Kharip Hangam: शेतकऱ्यांना तारणार यंदाचा खरीप हंगाम?

सध्या मे महिन्याचे कडक ऊन डोक्यावर घेत शेतकरी Kharip Hangam खरिपाच्या पूर्व तयारीला लागला आहे. आपल्या सर्व कुटुंबकबिल्यासह सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी मोठ्या आशेने शेतात राबत आहे. काट्याकुट्या वेचणे, शेणखत पसरणे (टाकणे), जमिनीतील तणांच्या मुळ्या, गाठी खोदणे, जमीन भुसभुशीत करणे, पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांधांची डागडुजी करणे या कामांना गती येऊ लागली आहे.

मागील वर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगामात पेरणी कमी झाली होती. यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. कृषी विभागही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज झाला आहे. आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहेत.

या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांनीही खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

Kharip Hangam
Kharip Hangam

Kharip Hangam कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना-

1. रब्बी हंगामातील पिके निघालेल्या शेताची लगेच नांगरणी करावी. जेणेकरून जमीन तापण्यास मदत होईल. त्यामुळे किडींचे कोष, पिकांना घातक असणाऱ्या बुरशी मरून जातील. लव्हाळ्यासारख्या तणांच्या गाठी, कंद जळून तणांचा नायनाट होईल.

2. जमीन सुधारणेची कामे, ज्यामुळे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढेल, जमीन भुसभुशीत होईल अशी कामे करावीत.

3. शेत स्वच्छ करत असतानाच, गोळा होणारा काडीकचरा कंपोस्ट खड्ड्यात साठवावा. त्याचे चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होईल. यामुळे खतावरील खर्च तर वाचेलच पण जमिनीचे आरोग्यही सुधारेल.

4. आपण खरिपात कोणते पीक घेणार आहोत, त्याच्यासाठीच्या खताच्या मात्रा माहीत करून घ्याव्यात.

5. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने गोळा करावेत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे.

6. शेतातील पाणी, माती वाहून जाऊ नये म्हणून बांध व्यवस्थित करून घ्यावेत.

7. शेतात राहिलेल्या खोल मुळ्या, तणांचे कंद, गाठी, पालव्या खोदून काढाव्यात.

Kharip Hangam Crops खरीप पिके-

खरीप हंगामातील पिकांची पेरणी ही पहिल्या पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जून मध्ये होते. तर पिकांची कापणी पावसाळी हंगामाच्या शेवटी म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये केली जाते. महाराष्ट्र राज्याचा विचार करता पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणाऱ्या या पिकांचे क्षेत्र हे अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी आहे. खरिपामध्ये बहुतांश सोयाबीन, भात, भुईमूग, नाचणी, उडीद, तुर, मुग, सूर्यफूल, कापूस ही पिके घेतली जातात. लवकरच आता पावसाला सुरुवात होईल आणि पेरणीच्या कामांना वेग येईल. शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

Kharip Hangam पेरणीपूर्व खत नियोजन-

पेरणीपूर्वी शेतकरी रासायनिक खतांच्या मात्रा जमिनीत टाकतात. परंतु बरेचदा त्यांना आपल्या पिकासाठी कोणत्या खतांची गरज आहे हे माहीत नसते. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. यासाठी त्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे, हे माहीत करून घेऊन त्यानंतरच खतमात्रा ठरवावी. तसेच आपल्या जमिनीत कोणती अन्नद्रव्य आहेत, याच्या माहितीसाठी माती परीक्षण करून घ्यावे. जेणेकरून त्या पिकाला योग्य त्या खतमात्रा, योग्य त्यावेळी शिफारशीत प्रमाणात देता येतील. याचा नक्कीच त्या पिकाला आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल.

