Soyabean crop: सोयाबीन पीक
कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारे Soyabean crop-सोयाबीन पीक हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे. आपण या लेखामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आधुनिक व्यवस्थापन पाहणार आहोत. म्हणजे नेमके काय? तर बियाण्यांचे सुधारित वाण, पेरणी पद्धत, रासायनिक खत मात्रा, रासायनिक तणनियंत्रण, रोग व किडींचे नियंत्रण, फवारणी नियोजन, आंतरमशागत, काढणी/कापणी, मळणी, साठवण इ. बाबीची इत्यंभूत माहिती पाहणार आहोत.
घरचे बियाणे पेरा, उत्पादन खर्च कमी करा:
सोयाबीन पिकासाठी प्रति एकरी 30 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे लागते. बियाणाची किंमत जास्त असल्याने बियाणे खरेदीवर शेतकऱ्यांचा जास्त खर्च होतो, हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःकडील घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून सर्व वाण हे सरळ वाण आहेत. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील तीन वर्षापर्यंत वापरू शकतो. घरचे बियाणे वापरल्याने उत्पादनात कोणतीही घट होत नाही. फक्त घरचे बियाणे पेरण्यापूर्वी, एकदा बियाण्याची उगवण क्षमता तपासावी.
बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी?
सोयाबीनच्या 100 बीयांची ओल्या जागेत लागवड करावी किंवा ओल्या गोणपाटाच्या तुकड्यात बियाणे ठेवून रोज पाणी शिंपडावे पाच ते सहा दिवसांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. 100 बियापैकी किती बिया योग्य रीतीने उगवल्यात, म्हणजे फक्त कोंब येवून चालणार नाही. तर मुळाची वाढ झालीय का, पांढऱ्या मुळ्या दिसतायत का, मुळावर बुरशी आहे का, बियाणे लाल पडलेय का, वरचा भाग व्यवस्थित निघालाय का? या सर्व बाबींची शहानिशा करावी. जर 100 पैकी 70 बिया या पद्धतीने उगवल्या असतील तर 70टक्के बियाणे उगवण क्षमता समजावी व एकरी 30 किलो बियाणे पेरावे. त्यापेक्षा कमी झाल्यास उगवणीच्या प्रमाणात एकरी बियाणाची मात्रा वाढवावी.
Soyabean crop-सोयाबीन पीक बीजप्रक्रिया:
बीजप्रक्रिया म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचे झाल्यास बियाण्याचे पेरणीपूर्व केलेले लसीकरण होय. भविष्यात सोयाबीन वर येणारे रोग म्हणजेच मुळकुज/खोडकुज, चक्रीभुंगा,खोडमाशीच्या आणि यलो मोझ्याक विषाणूच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया खूप फायद्याची ठरते. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
सोयाबीन बियाणे वाण:
पी डी के व्ही यलो गोल्ड (ए एम एस 1001):
प्रसारण वर्ष 2018 (महाराष्ट्र साठी प्रसारित)
फुलाचा रंग जांभळा असून खोड व शेंगावर लव नाही.
परिपक्वतेचा कालावधी 95 ते 100 दिवस.
प्रचलित वाण जीएस 335 पेक्षा 17 ते 20% अधिक उत्पादन देणारा वाण.
उत्पादन 22 ते 26 क्विंटल/हेक्टर
मुळकुज, खोडकुज व पिवळा मोजाक या रोगास मध्यम प्रतिकारक.
चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.
परिपक्वते नंतर 10 दिवसापर्यंत शेंगा फुटत नाहीत.
पी डी के व्ही पूर्वा (ए एम एस 2014-1):
प्रसारण वर्ष 2020 (पूर्व भारतासाठी प्रसारित)
फुलाचा रंग जांभळा असून खोडावर, शेंगावर लव नाही.
परिपक्वतेचा कालावधी 102 ते 105 दिवस.
प्रचलित वाण जे एस 335 पेक्षा 20 ते 22% अधिक उत्पादन देणारा वाण.
उत्पादन 22 ते 26 क्विंटल/हेक्टर.
चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.
परिपक्वते नंतर 10 दिवसापर्यंत शेंगा फुटत नाहीत.
सुवर्ण सोया (ए एम एस – एम बी 5-18):
प्रसारण वर्ष 2019 (मध्य भारतासाठी प्रसारित)
फुलाचा रंग पांढरा असून खोड व शेंगावर तपकिरी रंगाची लव आहे.
परिपक्वतेचा कालावधी 98 ते 102 दिवस.
प्रचलित वाण जीएस 335 पेक्षा 18 ते 20 टक्के अधिक उत्पादन देणारा वाण.
उत्पादन 24 ते 28 क्विंटल /हेक्टर.
मुळकुज /खोडकुज व पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगास प्रतिकारक.
चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.
