ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला पोषक तत्वांची गरज असते, त्याप्रमाणे वनस्पतींनाही वाढीसाठी विविध पोषक तत्वांची आवश्यकता असते. वनस्पतींना वाढीच्या टप्प्यावर ही वेगवेगळी पोषक तत्वे मिळाली नाही, तर त्यांची वाढ खुंटते. काही ठराविक काळात ही पोषक तत्वे मिळाली नाही तर पिके सुकून जातात.
Wheat crop nutrients deficiency शेतीतज्ज्ञांच्या अभ्यासातील निरीक्षणानुसार 17 प्रकारची मूलद्रव्ये ही पिकाच्या वाढीवर परिणाम करतात. त्यापैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरित 14 अन्नद्रव्ये ही जमिनीतून मिळत असतात किंवा त्यांची फवारणी द्वारे ही पूर्तता केली जाते. या अन्नद्रव्यांची मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य अशा तीन भागात विभागणी केलेली आहे.

त्यांचे मुख्य कार्य आणि कमतरतेची लक्षणे आपण या लेखात गहू पिकाच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला खत व्यवस्थापन फवारणी नियोजन करणे सहज शक्य होईल.
नायट्रोजन चे कार्य –
नायट्रोजन मुळे वनस्पतीमध्ये प्रोटीन तयार होतात, की जी वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
पानातील हरितद्रव्यांची निर्मिती करतात त्यामुळे पिकांना गर्द हिरवा रंग (काळोखी) येतो.
वनस्पतीच्या वाढीला चालना मिळते. पानांची व खोडाची वाढ झपाट्याने होते.
नायट्रोजन दाणे तयार करण्यासाठी मदत करतात.
नायट्रोजनच्या कमतरतेची लक्षणे :
पिकामध्ये प्रोटीनचे कमतरता भासते व पिकांना पिवळसर हिरवेपणा दिसू लागतो.
पिकाची खालची पाने पिवळी होऊन गळतात.
वनस्पतीची वाढ थांबते, फुटवे कमी येतात परिणामी फुलकळी कमी निघल्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
फॉस्फरस चे कार्य –
फॉस्फरसच्या वापरामुळे मुळांचा विकास होतो. मुळे निरोगी व मजबूत होतात.
फॉस्फरसमुळे फळे लवकर येतात लवकर परिपक्वता येते. दाणे भरण्यासाठी मदत होते.
फॉस्फरसमुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, वजन वाढते.
पीक जमीनीवर लोळत नाही. पिकाची रोगप्रतिकारक्षमता वाढते.
फॉस्फरसच्या कमतरतेची लक्षणे :
पिकाची वाढ थांबल्यामुळे पीक लहान राहते. झाडाचे खोड बारीक होते.
पानांचा आकार लहान राहतो. पानाचा रंग हलका तांबूस किंवा जांभळा होतो.
डाळवर्गीय पिकांची पाने निळसर हिरव्या(गडद) रंगाची दिसतात.
मुळांची वाढ आणि विकास खुंटतो. काही वेळेस मुळे सुकतात

पोटॅशियम चे कार्य –
मुळांना मजबुती देऊन, वनस्पतींना पडण्यापासून वाचवतात. झाडाची साल जाड व मजबूत होते.
वनस्पतीची प्रतिकार क्षमता वाढते, त्यामुळे ते कीड व रोगांना बळी पडत नाहीत.
फळांना चांगला रंग येतो तसेच स्टार्च आणि साखरेच्या निर्मितीसाठी मदत करतात.
पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षणे :
पानावर तांबडे (भुरे) ठिपके पडतात. पानांच्या कडा तांबटसर होतात व पानगळ होते.
झाडाचे खोड आखूड राहते व शेंडे गळून पडतात.
मक्यासारख्या पिकामध्ये कणसे बुटकी राहतात आणि दाणेही पूर्णपणे भरले जात नाहीत.
