सुधारित वाण आणि शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञान यांचा वापर केल्यामुळे Vangi-वांगी या पिकाचे भरघोस उत्पादन मिळते म्हणून, शेतकरी वर्षभर म्हणजेच खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही लागवड करतात. तसेच शेतकरी आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करू शकतो. बाजारामध्ये वांग्याला नेहमीच मागणी असते कारण आपल्या आहारात वांग्याची भाजी, भरीत, वांग्याची भजी असे विविध पदार्थ असतात. पांढरे वांगे तर मधुमेह असलेल्या रोगांना गुणकारी असते. वांग्यामध्ये खनिजे, लोह, प्रथीने याबरोबरच अ, ब, क ही जीवनसत्वे ही पुरेशा प्रमाणात असतात.
भाजीपाला लागवड सध्या मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. त्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला तसेच वांगी, मिरची, टोमॅटो या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. भाजीपाला पिकाबद्दल आपल्याला अपेक्षित असे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर तंत्रशुद्ध रीतीने शेती करणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून आपण वांगी या पिकाचे व्यवस्थापन बघूया.
जमिनीची निवड व मशागत:
तसे पाहिले तर सर्वच प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पीक घेता येते. परंतु सुपीक, पाण्याचा निचरा होणारी, काळी जमीन किंवा नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे झाड जोमाने वाढते परिणामी उत्पादन चांगले येते.
रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून, कुळवून जमीन भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीत एकरी 12 ते 15 गाड्या शेणखत पसरून जमिनीत मिसळून घ्यावे.
हवामान:
कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. सरासरी 12 ते 200 सेल्सियस तापमानात वांग्याचे पीक चांगले येते. ढगाळ हवामान किंवा एकसारखा पाऊस वांगी या पिकाला मानवत नाही.
रोप लागण/लागवड:
रोपांची लागवड करण्यासाठी सरी वरंबे पाडून, वरंब्याच्या बगलेत एका जागी रोप लावावे. कोरडवाहू क्षेत्रावर हे पीक घ्यायचे असल्यास रोपांची लागण सपाट जमिनीवर करावी. रोपलागण ही मुख्यत: ढगाळ वातावरण किंवा रिमझिम पाऊस सुरू असताना केल्यास फायदेशीर ठरते. मात्र उन्हाळ्यात रोपांची लागवड ही शक्यतो सकाळी न करता दुपारी 4.00 नंतर करावी. रोपांची लागण करत असताना 2रोपातील अंतर हे जमिनीच्या प्रकारानुसार ठेवावे. साधारणपणे, भारी जमीन असेल तर 120 x 90 सेंटीमीटर, हलकी जमीन असेल तर 75 x 75 सेंटीमीटर व जमीन जर मध्यम असेल तर 90 x 75 सेंटीमीटर हे अंतर पुरेसे ठरते. रोपांची लागण केल्यानंतर शेतीला लगेच पाणी द्यावे.
Vangi- वांगी लागवडीचा हंगाम:
खरीप हंगाम:
बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै ते ऑगस्टमध्ये केली जाते.
रब्बी किंवा हिवाळी हंगाम:
बियांची पेरणी सप्टेंबर अखेर आणि रोपांची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करावी.
उन्हाळी हंगाम:
बियांची पेरणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करून रोप लागण ही फेब्रुवारीत करता येईल.
यासाठी एकरी 150 ते 200 ग्रॅम बियाणे पुरेसे आहे.
वांग्याचे विविध वाण:
स्थानिक हवामान आणि रोपांची रोगप्रतिकारशक्ती या गोष्टींचा विचार करून आपण वाणाची निवड करावी. यासाठी आपण आपल्या भागातील रोपवाटिका, कृषी अधिकारी किंवा या क्षेत्रातील अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला जरूर विचारात घ्यावा.
संकरित वांग्यामध्ये रोगप्रतिरोधक शक्ती आणि भरघोस उत्पन्न यांचा विचार करून संशोधकांनी काही वाण विकसित केले आहेत.
मांजरी गोटा:
या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे बुटकी आणि पसरट असतात खोड, पाने, फळे यांच्या देठावर काटे असतात. वांगी मध्यम ते गोलाकार जांभळट, गुलाबी रंगाची असतात. हे वांगे चवीला रुचकर असते. एकरी सरासरी 60 ते 70 क्विंटल उत्पादन मिळते.
वैशाली:
या जातीची झाडे बुटकी पसरट आणि काटेरी असतात. झाडाला झुबक्यानी फुले आणि फळे येतात. वांग्याचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात. सरासरी एकरी 60 ते 70 क्विंटल उत्पादन मिळते.
प्रगती:
या जातीची झाडे उंच असून, पाने गडद हिरव्या रंगाची असतात. फांद्या, पाने, फळे यावर काटे असतात. या जातीमध्ये फुले आणि फळे (Vangi- वांगी) झुबक्यानी येतात. फळे आकर्षक जांभळ्या रंगाची असून त्यावर पांढरे पट्टे असतात. पाच ते सहा महिन्यात 12 ते 15 तोडे मिळतात. सरासरी उत्पादनाचा विचार करता एकरी 65 ते 80 क्विंटल उत्पादन मिळते.
