एखाद्या आजारी माणसाला सलाईन वाटे टॉनिक देऊन त्याचा थकवा, अशक्तपणा कमी केला जातो. त्याचप्रमाणे, पिकाची वाढ मर्यादित कालावधी मध्ये कमी झाली असेल तर त्यास आधार/ ताकद देण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी, थोडेसे टॉनिक म्हणून अन्न व पाणी पिकांना, पानावाटे देणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांना जलद गतीने अन्नद्रव्य देण्याचे कार्य ही Water Soluble Fertilizers करतात. यासाठी केवळ एकच फवारणी करून चालणार नाही तर वेळप्रसंगी 15-20 दिवसांनी पिकांच्या वाढीनुसार, खतामधील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आपण विविध स्वरूपात, अनेक प्रकारे खतांचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून, पाण्यातून, विद्राव्य खते, (Water Soluble Fertilizer) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते असे विविध खतांचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याचदा गरज नसताना किंवा दिल्या जाणाऱ्या खतांचे पिकांमधील कार्य माहिती नसताना त्यांची मात्रा पिकास दिली जाते. अशावेळी आपल्या खर्चात वाढ होतेच, परंतु पिकास अनावश्यक खतांची मात्रा दिल्यामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतात. परिणामी उत्पादनात घटते.
ज्या ठिकाणी शेती केवळ पावसावर अवलंबून आहे आणि पाण्याची कोणतीच सुविधा नाही अशा परिस्थितीत, बुडत्याला काडीचा आधार म्हणून जमिनीतील पिकांच्या मूळाच्या खाली असणारी थोडीफार ओल उचलून घेण्याची ताकद पिकांना येण्यासाठी, पिकांना प्रथम सशक्त करणे गरजेचे आहे. पिकांना पानावाटे पोषक आहार देऊन, मुळाची ताकद वाढवून ती अधिक खोलवर नेऊन, जमिनीतील ओलावा खेचून वाढ करून घेता येते.
सध्या शेतीमध्ये रासायनिक खत वापरावर होणारा खर्च वाढत आहे. विद्राव्य खतांचा संतुलित वापर केल्यास उत्पादन खर्चात निश्चित बचत होईल. त्यासाठी विविध Water Soluble Fertilizers खतांच्या ग्रेड्स, त्यांचे कार्य व त्यांचा वापर करण्याची योग्य वेळ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे केलेल्या संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पिकास फायदा होतो.
विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी कसा केला जाऊ शकतो?
* फवारणीद्वारे: विद्राव्य खते ही पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत असल्यामुळे त्यांचा फवारणी द्वारे वापर केला जातो.
* ठिबक सिंचनाद्वारे: पिकाच्या गरजेनुसार मुळापाशी योग्य अन्नद्रव्य, प्रमाणशीर देता येते.
सर्व पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार नत्र, स्फूरद व पालाशयुक्त खते पाण्यात विरघळवून पानावाटे देणे अतिशय गरजेचे आहे. पिक वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीसाठी 50 ते 150 ग्रॅम या प्रमाणात प्रति 15 लिटर पाण्यातून वापरावे. एकरी 150 ते 200 लिटर पाण्याचा फवारणीसाठी वापर करावा. अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक आणि अन्य सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करू लागली आहेत. त्याद्वारे पिकांना आवश्यक अन्नद्रव्य पुरवण्यासाठी पाण्यातून संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा वापर केला जातो. त्यासाठी बाजारात अनेक विद्राव्य खते उपलब्ध आहेत.
विविध रासायनिक खतांच्या ग्रेड्स, त्यांचे कार्य व त्यांचा वापर करण्याची योग्य वेळ
1) 19:19;19 व 20:20:20

या खतांना ‘स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात.
या खतांचा वापर प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत केला जातो.
पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी हे उपयुक्त ठरते.
2) 12:61:00

