडी आणि वजन जास्त असल्यामुळे वाढीव उत्पादन मिळते. तुरा येत नसल्यामुळे उत्पादनात घट होण्याचे प्रमाण कमी आहे.
को सी-671 (वसंत)
या ऊसाची पाने लांब, रुंद असतात व देठावर कुस असते. ही जात लवकर पक्व होणारी असून साखरेचा उतारा चांगला आहे. तसेच गुळासाठी सर्वोत्तम आहे. कांडी किडीस ही जात बळी पडते. काळ्या खोल जमिनीत तसेच सेंद्रिय व रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देणारी ही व्हरायटी आहे.
Sugarcane Variety/ऊसाच्या जाती: को-8014 (महालक्ष्मी)
1994 साली प्रसारित करण्यात आलेली ही जात को-740 आणि को-6304 यापासून तयार करण्यात आलेली आहे. या ऊसाची पाने लांब, रुंद हिरवीगार असून कांड्या लांब व मध्यम जाड असतात. या वाणाचे वाढे लांब असून तुरा उशिरा येतो. गुळ तयार करण्यासाठी हे वाण चांगले आहे. लवकर पक्व होणारी व जास्त उत्पादन देणारी ही जात कोल्हापूर विभागासाठी प्रसारित केली आहे. पूर्व हंगामी व सुरू लागवडीसाठी योग्य असून नीचऱ्याच्या जमिनीत चांगला प्रतिसाद देते.
फुले-9057/को एम-12085 (2019मध्ये प्रसारीत)
हा ऊस मध्यम जाड असून याची पाने ताठ, हिरवीगार असतात. या ऊसाचा मुख्य वापर हा गूळ निर्मितीसाठी केला जातो. 12 ते 14 महिन्यात परिपक्व होणारा हा ऊस खोडकीड, विल्ट यांना कमी प्रमाण प्रतिबंधित आहे.
फुले-11082
ही लवकर म्हणजेच 10 ते 12 महिन्यात पक्व होणारी ऊसाची जात आहे. या व्हरायटीमध्ये साखरेचा उतारा जास्त आहे. सुरू व पूर्व हंगामी लागवडीसाठी या जातीची शिफारस केलेली आहे. पानाला कुस नसल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
फुले-15012
पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने फुले-265 व 94008 या जातींच्या संकरातून फुले-15012 या जातीची निर्मिती केली आहे. हा ऊस जाड व कांड्या सरळ असतात. या जातीला तुरा अल्प प्रमाणात येत असल्यामुळे उत्पादनात घट होत नाही. तसेच त्याचा खोडवा ही चांगला येतो. पश्चिम महाराष्ट्रात सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्ही हंगामात लागवडीसाठी या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. 86032 या जातीपेक्षा 15 टक्के जास्त उत्पादन देणारी ही जात आहे.
को-740
ही ऊसाची एक सुधारित जात आहे. या वाणाची लागवड तिन्ही हंगामात केली जाऊ शकते. तसेच खोडव्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. ही जात उशिरा परिपक्व होते.
को-7219
या जातीला ‘संजीवनी’ या नावानेही ओळखले जाते. हा ऊस लवकर परिपक्व होत असल्यामुळे याची लागवड फायदेशीर आहे. पाण्याचा ताण सहन करून करू शकत असल्यामुळे शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
को एम-7125 (संपदा)
महाराष्ट्र राज्यातील हवामान या जातीसाठी चांगले मानवते. त्यामुळे राज्यात विविध भागात या वाणाची लागवड पाहायला मिळते. या जातीपासून उत्तम दर्जाचा गुळ बनवला जातो. या जातीची शिफारस सुरू हंगामातील लागवडीसाठी केलेली आहे. या जातीपासून खोडव्याचे देखील चांगले उत्पादन मिळते.
फुले-13007
ही जात ऊस व साखर उत्पादनात को-86032 या जातीपेक्षा सरस असून तिन्हीही हंगामासाठी उपयुक्त आहे. या जातीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. याशिवाय क्षारयुक्त जमिनीत या जातीची चांगली उगवण होत असून, उत्पादनक्षमता देखील चांगली आहे.
भारतीय ऊस संशोधन संस्थेकडून या नवीन जातीची शिफारस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी करण्यात आली आहे.
FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.ऊस लागवडीचे हंगाम कोणते?
ऊस लागवडीचे 3 हंगाम आहेत. सुरू लागवड, पूर्व हंगामी लागवडआणि आडसाली लागवड.
2. ऊस पक्व होण्यासाठी किती काळ लागतो?
ऊसाला पक्व होण्यासाठी 12 ते 14 महिने लागतात.
3. ऊसाचे सुधारित आणि जास्त उत्पादन देणारे वाण कोणते?
को-86032 या सुधारित जातीपासून ऊसाचे जास्त उत्पादन मिळते.
4. को-86032 हा ऊस कसा ओळखावा?
या जातीचा ऊस रंगाने लालसर, कांड्या मध्यम जाड व डोळा गोल असतो. पाने लांब,रुंद व टोकाला वळलेली असतात. तसेच पक्व कांड्याना भेगा पडतात.
5.गुळासाठी ऊसाच्या कोणत्या जातींची लागवड करावी?
गुळ तयार करण्यासाठी ऊसाच्या को-80 14 (महालक्ष्मी) आणि कोसी 671 (वसंत) या जातींची लागवड करावी.
AABHARI AAHE, ashich upyukt mahiti pathva.
Very good 👍
माहिती चांगली मिळाली. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
Co 740 ऊस बियाणे मिळेल काय