महाराष्ट्रात शेतीच्या अर्थकारणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण तर ऊस शेतीवर अवलंबून आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु ऊस शेतीमध्ये पाण्याचा आणि खतांचा अमाप वापर यामुळे जमिनी क्षारपड बनत चालल्या आहेत. बदलते हवामान, नवीन रोगांचा प्रादुर्भाव याचाही परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे एकरी 100,120, … टनाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, शेतीत काही महत्त्वाचे बदल करावे लागतील असे संशोधकांचे मत आहे.
महाराष्ट्रात उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली या तीन हंगामात केली जाते. या तिन्ही हंगामाची तुलना करताना पूर्व हंगामातील ऊस शेती फायद्याची दिसते. उगवणी पासूनच पूर्व हंगामी ऊसास अनुकूल हवामान मिळते. त्यामुळे उगवण चांगली होऊन फुटवा दमदार येतो. खरीप हंगामामध्ये इतर पीक घेऊन किंवा पूरबुडीत क्षेत्रांमध्ये पूर ओसरल्यानंतर पूर्व हंगामी लागण करता येते.
जमीन:
ऊसासाठी मध्यम ते भारी मगदूराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.5 टक्के पेक्षा जास्त असावे.
पूर्व मशागत:
ऊस पीक दीर्घकाळ म्हणजे बारा ते अठरा महिने शेतात उभे राहत असल्यामुळे पिकाच्या जोमदार वाढीसाठी, पूर्व मशागत खूप महत्त्वाची आहे. जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरटीनंतर जमीन 15 ते 20 दिवस उन्हामध्ये तापू द्यावी. नंतर दुसरी नांगरट करावी. कुळवाच्या उभ्या, आडव्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. कल्टीवेटर चालवून मगच सरी सोडावी. सरी सोडण्यापूर्वी हेक्टरी 50 बैलगाडी शेणखत/कंपोस्ट खत (15 ट्रॅक्टर ट्रॉल्या) आणि 60 किलो गंधक टाकावे.
मध्यम जमिनीत 3.5 ते 4.5 फूट सरी
भारी जमिनीत 4.5 ते 5.5 फूट रुंद सरी सोडावी.
ऊस लागवडीचा कालावधी:
सध्या बाराही महिने ऊसाची लागवड होत असली तरी ऊस लागवडीचे खालील 3 प्रमुख हंगाम आहेत.
आडसाली ऊस लागवड जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते, हा ऊस 16 ते 18 महिने शेतामध्ये उभा राहतो.
पूर्व हंगामी उसाची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये केली जाते, हा ऊस 14 ते 15 महिने शेतात उभा राहतो.
सुरू हंगामातील उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते आणि हा ऊस 12 ते 14 महिने शेतात उभा राहतो.
जातींची निवड:
अधिक ऊस उत्पादन, साखरेचा उतारा आणि चांगला खोडवा या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.
हे करत असताना पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित आणि शिफारशीत केलेल्या को 86032 (नीरा), को एम 265(फुले-265), को 94012(फुले सावित्री), कोसी 671, एम एस 10001 या जातींची प्रामुख्याने निवड करावी. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या को 86032 या वाणाची कोणत्याही हंगामात लागवड केली तरी चालते.
बेणे निवड: ऊस शेती/Us Sheti: लक्ष्य एकरी/100,120… टन यासाठी खूप महत्वाची आहे.
- ऊस लागणीसाठी बेणे मळ्यातीलच बेणे निवडावे.
- अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
- उसाचे बेणे लांब पेऱ्याचे (कांड्याचे),जाड, रसरशीत, सशक्त असावे.
- ऊस बेण्याचे वय 9 ते 11 महिन्याचे असावे तसेच डोळे फुगीर व वाढ चांगली झालेली असावी.
- आखूड कांड्याचा,पाण्याचा ताण पडलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
- तुरा आलेला, पांगशा(आंसा) फुटलेला व खोडव्यामधील ऊस बेण्यासाठी वापरू नये.
- बेणे हे रोग व कीडमुक्त असावे.
बेणेप्रक्रिया:
100 लिटर पाण्यामध्ये 100ग्रॅम कार्बेन्डाझम, 100ग्रॅम डायमिथोएट मिसळून, बेणे 10 मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अझिटोबॅक्टर 10किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू 1.50 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी/कांडी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
लागवड/ लागण:
कांडी लागण:
ओली पद्धत: हलकी आणि मध्यम प्रकारच्या जमिनीत ओली पद्धत वापरावी. या पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास सऱ्या पाडून झाल्यानंतर वरंब्यावर बेणे मांडून घ्यावे. त्यानंतर सरीमध्ये पाणी सोडून सरी 3/4 पाण्याने भरावी. कालांतराने पाणी मुरू दिल्यानंतर सरी मधील माती नरम होते. त्यावेळी बेणे सरीमध्ये तीन ते पाच सेंटीमीटर खोलीपर्यंत पायाने दाबावे. बेणे दाबत असताना डोळे खालच्या बाजूला राहिल्यास उगवण उशिरा होते, उगवणीचे प्रमाण कमी होते म्हणून बेणे दाबताना डोळे वरच्या बाजूला राहतील याची दक्षता घ्यावी.
