SRT-शून्य  मशागत  शेती  तंत्र…

माती केवळ नैसर्गिक संसाधन नसून जीवनाचा उगम आहे, ती जिवंत आहे. म्हणूनच सर्व सजीव निर्माण झाले आहेत आणि  होत आहेत. सेंद्रिय कर्ब हा मातीचा आत्मा आहे, तोच प्रत्येक सजीवाचा अविभाज्य घटक आहे. शेतीपुरता विचार करायचा तर मातीतून उपजणाऱ्या सर्व पिकांची उत्तम वाढ आणि भरघोस उत्पादन पाहिजे असेल तर माती सशक्त पाहिजे आणि ते केवळ सेंद्रिय कर्ब वाढवूनच शक्य आहे. सेंद्रिय कर्ब कमी किंवा नष्ट होण्याचे प्रमुख कारण जमिनीची हलवाहलव म्हणजेच मशागत. म्हणून सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा एकमेव शाश्वत उपाय म्हणजे मशागत थांबवून, जमिनीतून SRT-शून्य  मशागत तंत्राने अधिकाधिक पिके घेणे.

SRT-शून्य  मशागत

SRT-शून्य  मशागत तंत्र

सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत जसे की मान्सूनचे उशिरा आगमन, अनिश्चित पर्जन्यमान, सरासरी पेक्षा कमी पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ–उतार यामुळे वातावरणाचा समतोल बिघडत आहे. या हवामान बदलाशी जुळवून घेताना शेतीमध्ये काही बदल करावे लागतील. नवीन तंत्रज्ञान वापरावे लागेल. या अनुषंगाने ‘संवर्धित शेती’ ही संकल्पना उदयास आली आहे. यामध्ये SRT-शून्य  मशागत या तंत्राचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे.

कृषी भूषण चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी सगुणा बाग, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे भात पिकामध्ये या तंत्रज्ञानाचा प्रथम वापर केला. म्हणून या तंत्रास ‘सगुणा राईस तंत्र’ (SRT) असे म्हणतात. त्यांच्या या तंत्राची दखल संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संस्थेने घेतली आहे आणि म्हणूनच राज्याच्या कृषी विभागामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे. SRT-शून्य  मशागत हे तंत्रज्ञान वापरून सोयाबीन, कापूस, गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, हरभरा, भुईमूग, सूर्यफूल, मोहरी, जवस, तीळ अशी सर्वच तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, फुलपिके, औषधी पिकांची लागवड करणे शक्य आहे.

  • SRT-शून्य  मशागत या तंत्रामध्ये सुरुवातीलाच गादीवाफ्यावर पिकांची लागवड केली जाते व त्यानंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही  मशागत जसे की नांगरणी,  कुळवणी, वखरणी  न करता पुढच्या पिकाची टोकन पद्धतीने लागवड केली जाते.
  • शेतातील तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भांगलनी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो.
  • पिकांची कापणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडांचे अवशेष (सड),  मुळे तसेच जमिनीत ठेवली जातात.
  • शेतातील पिके किंवा तण मुळासकट उपटून काढली जात नाहीत.  त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत राहतात, ती कुजतात आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होते.

SRT-शून्य  मशागत तंत्राची आवश्यकता

  • मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना नेहमी दुसऱ्यावर म्हणजेच कधी मजुरांसाठी, कधी बैलासाठी  तर कधी ट्रॅक्टर साठी अवलंबून राहावे लागते यामुळे बऱ्याचदा शेतीची कामे वेळेवर होत नाहीत.
  • जमीन नांगरणे,  ढेकळे फोडणे,  कुळवाच्या पाळ्या मारून माती बारीक करणे,  सपाट करणे,  कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे हा जणू शेतकऱ्यांच्या जबाबदारीचा  भागच बनला आहे.
  • अति मशागतीमुळे जमिनीमध्ये दीड दोन फुटाखाली कडकपणा आल्यामुळे जमिनीची नैसर्गिक संरचना बदलत चालली आहे.
  • तसेच वारंवार जमिनीची मशागत केल्यामुळे मातीची सारखी हलवा-हलव  झाल्यामुळे , खालच्या थरातील माती वर येते व या मातीवर सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे प्रतिकूल परिणाम होतो.
  • सर्वप्रथम तापलेल्या मातीतील सेंद्रिय कर्ब हवेत उडून जाण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.
  • सेंद्रिय पदार्थ कमी झाल्यामुळे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळ यांची उपासमार होऊन त्यांचे प्रमाण घटले आहे.
  • दिवसेंदिवस मशागतीच्या खर्चामध्ये वाढ होत आहे  त्यामुळे पिकाचा लागवड खर्च देखील वाढला आहे.
  • या तंत्रामध्ये सुरुवातीलाच गादीवाफ्यावर पिकांची लागवड केली जाते व त्यानंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही मशागत जसे की नांगरणी, कुळवणी,वखरणी न करता पुढच्या पिकाची टोकन पद्धतीने लागवड केली जाते.
  • शेतातील तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भांगलनी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो.
  • पिकांची काढणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडांचे अवशेष (सड), मुळे तसेच जमिनीत ठेवली जातात.
  • शेतातील पिके किंवा तण मुळासकट उपटून काढली जात नाहीत. त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत राहतात, ती कुजतात आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होते.
SRT-शून्य  मशागत
SRT-शून्य  मशागत  शेती  तंत्र…

शून्य मशागतीचे फायदे

  1. SRT-शून्य  मशागतमुळे मातीच्या सुपीक थरामध्ये फारशी उलथा पालथ होत नाही.
  2. सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकाळ साठवणूक होते.
  3. जमिनीला सातत्याने सेंद्रिय कर्ब उपलब्ध झाल्याने आणि ओलावा टिकून राहिल्यामुळे मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. गांडुळांची संख्या आणि संचार वाढतो.
  4. पूर्वीच्या पिकाचे मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते त्यामुळे रासायनिक खताची बचत होते.
  5. मातीच्या कणांची रचना सुधारते तसेच मातीचे तापमानही नियंत्रित राहते.
  6. जमीन  भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूपही कमी होते.
  7. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळापाशी वायू आणि पाणी यांचे योग्य प्रमाण राहते.
  8. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे ओलावा टिकून राहतो परिणामी पाण्याची बचत होते.
  9. मशागत खर्च व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यामध्ये बचत होते.
  10. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो,  उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि पौष्टिक अन्नधान्याची निर्मिती होते.
  11. दोन पिकांच्या  मधील  मशागतीचा वेळ वाचल्यामुळे  पुढच्या  पिकाची लवकर/ वेळेत लागवड करणे शक्य होते.

शून्य मशागत तंत्रामधील तण नियंत्रण

SRT-शून्य  मशागत हे तंत्रज्ञान असे सांगते की अगोदर उगवलेली हिरवी तणे किंवा पिकांचे अवशेष जमिनीतच कुजवणे गरजेचे आहे. यामध्ये तणनाशकांचा योग्य वापर करून तण नियंत्रण करणे शक्य आहे. यासाठी निवडक व बिन निवडक तणनाशकांच्या शिफारशी माहिती असणे आवश्यक आहे किंवा त्या माहीत करूनच त्यांचा शिफारशीत मात्रेमध्ये वापर करावा.

Leave a Comment