परिपक्वते नंतर 10-12 दिवसापर्यंत शेंगा फुटत नाहीत.
एम ए यु एस 158: (महाराष्ट्रासाठी प्रसारित)
प्रसारण वर्ष 2009.
फुलाचा रंग जांभळा.
परिपक्वतेचा कालावधी 93 ते 98 दिवस.
उत्पादन 22 ते 25 क्विंटल/हेक्टर.
खोडमाशी या किडीस सहनशील.
परिपक्वतेनंतर 12 ते 15 दिवसापर्यंत शेंगा तडकण्यास सहनशील.
एम ए यु एस 162: (मराठवाडा साठी प्रसारित)
प्रसारण वर्ष 2014.
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्व होण्याचा कालावधी 100 ते 103 दिवस.
मशीनद्वारे कापणीस योग्य.
परिपक्वतेनंतर 12 ते 15 दिवसापर्यंत शेंगा तडकण्यास सहनशील.
ए यु एस 612: (महाराष्ट्र व दक्षिण भारतासाठी प्रसारित)
प्रसारण वर्ष 2016
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्वतेचा कालावधी 93 ते 98 दिवस.
उत्पादन 24 ते 27 क्विंटल/हेक्टर.
परिपक्वतेनंतर 12 ते 15 दिवसापर्यंत शेंगा तडकण्यास सहनशील.
ए डी ए व्ही अम्बा (ए एम एस 100-39):
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्याकरिता प्रसारित.
प्रसारण वर्ष 2021
जास्त उत्पादन क्षमता, सरासरी उत्पादन 28 ते 30 क्विंटल/हेक्टर.
लवकर परिपक्व होणारे वाण (94 ते 96 दिवस).
मुळकुज या रोगास व चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.
प्रचलित वाणापेक्षा तेलाचे (20.5%) व प्रथिनाचे (44%) प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अधिक.
प्रचलित वाणांच्या तुलनेत रब्बी/उन्हाळी बीजोत्पादनासाठी योग्य.
परिपक्वतेनंतर 10-12 दिवसापर्यंत शेंगा फुटत नाहीत.
जे एस 9305: (महाराष्ट्र व मध्य भारतासाठी प्रसारित)
प्रसारण वर्ष 2002.
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्व होण्याचा कालावधी 90 ते 95 दिवस.
उत्पादन 20 ते 22 क्विंटल/हेक्टर.
रोग व किडींना सहनशील.
शेंगांमध्ये चार दाण्यांचे प्रमाण 20-25%.
जे एस 95-60: (महाराष्ट्र व मध्य भारतासाठी प्रसारीत)
प्रसारण वर्ष 2007.
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्व होण्याचा कालावधी 82 ते 88 दिवस.
उत्पादन 18 ते 20 क्विंटल/हेक्टर.
लवकर परिपक्व होणारा, रोग व किडींना सहनशील वाण.
जे एस 2034: (महाराष्ट्र व मध्य भारतासाठी प्रसारीत)
प्रसारण वर्ष 2014.
फुलांचा रंग पांढरा.
परिपक्व होण्याचा कालावधी 86 ते 88 दिवस.
उत्पादन 20 ते 21 क्विंटल/हेक्टर.
लवकर परिपक्व होणारा, रोग व किडींना सहनशील वाण.
फुले संगम: (पश्चिम महाराष्ट्रसाठी प्रसारीत)
प्रसारण वर्ष 2016.
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्व होण्याचा कालावधी 100 ते 105 दिवस.
उत्पादन 23 ते 25 क्विंटल/हेक्टर.
तांबेरा रोगास प्रतिकारक.
फुले अग्रणी: (पश्चिम महाराष्ट्र प्रसारीत)
प्रसारण वर्ष 2013.
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्व होण्याचा कालावधी 100 ते 105 दिवस.
उत्पादन 22 ते 24 क्विंटल/हेक्टर.
तांबेरा रोगास प्रतिकारक.
जे एस- 335: (महाराष्ट्र व मध्य भारतासाठी प्रसारित)
प्रसारण वर्ष 1993.
फुलांचा रंग जांभळा.
परिपक्व होण्याचा कालावधी 98 ते 102 दिवस.
उत्पादन 22 ते 24 क्विंटल/हेक्टर.
बॅक्टेरियल पुरळसाठी सहनशील.
Soyabean crop-सोयाबीन पीक रासायनिक खत नियोजन:
सोयाबीन पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे संपूर्ण रासायनिक खताची मात्रा पेरणीच्या वेळेसच द्यावी. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हेक्टरी 30:60:30 किलो नत्र:स्फुरद:पालाश याप्रमाणे नियोजन करावे. सोयाबीन हे Sulfur loving क्रॉप असल्यामुळे दाणेदार सल्फर 10 किलो प्रति एकर पेरणीच्या वेळी वापरावे.