कोरडी पद्धत: भारी जमिनीत कोरड्या पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने सरीत चरी खोदून त्यात 3ते5 सेंटीमीटर खोलीवर बेणे, डोळे वरच्या बाजूला राहतील असे मांडून मातीने झाकून पाणी सोडावे. यामुळे बेणे जास्त खोल जात नाही आणि उगवण चांगली व एकसारखी होते.
ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी (कांडी) वापरून करावी.
लागण एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास, उसाचे बेणे तोडताना कांड्यांचा 1/3 भाग व डोळ्याचे खाली कांड्यांचा 1/3 भाग राहील याप्रमाणे धारदार कोयत्याने तोडावे. कारण उगवण होणाऱ्या कोंबाला अन्न व पाणी पुरवठा ऊस कांड्यांचा खालच्या भागातून होतो. दोन डोळ्यातील अंतर 30ते45 सेंटीमीटर ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरी मधील अंतर 20 ते 25 सेंटीमीटर ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी/कांडी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लागणीसाठी एकरी एक डोळ्यांची 12,000 तर दोन डोळ्यांची 10,000 टिपरी/कांडी लागतात. फुटवा, वाढ, आणि उत्पन्न या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये एक डोळा पद्धती फायदेशीर ठरत आहे.
रोप लागण:
रोप लागण करताना सरीतील माती काढून त्यामध्ये रोप लावून व्यवस्थित दोन पायात दाबून घ्यावे लागेल. रोप जर वरच्यावर लागले तर ते तुमच्या जमिनीत व्यवस्थित प्रस्थापित होणार नाही त्यामुळे फुटवे ही निघणार नाहीत.
ऊस लागवड करताना किती अंतर ठेवावे?
उत्पादनाच्या दृष्टीने विचार केल्यास 5*1.5 हे अंतर रोप लागणीसाठी योग्य ठरेल. या पद्धतीने हेक्टरी 13500 ते 14500 रोपे लागतील. उसांची संख्या नियोजन करताना दोन सरीतील अंतर पाच फूट आणि दीड फूट अंतरावर एक रोप लावला. प्रत्येक रोपाला सात ते आठ फुटवे, असे नियोजन केले तर चाळीस हजार ऊसाची संख्या मर्यादित ठेवण्यात आपण यशस्वी ठरू.
आंतरमशागत:
ऊस लागण केल्यापासून पहिल्या सहा महिन्याच्या कालावधीत तनाचा बंदोबस्त, नांग्या भरणे, बाळ बांधणी, मोठी बांधणी, पाचट काढून आच्छादन करणे या गोष्टी फायद्याच्या ठरतात.
लगणी नंतर 2 ते 3 महिन्यांनी बैल अवजार किंवा मजुराच्या साह्याने बाळ बांधणी करावी, यावेळी ऊसाच्या फुटव्याला 3 ते 4 इंच माती लावावी.
मोठी बांधणी:
ऊस पीक साडेचार महिन्याचे झाल्यानंतर, वरंबे/भुंडा फोडून रासायनिक खतांची मात्रा देऊन अंतरमशागत करावी व रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करून घ्यावी. पाणी देण्यासाठी सऱ्या – वरंबे सावरून घ्यावेत.
फुटव्यांचे नियंत्रण:
ऊस संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी, ऊसाची जाडी वाढवण्यासाठी; मोठ्या बांधणीच्या वेळी जास्तीचे फुटवे काढून टाकावेत. मोठ्या बांधणीनंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला वाळलेले पाचट काढून सरीत दाबावे ऊस तूटेपर्यंत पाचट कुजून जाते व जमिनीचा पोत टिकून राहतो. तसेच पाचट आच्छादनामुळे फुटव्यांचे व तणांचे नियंत्रण होते.
तणनाशकांचा वापर:
ऊस पिकामध्ये तनाच्या नियंत्रणासाठी मेट्रीब्युझिन 2ग्रॅम/1ली.+2-4डी 5 ते6 मिली/1ली एकत्रित करून फवारणी घ्यावी. सध्या बाजारात विविध कंपन्यांची अनेक तणनाशके उपलब्ध आहेत. आपल्या ऊसाची व्हरायटी ऊसाचे वय, वाढ यानुसार आपल्या शेती सेवा केंद्र संचालकांच्या मार्गदर्शनानुसार वापर करावा.