कॅल्शियम चे कार्य –
कॅल्शियम हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे. यामुळे वनस्पतीमध्ये ऊतींची निर्मिती होते.
पेशीभित्तिका आणि पेशींच्या पडद्याच्या निर्मितीसाठी हे उपयुक्त आहे.
वनस्पतीमध्ये कार्बोहायड्रेटचे वहन होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.
वनस्पती मधील प्रकाश संश्लेषणासाठी उत्तेजना देते तसेच नायट्रोजनचा वापर अधिक कार्यक्षमतेने करते.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे :
नवीन पालवीमध्ये हरिद्रव्याचा अभाव दिसतो. कोवळ्या पानांच्या कडा वेड्या वाकड्या होतात.
नवीन पालवी वाळू लागते, त्यामुळे शेंड्याची वाढ होत नाही. तसेच फुलगळ होते.
मॅग्नेशियम चे कार्य –
वनस्पतीच्या वाढीच्या टप्प्यामधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम.
हा वनस्पतीमध्ये फॉस्फरसच्या वहनाचे कार्य करतो.
प्रकाश संश्लेषण क्रियेत मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच चयापचय क्रियेतही भाग घेतो.
मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे :
पाने पिवळी पडतात आणि वनस्पतीची वाढ मंद होते.
नवीन वाढणारी पाने गडद डागासह पिवळी पडतात.
पानावर जांभळे किंवा लालसर ठिपके दिसतात. हा करपा नसतो.
पानाच्या कडा व शिरांमधील भागाचा हिरवा रंग कमी होतो.
गंधकाचे (सल्फर) कार्य –
गंधकामुळे वनस्पतीच्या पानांमधील हरिद्रव्य वाढण्यास मदत होते.
तसेच प्रकाश संश्लेषण क्रियेतही भाग घेते.
वनस्पतीच्या अन्न निर्मितीला चालना मिळाल्यामुळे पिकाची कायिक वाढ जोमाने होते.
वनस्पतीमधील अमिनो आम्ल, प्रोटीन व स्निग्ध पदार्थाच्या निर्मितीसाठी सहाय्यक आहे.
सोयाबीन, मोहरी, कांदा, लसूण या पिकासाठी हे खूपच उपयुक्त ठरते.
गंधकाच्या कमतरतेची लक्षणे :
नवीन कोवळ्या पानांचा हिरवा रंग कमी होऊन पिवळसर पांढरी दिसू लागतात.
पीक पिवळे पडते. पिकाची वाढ खुंटल्यामुळे लोंब्या/ओंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते.
दाणेही पूर्ण भरले जात नाहीत.

लोहाचे (आयर्न) कार्य –
पानातील हरितद्रव्य आणि प्रोटीन तयार करण्यासाठी मदत करते.
वनस्पतीच्या अन्न निर्मितीसाठी आणि चयापचय क्रियेसाठी लोह गरजेचे असते.
वनस्पतीच्या मुळावरील गाठी मधील लेग हिमोग्लोबिन तयार करण्याचे काम करते.
नत्राच्या स्त्रीकरणात लोह मदत करते. श्वसनक्रियेत ऑक्सिजनच्या वहनाचे काम करते.
लोहाच्या कमतरतेची लक्षणे :
पानात हरितद्रव्याचा अभाव दिसतो.
कोवळी पाने पिवळी दिसतात, मात्र पानांच्या शिरा हिरव्या असतात.
कोवळ्या पानांची वाढ थांबते. पिकाची वाढ खुंटते.
फुले कमी लागतात व वांझ निर्मिती होते.
तांबे (कॉपर) चे कार्य –
तांबे आणि विषाणूजन्य रोगापासून पिकाचे रक्षण करते.
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अँटिऑक्सिडन्टस ची निर्मिती करते.
वनस्पतीच्या जैव-रासायनिक एन्झायम क्रियांना मदत करते. त्यामुळे वनस्पतींची योग्य वाढ होते.