Soyabean crop-सोयाबीन पिक पेरणी:
- मृगाचे पाणी पडून जमीन पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये. जमिनीत पुरेसा ओलावा असताना (75 ते 100 मिलिमीटर पाऊस), 15 जुलै पूर्वी पेरणी करावी.
- पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम करावी.
- यावर्षीच्या हवामानाचा एकंदर अंदाज पाहता पेरणी बीबीएफ यंत्राने करावी किंवा सोयाबीन पेरणीनंतर अंदाजे 30 दिवसांनी सोयाबीनच्या 3 ओळीनंतर सरी काढावी.
- सोयाबीन पिकाची पट्टा पद्धतीने, म्हणजे 6 ओळी सोयाबीन नंतर 1 ओळ रिकामी अशी पेरणी केल्यास रिकाम्या ओळीत सरी पाडून जलसंवर्धन करता येईल. तसेच जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यास मदत होते व फवारणीसाठी ही सोयीचे होते.
- एकाच क्षेत्रावर दोन प्रकारच्या बियाण्याची पेरणीही फायदेशीर ठरू शकते. कारण यावर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार पावसाचा अतिरेक आणि पावसाचा ताण या दोन्ही गोष्टीचा विचार केल्यास वरील पद्धतीचा उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकेल. म्हणजेच एखादी जात लवकर परिपक्व होत असेल तर ती लवकर निघेल व एखादी लेट व्हरायटी असेल आणि परिपक्वतेच्या कालावधीत पाऊस झाला तर शेंग तडकणार नाही, याही गोष्टी उत्पादन वाढीमध्ये सहाय्यक ठरतील.
- बियाणे 4 सेमी पेक्षा खोल पेरू नये.
Soyabean crop-सोयाबीन पीक तण व्यवस्थापन:
उगवणे पूर्वी:
पेंडामिथिलिन 30% ईसी… (स्टॉम्प) 2.5 ते 3ली./हे. किंवा
डायक्लोस्युल्याम 84%डब्लू डी जी… (स्ट्रॉंग आर्म) 22 ते26ग्रॅम/हे. यापैकी कोणतेही 1तननाशक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा 48 तासाच्या आत फवारणी करावी.
उगवणीनंतर:
इम्याझिथायपर 10% एस एल… (परसुट) 1ली./हे. किंवा
क्विझ्यालोफॉप पी इथिल 5%इसी (टरगा सुपर) 1ली./हे. किंवा
क्विझ्यालोफॉप पी इथिल 10%इसी (टरगा सुपर) 450मीली./हे. किंवा
क्लोरीमुरान इथिल 25% डब्लू पी (क्लोबेन) 36 ते40ग्रॅम/हे. किंवा
प्रोपाक्वीझ्याफॉप 10% इसी (एजील,सोसायटी) 500 ये700मिली/हे. किंवा
क्विझ्यालोफॉप पी टेफ्युरील 4.41% इसी (पेन्टारा) किंवा
इमाझ्यामोक्स 35% + इम्याझिथायपर 35% ड ब्लू जी (ओडिसी) 100ग्रॅम/हे.
यापैकी कोणतेही 1तणनाशक पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी.
Soyabean crop-सोयाबीन पिकसंरक्षण आणि फवारणी नियोजन :
सोयाबीनवर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमाशी, विविध उंटअळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पाने पोखरणारी अळी तसेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी इ. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतो. यासाठी नियमीत पिकाचे सर्वेक्षण करून किडींची संख्या, आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्याची खात्री करून शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. एकात्मिक कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. किडी सोबतच सोयाबीनवर मूळकुज, शेंगा वाळणे, तांबेरा, मोजाक इत्यादी प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोग नियंत्रणासाठी रोगास प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
पिकांची फेरपालट करावी.
किडी व रोगांच्या प्रादुर्भावाबरोबर अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ही ओळखणे महत्त्वाचे आहे, त्यानुसार फवारणीचे नियोजन करावे.
उत्पादन वाढीसाठी Soyabean crop-सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन करत असताना, अनेक शेतकरी शेड्युल मागत असतात. परंतु असेच कोणी फवारणीचे शेड्युल देऊ शकत नाही कारण, तुमच्या जमिनीची प्रत कशी आहे, बेसल डोस काय दिलंय, आता ते पीक किती दिवसांचे आहे, पिकाची वाढ कशी आहे, किडी/रोगाचा प्रादुर्भाव आहे का? या व अशा अनेक बाबींचा विचार करून फवारणीचे नियोजन करावे लागते. तरी काही शेतकरी मित्रांच्या आग्रहास्तव ढोबळमानाने करता येतील अशा फवारण्या सोयाबीन पिकासाठी दिल्या आहेत. परंतु Soyabean crop फवारणीचे नियोजन करत असताना आपल्या कृषी सेवा सल्लागाराचे जरूर मार्गदर्शन घ्यावे आणि त्यानुसारच नियोजन करावे.
