अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना:

मागील काही दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील ऊस शेती पाण्याखाली गेलेली आहे. येणाऱ्या दिवसात पिकाची पुन्हा चांगली वाढ होऊन, उत्पादनात वाढ व्हावी यासाठी अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना खालील प्रमाणे कराव्यात. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उताराच्या बाजूने चर काढावेत. शक्य असल्यास पंपाने पाणी शेताबाहेर काढावे. ऊसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. जेणेकरून शेतामध्ये हवा खेळती राहील.

नाहीतर पिकाचे काय नुकसान होऊ शकते ते पाहूया…

अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन
अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन

पिकाचे होणारे संभाव्य नुकसान:

शेतात पाणी साठवून राहिल्यामुळे मुळांची कार्यक्षमता घटते परिणामी मुळे अन्नद्रव्यांचे शोषण योग्य प्रकारे करू शकत नाहीत.

जमिनीतील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अन्नद्रव्यांची ऊपलब्धता कमी होऊन पाने पिवळी पडतात व पिकांची वाढ खुंटते.

पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या ऊसाच्या शेंड्यात पाण्याबरोबर माती गेल्याने कोंब कुजतो व आनसा/पांगशा फुटतात.

एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ ऊस पिक पाण्यात राहिल्यास पाने वाळतात.  ऊस पीक कुजू लागते.

नवीन केलेल्या कांडी लागवडीत सात दिवसापेक्षा जास्त काळ पाणी राहिल्यास बरेचसे डोळे कुजतात,  त्यामुळे ऊसाची उगवण कमी होते.

नदीकाठच्या पूरग्रस्त क्षेत्रात पाण्याच्या प्रवाहामुळे ऊस लोळतो.

कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

यासाठी करावयाच्या उपाययोजना: अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन

सात ते आठ दिवसापेक्षा जास्त काळ ऊस पिक पाण्याखाली गेल्यास शेतामध्ये वापसा आल्यानंतर कुजलेला ऊस काढून टाकावा. त्यानंतर जमिनीची नांगरट करून पिकांची फेरपालट म्हणून हिरवळीची पिके घ्यावीत.

तसेच गहू, हरभरा, मका यासारखी पिके घेऊन नंतर ऊस लागवड करावी.

शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावेत.

तसेच शक्य झाल्यास पंपाने पाणी शेताबाहेर काढावे.

ऊसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावी जेणेकरून हवा खेळती राहण्यास मदत होईल.

अंशतः वाळलेल्या ऊसामध्ये पिकाचा खोडवा घ्यावा. त्यासाठी जमिनीलगत ऊसाची छाटणी करावी. तुटाळ भरून काढावे. खोडवा मशागतीची कामे, कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी तसेच बेसल डोस टाकून हलकी भर लावावी.

तण जास्त वाढलेले असल्यास तनाचा बंदोबस्त करावा.

पूरपट्ट्यातील ऊसाची वाढ पुन्हा चांगल्या प्रकारे होण्यासाठी हेक्टरी 60 किलो नत्र (युरिया 130 किलो) पालाश 40 किलो (म्युरेट ऑफ पोटॅश 66 किलो) द्यावे.

डीएपी 20 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम अधिक पालाश 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

 नत्र स्थिर करणाऱ्या व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंचा एकरी 1लिटर या प्रमाणात वापर करावा.

कांडीकीड नियंत्रणासाठी कोराजन 5 ते 6 मिली प्रति पंप फवारावे.

पानावरील तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोईंग या रोगांच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन किंवा साफ 35 ते 40 मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.

गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संध्याकाळच्या वेळी ऊसाच्या हिरव्या पानांचे किंवा ओल्या बारदानाचे ढीग करून शेतात ठेवावेत, दुसऱ्या दिवशी बारदानावर गोळा झालेल्या गोगलगायी नष्ट कराव्यात. गोगलगायींचे प्रमाण जास्त असल्यास स्नेलकील या कीटकनाशकाचा वापर करावा.

पाणी ओसरल्यानंतर कुजलेला ऊस काढून टाकून, हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास शेताची ऊभी-आडवी नागरट करावी.

पीक संरक्षण उपाय करत असतानाच, तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेद्वारे तुमची पिके सुरक्षित करू शकता. ही एक सरकारी विमा योजना आहे, जी तुमच्या पिकांना प्रतिकूल हवामान आणि अनपेक्षित संकटांच्या जोखमीपासून संरक्षण देते.

सौजन्य: डॉ. अभिनंदन पाटील

डॉ. गणेश पवार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,

मांजरी (बु.) जिल्हा- पुणे.

2 thoughts on “अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना:”

Leave a Comment