नवीन मुळांची तसेच शाकीय वाढ जोमदार होण्यासाठी या खताचा उपयोग होतो.
यामुळे फुटवा चांगला येण्यासही मदत होते.
फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी उपयुक्त असते.
या खतास ‘मोनो अमोनिअम फॉस्फेट’ असे म्हणतात.
3) 13:40:13

लवकर फुले येणे, लवकर फळ धरणे आणि फळ वाढण्याच्या स्थितीमध्ये हे खत उपयुक्त आहे.
फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.
पिकामध्ये नवीन मुळे विकसित होऊन, पीक वाढीस चालना मिळते.
4) 00:52:34

यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
विशेषत: फुले लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर या खताचा वापर केला जातो.
फळपिकांमध्ये फळांच्या योग्य वाढीसाठी, तसेच आकर्षक रंगासाठी याचा वापर होतो.
या खतास ‘मोनो पोटॅशिअम फॉस्फेट’ म्हणून ओळखले जाते.
5) 13:00:45 Water Soluble Fertilizers

यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून, पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते.
फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची वापर करणे गरजेचे आहे.
अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.
या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात. पिकास पाण्याचा ताण पडला असल्यास पिकाची प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी हे खत उपयुक्त आहे. यामुळे पिकांना दुष्काळसदृश्य स्थितीशी लढण्यास मदत मिळते.
या खतास ‘पोटॅशिअम नायट्रेट’ असे म्हणतात.
6) 00:00:50

या खतास पोटॅशिअम सल्फेट किंवा ‘ सल्फेट ऑफ पोटॅश’ असेही म्हणतात.
फळाचा आकार, रंग, वजन वाढवून गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी हे खत मदत करते.
या खतामध्ये गंधक सल्फेट स्वरूपात उपलब्ध असल्याने भुरीसारख्या रोगाचे नियंत्रण चांगल्याप्रकारे होते.
7) पोटॅशियम शोनाईट
पोटॅशियम शोनाईटमध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये असतात.
कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर गरज लागते, कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.
पोटॅशियम शोनाईट सर्व पिकांना वापरता येते परंतु, स्फुरद युक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फेट सारख्या खतामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरू नये.
8) 24:24:00:08

या खतामधील नत्र हे अमोनिकल व नायट्रेट स्वरूपात पिकांना उपलब्ध होते.
शाकीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत याचा वापर करावा.
24:24:00:08 हे खत ड्रीपमधून अशा प्रकारे सोडा.
9) कॅल्शिअम नायट्रेट

या खताच्या वापरामुळे पिकाच्या मुळ्या जोमदार वाढून पीक काटक बनते.
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात, मुळांच्या वाढीसाठी या खताची आळवणी केल्यास चांगले परिणाम मिळतात.
तसेच शेंगा किंवा फळ वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जातो.
10) नॅनो युरिया

2 ते 4 मिली नॅनो युरिया (4% N) एक लिटर पाण्यात मिसळा आणि पिकाच्या सक्रिय वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर फवारणी केल्यास नायट्रोजन ची गरज प्रभावीपणे पूर्ण होते. सर्व प्रकारच्या पिकासाठी वापरता येते.
इतररसायनाबरोबर मिसळताना फवारणीपूर्वी सुसंगतता तपासून मिश्रण तयार करावे.
पहिली फवारणी: फांद्या किंवा फुटवे निघण्याच्या टप्प्यावर (उगवणीनंतर 30-35 दिवसांनी किंवा लावणीनंतर 20-25 दिवसांनी).
दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीनंतर २०-२५ दिवसांनी किंवा पिकावर फुले येण्यापूर्वी.
11)नॅनो डीएपी