कॉपरच्या कमतरतेची लक्षणे :
पानांच्या शिरांमधील हरितद्रव्य कमी होतात.
पानांच्या कडा वाळू लागतात, पाने मुरगळतात.
फांदीच्या टोकाला पानांचे झुपके तयार होतात.
मुळावर गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते.
बोरॉनचे कार्य –
पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी बोरॉन आवश्यक आहे.
बोरॉनमुळे मुळांचा आणि पानांचा चांगला विकास होतो.
फुलांचा परागसंयोग चांगला होतो. त्यामुळे फुलांचे आणि फळांचे चांगले उत्पादन मिळते.
पिकामध्ये रोगप्रतिकारक म्हणूनही बोरॉन काम करते.
बोरॉनच्या कमतरतेची लक्षणे :
पानावर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात.
पिकांची वाढ कमी होते. झाडांचा शेंडा वाळतो.
पिकाची वाढ थांबते तसेच इंटरनोडची उंची कमी राहते.
जस्त (झिंक)चे कार्य –
जस्त हे पाण्याचे शोषण व योग्य स्थलांतर करण्यास मदत करते.
हरितद्रव्य निर्मितीमध्ये अप्रत्यक्षपणे मदत करते.
फुलांचे उत्पादन वाढून फळांची गुणवत्ता सुधारते.
वनस्पतींच्या मुळांच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
पिकाची प्रतिकारशक्ती वाढते.
झिंकच्या कमतरतेची लक्षणे :
पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो.
पाने तपकिरी किंवा तांबड्या रंगाची दिसतात.
खोड व पानाचा देठ वाळतो, अकाली पानगळ होते.
पानावर करपलेले ठिपके पडतात, त्यामुळे पाने वाळलेली दिसतात.

मॅंगेनीज चे कार्य –
वनस्पतींच्या अनेक जैविक प्रक्रियेसाठी मँगेनीज महत्त्वपूर्ण आहे.
मॅंगेनीज झिंक आणि इतर पोषक तत्वाबरोबरच हरितद्रव्य निर्मितीसाठी मदत करते.
त्यामुळे पिकांचा हिरवेगारपणा (काळोखी) वाढते.
मॅंगेनीजमुळे वनस्पती पर्यावरणातील ताण सहन करू शकतात.
मॅंगेनीजमुळे मुळातील पोषणद्रव्यांच्या शोषणाला मदत होते.
मँगेनीजच्या कमतरतेची लक्षणे :
पानांच्या शिरांमधील भाग पिवळा आणि शिरा गडद हिरव्या रंगाच्या दिसतात.
त्यामुळे पानावर चौकटीदार नक्षी दिसू लागते.
पिकाची वाढ मंद होते.
मॉलिब्डेनम चे कार्य –
पिकामधील नायट्रोजनचे चयापचय सुधारण्यासाठी मॉलिब्डेनम हे महत्वपूर्ण पोषणतत्व आहे.
पिकामधील अनेक एन्झायम्सना सक्रिय करण्याचे काम मॉलिब्डेनम करते.
पिकांची सामान्य स्थिती उत्तम राहून उत्पादनात सुधारणा होते.
पिकामध्ये रोग प्रतिकारक्षमता सुधारण्यास मॉलिब्डेनमुळे मदत होते.
मॉलिब्डेनमच्या कमतरतेची लक्षणे :
पीक सामान्यतः पिवळे पडलेले, विकृत दिसते.
तपकिरी, नारंगी रंगाचे ठिपके पानावर दिसतात.
पानाच्या खालच्या भागातून डिंकासारखा द्रव पदार्थ पाझरतो.
पाने लांब चाबकासारखी वाळलेली दिसतात.
हे ही वाचा
रासायनिक खतांचा समतोल वापर
विद्राव्य खतांची (Water Soluble) ओळख व त्यांचा कार्यक्षम वापर
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख… आपल्या हातून असेच शेतकरी हिताचे काम व्हावे यासाठी शुभेच्छा!