पहिली फवारणी साधारणत: पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली फवारणी घ्यावी, यामध्ये
विद्राव्य खत 19:19:19.. 3ते5 ग्रॅम/1ली.
टॉनिक उदा. बायोविटा एक्स.. 2ते3मिली/1ली.
कीटकनाशक उदा. प्रोफेनोफोस.. 1ते1.5मिली/1ली.
बुरशीनाशक उदा. साफ.. 2ग्रॅम/1ली.
दुसरी फवारणी 30 ते 35 दिवसानंतर घ्यावी यामध्ये,
विद्राव्य खत 12:61:00.. 5 ग्रॅम/1ली.
टॉनिक उदा. इसाबेन.. 2ते3मिली/1ली.
कीटकनाशक उदा. अम्प्लिगो.. 0.5मिली/1ली.
बुरशीनाशक उदा.एम-45.. 2ग्रॅम/1ली.
तिसरी फवारणी 50 ते 55 दिवसांनी यामध्ये,
विद्राव्य खत 00:52:34.. 5ते7 ग्रॅम/1ली.
टॉनिक उदा. गोदरेज डबल.. 2.5ते3मिली/1ली.
कीटकनाशक उदा. इमामेक्टिन बेन्झो… 0.6ग्रॅम/1ली.
बुरशीनाशक उदा. नेटिवो.. 1ग्रॅम/1ली.
शक्य असेल तर चौथी फवारणी येऊ शकता.
यामध्ये हे 00:00:50 किंवा13:00:45 यापैकी 1विद्राव्य खत वापरता येईल.
कापणी:
कापणीच्या वेळेस पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगांचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होतो. कापणीचे वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण (मॉइश्चर) 15 ते 17 टक्के असावे.
मळणी:
सोयाबीन बियाण्याचे बाह्य आवरण पातळ व नाजूक असल्याने, मळणी यंत्राच्या ड्रमची गती 350-400 फेरे प्रति मिनिट या दरम्यान असावी. जेणेकरून बियाणाला इजा पोचणार नाही आणि उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होणार नाही.
साठवणूक:
साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचे प्रमाण (मॉइश्चर)10 ते 12% पेक्षा जास्त नसावे. यासाठी बियाणे उन्हात सुकवून तागाच्या पोत्यात भरावे. साफ केलेले बियाणे 50-100 किलोच्या तागाच्या पोत्यात पाच थप्यापर्यंत हवेशीर खोलीत किंवा शेडमध्ये रचून ठेवावे.
Soyabean crop-सोयाबीन पीकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन:
- सोयाबीन हे पीक मध्यम व भारी जमिनीतच घ्यावे, हलक्या जमिनीत पिकाची लागवड केल्यास आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.
- सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी दहा वर्षाच्या आतील प्रसारित वाणाचा वापर करावा.
- घरगुती बियाणे वापरताना बियाण्याची उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी.
- Soyabean crop-सोयाबीन पिकाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.
- प्रमुख कीड व रोगास प्रतिकारक/ सहनशील वाणांचा वापर करावा.
- सलग सोयाबीन पिकाची पेरणी करताना एकरी 30 किलो ऐवजी 26 किलो बियाणे वापरावे.
- 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करताना बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी.
- सोयाबीन पिकाची सलग क्षेत्रावर पेरणी केली असल्यास सहा ते सात ओळीनंतर सरी पाडावी.
- पेरणी करताना बियाणे पाच सेंटीमीटर पेक्षा खोल पडणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येणार नाही.
- शिफारशीप्रमाणे खताची मात्रा व एकरी 10 किलो गंधक पेरणीच्या वेळेस द्यावे, पेरणीनंतर जमिनीतून कोणतेही खत देऊ नये.
- अपवादात्मक परिस्थितीत Soyabean crop-सोयाबीन पीकाची काईक वाढ झाल्यास लिओसिनची फवारणी करावी.
- सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना कोणतीही अंतर मशागत करू नये.
- सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रण करताना शक्यतो अमावस्येच्या अगोदर सकाळच्या वेळी अथवा सायंकाळी फवारणी करावी.
- पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्याचा व निंबोळी अर्काचा सुरुवातीपासून आवर्जून वापर करावा.
- फवारणी करतेवेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा.
- फवारणी मध्ये स्टिकर चा वापर अवश्य करावा.
आपल्याला ही पोस्ट आवडल्यास इतरांना शेअर करा. धन्यवाद…
Very informative article
Thanks
माहिती विस्तारीत आहे.त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला येईल.
Superb information raskar saheb
Upyukt mahiti, ashich mahiti dya🙏
dhanyvad
savistar mahitibaddal dhanyvad