अरुणा:
या जातीमध्ये मध्यम उंचीची झाडे असतात. फुले आणि फळे भरपूर लागतात वांग्याचा आकार अंडाकृती असून रंग चमकदार जांभळा असतो. सरासरी एकरी 70 ते 75 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
स्वर्णश्री:
या जातीची झाडे 60 ते70 सेंटीमीटर उंच असून पाने रुंद असतात. या जातीची वांगी अंडाकृती आणि पांढऱ्या रंगाची असतात. एकरी सरासरी 70 ते 80 क्विंटल उत्पादन मिळते.
गोल्डन स्वालो:
या प्रजातीमध्ये गोल आणि हिरव्या रंगाची वांगी असतात. वांग्याच्या वरच्या बाजूला पांढरे पट्टे असतात . प्रति एकरी सुमारे 60 ते 80 क्विंटल वांगी मिळू शकतात.
पिकाला पाणी देणे:
जमिनीचा प्रकार आणि लागवडीचा हंगाम यानुसार पाण्याचे नियोजन करावे. खरीपमध्ये पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता जेमतेम असल्यास ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या माध्यमातून ओलिताचे नियोजन करावे. वांग्याच्या रोपांसाठी, विशेषत: फुलांच्या आणि फळांच्या अवस्थेत सातत्यपूर्ण आणि पुरेसे पाणी देणे महत्वाचे आहे. माती सतत ओलसर राहील परंतु पाणी साचणार नाही याची खात्री करा. जास्त पाणी देणे टाळा, कारण यामुळे रूट कुजणे आणि इतर रोग होऊ शकतात.
खत व्यवस्थापन:
वांग्याच्या बागायत पिकासाठी एकरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश रोप लागणनीच्या वेळी द्यावे. ही खते, रोपाच्या बुंध्या भोवती 10 ते 12 सेंटीमीटर अंतरावर आठ ते दहा सेंटीमीटर खोलीवर गोलाकार पद्धतीने द्यावीत. सुक्ष्म अन्नद्रव्य 2 ग्राम प्रती लीटर पाणी याप्रमाणे 21 दिवसाचे अंतराने फवारणी करावी.
अंतरमशागत:
खुरपणी करणे, कोळपणी करणे, पिकाला मातीची भर लावणे ही अंतर मशागतीची कामे वेळच्या वेळी व नियमित करावीत. गरजेनुसार भांगलनी किंवा खुरपणी करून आपले शेत तनमुक्त ठेवावे. वांग्याच्या झाडांना त्यांच्या वाढीच्या काळात वेळोवेळी निरीक्षण करून योग्य ती काळजी घ्यावी.
Vangi- वांगी किड आणि रोग नियंत्रण:
विविध प्रकारचे कीटक आणि रोग यापासून आपल्या पिकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला उत्पादनावर परिणाम करणाऱ्या रोगांची व किडींची ओळख असणे आवश्यक आहे. कीड व रोगापासून आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी, एकरी 20 ते 25 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. खताचे नियोजन करत असताना, गरजेनुसार नत्राची मात्रा द्यावी अतिरिक्त युरिया देऊ नये. निंबोळी अर्क नीम तेल यासारख्या जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
प्रादुर्भाव वाढल्यास खाली दिल्याप्रमाणे औषधांचा फवारणीत समावेश करावा.
मर:
पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति/किलो थायरम चोळावे. रोगास बळी न पडणा-या जातींची लागवड करावी. झाडावर बाविस्टीन अथवा डायथेन एम-45 बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
बोकडया किंवा पूर्णगुच्छ:
या रोगाचा प्रसार तुडतुडयांमुळे होतो. त्याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरीदाणेदार औषध प्रती वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे. रोपे लावण्यापूर्वी मोनोक्रोटोफॉस 36 डब्यु.एस.सी.20-25 मिली प्रती पंप याची फवारणी करावी.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी :
चिकट पांढ-या रंगाच्या या आळया शेंडयातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात. या किडीमुळे वांगी पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. त्याच्या नियंत्रणासाठी नोवालुरॉन 5.25% + इमामेक्टीन बेन्झोएट 0.9% sc किंवा कलोरांट्रीनिलीप्रोल 18.5%sc या दोन्हीपैकी एकाची फवारणी करावी.
तुडतुडे:
ही हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात. तसेच या किडीमार्फत बोकडया या विषाणू रोगाचा प्रसार होतो. त्याच्या नियंत्रणासाठी मेलॉथिऑन 50 टक्के प्रवाही किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80% SL, 100 मिली प्रति एकर किंवा फिप्रोनिल 5% sc, 400 मिली प्रति एकर फवारणी करावी.
मावा :
ही अतिशय लहान आकाराची किड पानांच्या पेशीमध्ये सोंड खुपसून पानातील रस शोषून घेते. त्याच्या नियंत्रणासाठी मेलॅर्थिऑन 50 टक्के प्रवाही किंवा एसिटामिप्रिड 20% WP, 100 ग्राम प्रति एकर फवारणी करावी.
लाल कोळी :
लाल कोळी नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
वांग्याची तोडणी व उत्पादन:
रोप लागणी नंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे येतात. फळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर, ती टवटवीत आणि चकचकीत असतानाच तोडणी करावी. झाडावरील फळे तोडण्यासाठी धारदार चाकू किंवा छाटणीचा वापर करा. फार कोवळी तोडल्यास उत्पादन घटते किंवा जून झालेल्या वांग्यांना बाजारात दर मिळत नाही.
वांगी पिकाचा वाण किंवा जातीनुसार एकरी सरासरी 60 ते 80 क्विंटल उत्पादन मिळते.
आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कमेंट करा, लेख आवडल्यास शेअर करा…
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे आपण…