खत व्यवस्थापन:
एकरी 100,120 टनाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, माती परीक्षण करून त्या आधारे शिफारशीत रासायनिक खताच्या मात्रा दिल्यास फायदेशीर ठरते. रासायनिक खतांचा वापर कार्यक्षम होण्यासाठी व पोषक द्रव्ये वाहून जाऊ नये म्हणून खते फेकून न देता पेरून द्यावीत,जेणेकरून खते मातीआड होतील. आडसाली ऊस लागवडीसाठी पीकास हेक्टरी 400 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश द्यावे. पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी पिकाला हेक्टरी 340 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश द्यावे. सुरू ऊस लागवडीसाठी पिकाला हेक्टरी 250 किलो नत्र 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश द्यावे.
खत मात्रा किलो/ हेक्टर
सूक्ष्म अन्नद्रव्य: लोह, जस्त आणि बोरॉन कमी असलेल्या जमिनीत प्रती हेक्टरी 10 किलो फेरस सल्फेट, 25 किलो झिंक सल्फेट, 5 किलो बोरॉन सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे.
ठिबकद्वारे खत व्यवस्थापन:
ठिबक सिंचनामुळे खतामध्ये 20 टक्के तर पाण्याची 50 टक्के बचत होते. उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
ठिंबक सिंचनातून विद्राव्य खते:
पाणी व्यवस्थापन:
हंगामानुसार उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी, पावसाळ्यात गरजेनुसार 14 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये. पाण्याच्या जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनते. अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही ऱ्हास होतो परिणामी रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. ऊस तोडण्यापूर्वी कमीत कमी 15 दिवस अगोदर ऊसाला पाणी देऊ नये.
ऊस पिकातील अंतर पिके:
- ऊसामध्ये सोयाबीन, भुईमूग, कांदा, मुग, उडीद, बटाटा, हरभरा, कमी कालावधीत तयार होणाऱ्या पालेभाज्या ही आंतरपीके घ्यावीत.
- आंतरपीक हे चार महिन्याच्या आत (मोठ्या बांधणीपूर्वी) निघणारे असावे.
- आंतरपीक जास्त उंचीचे व जास्त पसरणारे नसावे.
- आंतर पिकामुळे आर्थिक फायद्यासोबतच जमिनीचा पोत ही कायम ठेवता येतो.
- उसामध्ये आंतरपीक म्हणून ज्वारी, मका, सूर्यफूल या पिकांची निवड करू नये.
ऊसाला कोणती फवारणी, आळवणी करावी?
ऊस लागण किंवा खोडव्यास या फवारण्या फायदेशीर आहेत, अनुभव घेऊन पहा. परंतु आळवणी, फवारणीपूर्वी आपल्या कृषी सेवा केंद्र संचालकांचा नक्की सल्ला घ्या.
1)पहिली फवारणी: या फवारणीत संजिवके,पोषण द्रव्ये सोबत बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
*लागणी पासून 45 दिवसानी व खोडव्यासाठी 30 दिवसानी.
- 19:19:19 – 600 ग्राम
- चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये – 200 मिली/ग्राम
- 6 BA – 2 ग्राम
- क्लोरोपायारिफोस -150 मिली
- बाविस्टिन -150 ग्राम
*एकरी 6 पम्प पुरतात.
2) दुसरी फवारणी: लागणी पासून 65 दिवसानी व खोडव्यासाठी 50 दिवसानी
- 13:40:13/12:61:0 – 800 ग्राम
- चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये – 300 मिली/ग्राम
- GA – 3 ग्राम
- 6 BA – 3 ग्राम
- क्लोरोपायारिफोस – 180 मिली
- बाविस्टिन – 180 ग्राम
*एकरी 8 पम्प पुरतात.
*कीटकनाशक, बुरशीनाशक आवश्यकतेनुसार वापरा.
3)तीसरी फवारणी: लागणी पासून 85 दिवसानी व खोडव्यासाठी 70 दिवसानी
- 13:40:13/12:61:0 -1500 ग्राम
- चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये -300 मिली/ग्राम
- GA – 6 ग्राम
- सी विड एक्स्ट्राक्ट(टॉनिक) -500 मिली
- आवश्यकतेनुसार – कीटकनाशक, बुरशीनाशक
*एकरी 10 पम्प पुरतात.
4)चौथी फवारणी: लागणी पासून 105 दिवसानी व खोडव्यासाठी 90 दिवसानी
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे देता येणेची शक्यता कमी असते.
- 13:00:45 -1000 ग्राम
- काल्शियम नायट्रेट (चिलेटेड) – 500 ग्राम
- GA – 7 ग्राम किंवा
- ट्रायकाँन्टेनाँल 0.1% – 500 मिली
- सी विड एक्स्ट्राक्ट(टॉनिक) – 500 मिली
*एकरी 10 पम्प पुरतात.
आपण खोडवा पिकांकडे दुर्लक्ष न करता , खालील पद्धतीचा अवलंब केल्यास जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो.
खोडवा ऊस: शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन
लेख आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद…
Nice information,
Thank you