सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उठवली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रात याचा वापर होत आहे. अगदी आपल्या दैनंदिन वापरातील स्वयंचलित उपकरणे, बँकांमधील एटीएम, स्वयंचलित वाहने, चेहरा किंवा हाताचे ठसे ओळखणारी सुरक्षा उपकरणे, हजेरी ठेवणारी यंत्रे, मोबाईल मधील दिशादर्शक हे सर्व आपण कळत नकळत वापरत आहोत.
माणसाचे तंत्रज्ञानावरील अवलंबित्व वाढत आहे. परंतु हे सारे जग आपल्यापासून खूप दूर आहे असे सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटत असतानाच या तंत्रज्ञानाने शेती क्षेत्रातही आपला वावर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील क्लिष्ट व जटिल वाटणारी कामे सहज व सोपी होणार आहेत. अफाट वेगाने आपल्या अवतीभवतीच्या गोष्टी बदलत आहेत. आता चावडीच्या कट्ट्यावरील, पारावरील चर्चेमध्ये सुद्धा राजकारण, क्रिकेट याबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) या विषयावरील चर्चाही ऐकायला मिळत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणजे काय?
माणसाला जर एखादे यंत्र चालवायला दिले तर त्यावेळी माणसाकडून जे निर्णय घेतले गेले असते, तसेच निर्णय घेण्याची प्रणाली या यंत्रामध्ये असते. म्हणजेच माणसाप्रमाणे काम करणारी बुद्धिमत्ता संगणकीय प्रणाली द्वारे तयार केली जाते, यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) असे म्हणतात. वेगवेगळी यंत्रे व संवेदके यांच्या साह्याने प्रत्यक्ष परिस्थितीची, सातत्याने माहिती गोळा करून त्यांचे संगणकीय प्रणाली मध्ये विश्लेषण केले जाते. यामधून तयार होणारे वेगवेगळे पॅटर्न(निष्कर्ष) नोंदवून ते संगणकीय प्रणाली मध्ये साठवून ठेवले जातात. आणि त्या बरहुकूम योग्य त्या सूचना त्या यंत्राला किंवा संवेदकांना पाठवल्या जातात. ही क्रिया त्वरित होत असते. थोडक्यात काय तर मानवी बुद्धीचे अनुकरण किंवा नक्कल करणारे हे तंत्रज्ञान आहे.
जॉन मॅकार्थी यांनी 1995 मध्ये सर्वप्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) ही संकल्पना मांडली. बुद्धिमान यंत्र बनवण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या त्रिसुत्रीचा वापर अशी या तंत्रज्ञानाची व्याख्या त्यांनी केली होती. माणसाप्रमाणे निर्णय घेऊन काम करणारी बुद्धिमत्ता, संगणकीय प्रणालीद्वारे विकसित करून अपेक्षित कार्य साध्य करणे हा त्यांचा दृष्टिकोन होता.
कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) चा वापर:
प्रचंड मेहनत करणारा शेतकरी आज तंत्रज्ञानातील नवीन बदल स्वीकारत आहेत. कारण शेतकऱ्यासमोर आज सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे ‘अनिश्चितता’.
जसे की, शेतकऱ्याने जरी चांगले बियाणे आणले तरी त्यापासून चांगले उत्पादन मिळणार आहे का? तर हे माहीत नाही.
उद्या पाऊस पडणार आहे का? पडला तर किती आणि कधी पडेल?
पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळेल का?
शेतातील पिकावर काही किडी, रोग, टोळधाड पडणार आहे का?
आलेल्या पिकाला बाजार भाव मिळणार आहे का?
अशा प्रकारच्या या अनिश्चिततेमधून बाहेर पडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अचूक मदत करू शकेल.
खाणारी तोंडी वाढत आहेत, त्यामुळे शेतमालाची मागणी वाढलेली आहे. याउलट पिकाऊ जमिनी नापीक बनत चालल्या आहेत. या सर्वांचा मेळ कसा घालायचा हा प्रश्न ‘आ’ वासून उभा असतानाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) यावरील रामबाण उपाय ठरेल असे तज्ञांचे मत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) च्या मदतीने शेतीची अनेक कामे स्वयंचलित करता येतात. यामध्ये अनेक प्रकारच्या सेंसर आणि उपकरणांची मदत घेतली जाते.
मशीन लर्निंग अल्गोरिदम:
पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था व त्यावर वेगवेगळ्या स्थितीमध्ये येणारे विविध प्रकारचे ताण ओळखणे. त्यानुसार पिकाची वाढ किती होईल तसेच उत्पन्नाचाही अंदाज लावता येतो.
हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम:
यामुळे शेतीत खरी क्रांती झाली आहे. कारण शेतकरी आपल्या पिकाचे आरोग्य तपासू शकतो. वनस्पतींच्या पानांच्या रंग व लक्षणावरून पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव शोधणे, किडी संदर्भात अंदाज लावणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक त्या सूचना देणे.
स्मार्ट सिंचन पद्धती:
सेंसर बेस्ड ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम च्या वापरामुळे अगदी कमी पाण्याच्या क्षेत्रातील, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेती केली जात आहे.
हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग:
हवामान, माती, पाणी व त्यांचे प्रकार, गुणधर्म तसेच मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण ओळखून त्यानुसार शेतकऱ्याला खतमात्रेची शिफारस सुचवणे.
रिमोट सेन्सिंग टेक्निक:
शेतकऱ्यांना हवामान बदलाचा अंदाज आल्यामुळे पिकाचे पुढील नियोजन सुलभ होईल.
तसेच पीक काढणी योग्य झाल्याचे ओळखून कापणीच्या सूचना शेतकऱ्याला किंवा संबंधीत स्वयंचलित यंत्राला देणे.
शेतीमधून निघालेल्या उत्पादनाची प्रतवारी ठरवून वर्गीकरण करणे. नाशवंत मालासाठी हे तंत्रज्ञान वरदानच आहे.
कृषी रोबोटिक्स:
मार्फत शेतीमधील वेगवेगळ्या क्रिया जसे की मशागतीची कामे, तन नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन, पिकाची कापणी, पीक संरक्षण म्हणजेच औषध फवारणी कमी खर्चात, कमी वेळेत करता येते जेणेकरून नुकसानीची पातळी कमी होईल.
चाटबॉट:
LLM म्हणजेच चॅट जी पी टी ज्या तंत्रज्ञानावर विकसित झाले आहे ते तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अगदी सेकंदात मिळवू शकतो. उदा. किसान- ए आय, प्लांटिक्स.
आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी टायपिंग करता येत नसेल तर आपण तोंडीही प्रश्न विचारू शकतो अगदी आपल्या भाषेत त्या प्रश्नाचे उत्तर आपण ऐकू शकतो.
वर्ल्ड इकॉनोमिक फोरम या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी (AI) ‘ए. आय. फॉर एग्रीकल्चर इनोवेशन’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत तेलंगणा सरकार बरोबर सागू-बागू हा प्रकल्प राबवला. यामध्ये तेलंगणातील 7000 शेतकऱ्यांचा ग्रुप होता. या ग्रुपमधील शेतकऱ्यांच्या मिरचीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पावर काम केले. याचा परिणाम म्हणून उत्पन्नामध्ये प्रति एकर 21% वाढ झाली. मालाच्या गुणवत्तेमुळे 8% फायदा झाला. कीटकनाशकांच्या वापरात 9% टक्के घट झाली. खतांचा वापर 5 टक्क्यांनी कमी झाला. एकूणच शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रति एकरी 66 हजारांनी वाढले अशा प्रकारचे गोड रिझल्ट शेतकऱ्यांना या मिरची पिकातून मिळाले.
यामधील तज्ञ लोकांच्या मदतीने आपणही आपल्या शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) चे प्रयोग करू शकता.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान परवडेल का?
एका शेतकऱ्याला हे शक्य नाही जर शेतकऱ्यांचे ग्रुप करून किंवा राज्य सरकारने जर इच्छाशक्ती दाखवली तर शेतकरी आपल्या शेतात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करू शकतील. यासाठी केंद्र व राज्य सरकारचे धोरण महत्त्वाचे आहे.
शेती क्षेत्रातील वरवर सोप्या दिसणाऱ्या या सर्व क्रिया अत्यंत क्लिष्ट व विषम आहेत. सातत्याने बदलणारे हवामान, मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरण तसेच आधुनिक शेतीच्या माहितीचा अभाव अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. आणि म्हणूनच शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी मोठी संधी आणि वाव आहे. त्यामुळे हे क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अशा सर्वच सरकारी, खाजगी संशोधन संस्थांना साद घालत आहे. त्या अनुषंगाने परदेशाप्रमाणे भारतातही संपूर्ण स्वयंचलित अशा विनाचालक ट्रॅक्टर, काढणीयंत्रे यांच्या चाचण्या काही कंपन्याकडून सुरू झालेल्या आहेत.
आपल्याकडील बरेचसे शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतजमीन तुकड्या-तुकड्यात विभागली आहे. तसेच सध्या तरी हे तंत्रज्ञान महागडे असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. परंतु त्याचे फायदे लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे गट, उत्पादक कंपन्या स्थापन करून आपल्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे.
1 thought on “Artificial Intelligence (AI) in agriculture: आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) ची पॉवर आता शेतकऱ्यांच्या वावरात…”