नॅनो डीएपीच्या वापरामुळे पिकाची वाढ जोमाने होते. उत्पन्नाचा दर्जा तसेच उत्पादन वाढते.
जमिनीचा पोत सुधारतो. जमीन रसायनमुक्त होते.
थेट जमिनीत रसायनिक खत न केल्यामुळे जमिनीची धूप तसेच दर्जा घालवणार नाही.
नॅनो डीएपी लिक्विड स्वरूपात असल्यामुळे जमिनीमध्ये न टाकता याची फवारणी करता येते.
नॅनो डीएपी ची वाहतूक आणि साठवणूक करणे सोपे आहे.
Water Soluble Fertilizers-विद्राव्य खते वापरण्याचे फायदे
* पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य प्रमाणात देता येते.
* तसेच पिके पानाद्वारे अन्नद्रव्य शोषून घेतात. त्यामुळे फवारणीद्वारे पिकांना जलद गतीने अन्नद्रव्य मिळतात.
*अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागताच त्वरित ती कमतरता पानांद्वारे पोषक अन्नद्रव्य देऊन भरून काढता येते.
*पिक फुल किंवा फलधारणा अवस्थेत असल्यावर विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर असतो.
*खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
*पिकाची वाढ जोमाने झाल्याने रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.
*जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे खतांची पूर्तता करता येते.
*पाऊस जरी कमी जास्त झाला तरी पिकांना आधार देण्याचे कार्य ही खते करणार आहेत.
*पाणी व मजुरावरील खर्च यांची बचत होते. खताची नासाडी होत नाही.
विद्राव्य खते वापरताना घ्यावयाची काळजी
- Water Soluble Fertilizers /खते विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.
- विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामासाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादनाचा वापर करावा.
- एक किलो विद्राव्य खत जसे की 19:19:19, 12:61:00 आणि 00:52:34 इत्यादी विरघळण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 लिटर पाणी वापरावे.
- योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये खते टाकावीत, खतामध्ये पाणी टाकू नये.
- विद्राव्य खते एकमेकांत मिसळताना, ती एकमेकांना पूरक आहे का याची माहिती असणे आवश्यक आहे.
- खते देताना पिकाची अवस्था, वाफसा, वातावरण याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
- चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरानंतर, शिल्लक राहिल्यास पॉकेट सीलबंद करून ठेवावे.
- ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यानंतर पुढे 10 मिनिटे साधे पाणी जाऊ द्यावे त्यामुळे लॅटरल मधील खते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवता येतात.
- ठिबकमधून खते द्यायची संपल्यानंतर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.
- ठिबक सिंचन संचात कोठेही लिकेज असता कामा नये. अन्यथा खते वाया जातात.
FAQ’s / वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1. विद्राव्य खते किती किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असतात?
उत्तर – घन(solid) विद्राव्य खते 1 किलो व 25 किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
2. विद्राव्य खतांमध्ये कोणती अन्नद्रव्य असतात?
उत्तर – विद्राव्य खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य(NPK) बरोबर दुय्यम अन्नद्रव्ये (मॅग्नेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात.
3. विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी कसा केला जाऊ शकतो?
उत्तर – पाण्यासोबत फवारणीद्वारे आणि ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी केला जातो.
4. कोणती Water Soluble Fertilizers विद्राव्य खते एकमेकात मिसळू नये?
* कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम अधिक बोरॉन मिश्र खत ची ड्रीप खते 13:00:45 व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळू नये.
* फॉस्फरिक ऍसिड बरोबर कोणती फवारणी अथवा ड्रिप खत मिसळू नये.
* कोणत्याही खताबरोबर कॅल्शियम, कॉपर युक्त खते तसेच सल्फर मिसळू नये.
* कॅल्शिअम नायट्रेट आणि 0:52:34 किंवा 12:61:00 या प्रकारची स्फुरद युक्त खते एकत्र टाकीत मिसळल्यास कॅल्शियम व फॉस्फेटची रासायनिक प्रक्रिया होऊन कॅल्शिअम फॉस्फेट तयार होतो. जो पाण्यात अविद्राव्य असल्याने फिल्टरमध्ये अडकतो. त्यामुळे खतावरील खर्च वाया जातो.
5. विद्राव्य खते पिकाला कधी लागू होतात व कधी संपतात?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेयर करा.
2 thoughts on “Water Soluble Fertilizers-विद्राव्य खतांची ओळख व त्यांचा कार्यक्षम वापर”