Jivamrut-जीवामृत कशासाठी? दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. रासायनिक खतांवरही जास्त खर्च होत आहे. अशातच खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही. त्याला पर्याय म्हणून जर आपण सेंद्रिय /जैविक खतांचा (Organic Fertilizers) वापर केला तर किमान उत्पादन खर्चात तरी बचत होईल. ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवली तर उत्पादन नक्कीच वाढेल, उत्पादनांचा दर्जा सुधारेल. यासाठी शेतीत Jivamrut-जीवामृत, बिजामृत, पंचगव्य, धान्यगव्य, अमृतपाणी यांचा वापर केला पाहिजे. जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.जिवाणूंची संख्या वाढल्याने हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रामाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
शासन स्तरावर सुद्धा सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
Jivamrut-जीवामृत हे घरच्याघऱी कमी खर्चात कसे तयार करावे?
साहित्य:
1. प्लास्टिक ड्रम: 200 लिटर क्षमतेचा
2.गाईचे ताजे शेण: 10 किलो
3. गोमूत्र: 10 लिटर
4. काळा गुळ: 2 किलो
5. कोणत्याही कडधान्याचे(डाळीचे) पीठ: 2 किलो
6. वडाच्या झाडाखालील माती: 2 किलो
7. पाणी: 200 लिटर
तयार करण्याची पद्धत/ कृती:
*जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर क्षमतेच्या एका प्लास्टिक ड्रममध्ये 150 लिटर पाणी भरून घ्या. त्या पाण्यात 2किलो काळा गुळ विरघळून घ्या.
*गाईचे ताजे शेण 10 किलो, गायीचे गोमूत्र 10 लिटर, कोणत्याही डाळीचे पीठ 2 किलो व वडाच्या झाडाखालील माती 2 किलो या क्रमाने ड्रममध्ये टाका.
*वरील सर्व मिश्रण हलवून मिसळा (एकजीव करा) व शिल्लक राहिलेल्या ड्रममध्ये काठापर्यंत पाणी भरा. हे मिश्रण घड्याळाच्या दिशेने व त्यानंतर विरुद्ध दिशेने असे 10-10 मिनिटे ढवळा.
*हे द्रावण सावलीमध्ये झाकून ठेवावे साधारणपणे 3 दिवसांनी जीवामृत तयार होते. आपण ते जास्तीत जास्त 5 दिवसांपर्यंत वापरू शकतो. विशेषत: तिसऱ्या दिवशी जिवाणूंची संख्या ही लक्षणीय असते व त्यानंतर हळूहळू त्यामध्ये घट होत जाते. त्यामुळे शक्यतो ते 3 दिवसांनी लगेच वापरण्यात यावे.
*सावलीत ठेवलेले हे मिश्रण तयार केल्यानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा घड्याळाच्या दिशेने 5 ते 10 मिनिटे ढवळावे.
*साधारणत: एकरी 200 लिटर जीवामृत पुरेसे आहे.
शेतीमध्ये वापरण्याची पद्धत:
- जमिनीत ओलावा असताना जमिनीवर शिंपडावे.
- पिकांना पाणी देताना पाण्याच्या पाटा मधून देता येते.
- रोपांना किंवा झाडांना 200 ते 250 मिली प्रति झाड या प्रमाणात आळवणी करू शकतो.
Jivamrut-जीवामृत वापरण्याचे फायदे:
- जीवामृतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमीन भुसभुशीत होते व हवा खेळती राहते. परिणामी जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढते.
- शेतजमिनीवर पडलेल्या सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन होते. जीवाणूमुळे पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात त्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते.
- जीवामृत टाकलेल्या ठिकाणी आपल्याला एका आठवड्यामध्ये गांडुळांची पिल्ले आढळतील.
- गांडूळ तसेच सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्य पुरवण्याचे महत्त्वाचे काम जीवामृत करते.
जीवामृताचे गुणधर्म /वैशिष्ठ्ये काय आहेत?
चांगल्या जिवामृताचा रंग तांबडा ते काळसर असतो. यात नत्राचे प्रमाण 3 ते 6 टक्क्यांपर्यंत असते.
जिवामृताचा सामू(Ph) जवळपास आम्लधर्मी असतो.
पिकांसाठीउपयुक्त सुक्ष्म जिवाणूंच्या निरनिराळ्या प्रजातींच्या वाढीसाठी जिवामृत हे उत्कृष्ट अन्नस्त्रोत ठरते.
जिवामृतातील सुक्ष्मजीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात त्यातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर कमी होते.
जिवामृत द्रवरुपात असल्याने जिवाणूंची संख्या व टिकण्याचा कालावधी वाढतो.
Jivamrut-जीवामृतजास्तीत जास्त 7 दिवसात वापरावे.
अमृतपाणी:
हे द्रावण पिकांसाठी अमृताप्रमाणे काम करते म्हणून याला हे नाव पडले असावे. हे द्रावण पिकांच्या जोमदार वाढीसाठी वापरण्यात येणारे एक सेंद्रिय टॉनिक आहे. याच्या वापराने पिकांची निरोगी वाढ होते. रासायनिक औषधांपेक्षा हे कमी खर्चिक व जास्त परिणामकारक आहे. असे हे अमृतपाणीही आपण घरच्या घरी तयार करू शकतो.
अमृतपाणी तयार करण्याची पद्धत:
साहित्य:
1. प्लास्टिक ड्रम: 10 लिटर क्षमतेचा
2.गाईचे ताजे शेण: 1 किलो
3. गोमूत्र: 1 लिटर
4. काळा गुळ: 250 ग्रॅम
5. पाणी: 10 लिटर
तयार करण्याची कृती:
*वरील सर्व साहित्य प्लास्टिकच्या ड्रममध्ये एकत्र करून, चांगले हलवून 2 ते 3 दिवस आंबवण्यासाठी ठेवावे.
*हे मिश्रण दिवसातून 2 वेळा उजवीकडून डावीकडे ढवळावे.
*त्यानंतर हा ड्रम सावली मध्ये ठेवावा.
*हे द्रावण तयार केल्यानंतर 3 ते 5 दिवसापर्यंत आपण वापरू शकतो.
वापरण्याची पद्धत:
- 150 मिली. द्रावण 15 लिटरच्या फवारणी पंपासाठी वापरावे.
- फवारणी ही शक्यतो संध्याकाळी 4 नंतर करावी.
- तसेच 20 ते 30 लिटर अमृत पानी पाटाच्या पाण्यामधून किंवा ड्रीप मधून आपण एक एकर क्षेत्रासाठी वापरू शकतो.
फायदे:
- अमृत पाण्याची फवारणी केली असता पिकांना पानामार्फत नत्राचा पुरवठा होतो.
- या फवारणीमुळे किडी जवळ येत नाहीत.
- जमिनीतून हे अमृतपाणी सोडल्यास यामधील सूक्ष्मजंतू जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात व ते पिकांना उपलब्ध करून देतात.
- या पाण्याचा उपयोग कंपोस्ट(Decompose) खत बनवण्यासाठी केला जातो.
- सेंद्रिय शेती म्हणजे काय? हे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
3 thoughts on “Jivamrut-जीवामृत घरच्याघऱी कसे तयार करावे?”