रासायनिक खताबरोबरच अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, रायझोबियम, निळे- हिरवे शेवाळ यासारखी जिवाणू खते वापरावीत. त्यामुळे रासायनिक खतांची बचत तर होईलच शिवाय पर्यावरणाचे संवर्धनही होईल. मातीमध्ये पिकांच्या वाढीसाठीची भरपूर अन्नद्रव्य उपलब्ध असतात पण ती काही कारणास्तव पिकांच्या मुळांना सहजपणे शोषून घेता येत नाहीत. अशा अन्नद्रव्यांचे विघटन करून ते पिकाला सहज उपलब्ध करून देण्याचे काम ही जिवाणू खते करतात. या सर्व बाबींचा विचार करून संतुलित खत व्यवस्थापन करावे.

Kharip Hangam कृषी विद्यापीठांच्या शिफारशी-

कृषी विभागाकडूनही हंगाम सुरू होताना वेळोवेळी शिफारशी केल्या जातात. जसे की,

  • बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी.
  • खते, बियाणे ही अधिकृत परवानाधारक दुकानदाराकडून घ्यावीत.
  • जमिनीत पुरेसा ओलावा, म्हणजेच चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
  • बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिके गावागावात सादर केली जातात.
  • ‘विकेल ते पिकेल’ या योजनेअंतर्गत प्रोत्साहन देऊन नागली, कुळीथ यासारख्या पारंपारिक पिकांच्या लागवडीसाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले जाते.
  • डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके पुरवली जातात.

खरीप हंगामातील पिकांची स्पर्धा-

महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीने खरीप पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. पीक स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते. स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते. उत्पादन वाढीसाठी प्रयोगशील असणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोबल वाढते. या स्पर्धेत सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सूर्यफूल अशा 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येतो. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क भरून या स्पर्धेत भाग घ्यायला लागायचा. परंतु आता तालुका पातळीवर एकच प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार स्पर्धेतील विजेत्यांची तालुका पातळीवर निवड केली जाते. मागील दोन वर्षात तालुका पातळीवर प्रथम दोन क्रमांक प्राप्त केलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नियम व अटी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज दाखल करण्याचा दिनांक, प्रवेश शुल्क, स्पर्धेचे स्वरूप या सर्व माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाची संपर्क साधावा.

अफवांचे पीक:

हंगामाच्या ऐन सुरुवातीलाच अनेक अफवा पसरविल्या जातात. जसे की, खतांचे दर वाढले, अधिक मागणी असलेल्या एखाद्या खताची टंचाई आहे किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते.  बियाणांच्या बाबतीतही अशा प्रकारची टंचाई किंवा दरवाढ शेतकऱ्याच्या माथी मारली जाते. शेतकऱ्यांनीही अशा प्रकारच्या माहितीची नजीकच्या कृषी कार्यालयात जाऊन शहानिशा करावी. कृषी विभागाला याची कल्पना द्यावी. जेणेकरून अशा अफवा पसरविणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करता येईल. त्यांना आळा बसेल. शेतकऱ्यांचे नुकसान, लुटमार थांबेल.

प्रधानमंत्री पिक विमा योजना

हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे पेरणी न होणे, काही वेळेस दुबार पेरणी करावी लागणे. तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पावसाचा खंड, पूर, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, दरड/वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, नैसर्गिक आग अशा टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात घट होणे. काढणी पश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, योग्य ते पंचनामे करून नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही भरपाई दिली जाते.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘ई – पीक’ पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करावी लागते.  त्यानंतर संबंधित विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपत्तीजनक घटना घडल्यानंतर संबंधित विमा कंपनीस, संबंधित बँकेस, कृषी/महसूल विभागास 72 तासाच्या आत तात्काळ कळवावे लागते.  अशा प्रकारे शेतकऱ्यांना अनपेक्षित घटनांमुळे होणारे पीक नुकसान कव्हर होण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. म्हणूनच शेतकऱ्यांनी हा विमा अधिकाधिक काढावा यासाठी कृषी विभाग ही जनजागृती करत आहे. त्यांच्याशी संपर्क साधून किंवा 18002660700 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधून याविषयीची सविस्तर  माहिती घेऊन सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा…

1 thought on “Kharip Hangam: शेतकऱ्यांना तारणार यंदाचा खरीप हंगाम?”

Leave a Comment