Usache Pachat ऊसाचे पाचट (पाला) काढण्याचे फायदे

साचे पाचट Usache Pachat काढणे म्हणजे? काय तर साच्या बुडातील वाळलेला पाला काढून घेणे. त्याचे काय फायदे होतात, ते आपण या लेखात पाहूया. ऊस पीक हे दीर्घकाळ म्हणजे बारा ते अठरा महिने शेतात उभे राहत असल्यामुळे पिकाच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी आपण रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते.

रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकाला रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही आता काळाची गरज बनली आहे. शेतीमध्ये होत असलेले संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे सध्या बागायती क्षेत्र वाढले आहे. अशातच दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होतीलच असे नाही. तसेच हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाढण्यासाठी क्षेत्राची उपलब्धता व पुरेसा वेळ हवा असतो. त्यामुळे बरेचदा वेळेची व बियाण्याच्या कमतरतेअभावी हिरवळीचे पिकही घेता येत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे पुरेसे पशुधन नसल्याने सेंद्रिय खताची गरज भागवली जात नाही. त्यामुळे जमिनीची प्रत खालावून एकूण उत्पादनात घट येत चाललेली आहे. यासाठी पाचटापासून मिळणारे सेंद्रिय खत खूपच फायदेशीर ठरते.

Usache Pachat
Usache Pachat

Usache Pachat ऊसाचे पाचट(पाला) कधी काढावे?

  • सर्वसाधारणपणे ज्यावेळी आपल्या ऊसाच्या बुडातील चार ते पाच पानाची टोपने सुकून जातात त्याचवेळी Usache Pachat ऊसाचे पाचट काढावे.
  • Usache Pachat ऊसाचे पाचट काढत असताना फक्त वाळलेली पानेच काढावीत. हिरवी पाने अजिबात काढू नयेत.
  • ऊसाचे पाचट एकदा काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणे अजिबात सोलू नयेत.

कारण एका निरोगी वाढणाऱ्या ऊसाला नऊ ते बारा पर्यंत पाने असतात हिरवी पाने काढून घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होऊन ऊसामध्ये अन्न कमी तयार केले जाते. यामुळे पिकाची वाढ कमी होते व याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.

ऊसाचे पाचट काढण्याचे फायदे

1. ऊसाच्या बुडातील पाला निघाल्यामुळे हवा खेळती राहते त्यामुळे जाडी वाढण्यास मदत होते.

2. उसाचे पाचट Usache Pachat काढत असताना, आपण लहान मरके कोंब काढून टाकतो व जाड कोंब ठेवतो. यामुळे संख्या नियंत्रण होते.

3. योग्य वेळी/वयातच आपण बुडातील वाळलेला कोवळा पाला काढतो. त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यामुळे तो लगेच कुजून जातो आणि त्यातील सेंद्रिय घटक पिकाला उपलब्ध होतात.

4. अच्छादन केलेल्या या पाल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते, उन्हाळ्यात पाण्याची बचत होते व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

5. ऊसाच्या बुडातील सर्व घाण काढून टाकल्यामुळे, नवीन वॉटर शूट येतात आणि त्यापासून निघणारा ऊस हा जोमदार व वजनदार बनतो.

6. पाचट काढल्यामुळे कांडी कीड, मिलीबग तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी  होतो.

7. सेंद्रिय पदार्थ कुजत असताना त्यातून कर्बप्रणित वायू बाहेर पडत असतो. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतीला हा वायू खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे पानांमध्ये पिष्टमय पदार्थ तयार होण्याचा वेग वाढतो, परिणामी पिकाची वाढ जोमदार होते.

Usache Pachat
Usache Pachat

पाचटापासून/पाल्यापासून कंपोस्ट तयार करण्याची पद्धत

यासाठी सुरुवातीला जमिनीवर खड्डे काढले जातात. कारण ढिग पद्धतीपेक्षा खड्ड्यात पाचट लवकर कुजते. तसेच कंपोस्ट खताची प्रतही चांगली राहते. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे एक टन पाचटाचे कंपोस्ट करण्यासाठी प्रत्येक खड्डयाची रुंदी 2 मीटर खोली 1 मीटर व लांबी 5 मीटर ठेवावी. खाद्याची लांबी गरजेनुसार ठेवायला हरकत नाही. परंतु रुंदी व खोली ही मापे कटाक्षाने पाळावीत. कारण जर खड्डा उथळ असेल तर पाचट वाळते, कुजत नाही. तसेच खड्डा जर जास्त खोल व रुंद झाल्यास हवेच्या कमतरतेमुळे पाचट कुजण्याची क्रिया चांगली होत नाही. जिवाणूंची वाढ होत नाही.

हे खड्डे भरताना प्रथम तळाशी 15 ते 30 सेंटिमीटर जाडीचा पाचटाचा थर द्यावा. या थरावर युरिया व सुपर फॉस्फेट चे द्रावण(100 लिटर पाण्यामध्ये 8 किलो युरिया आणि 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाण्यात चांगले विरघळवून घ्यावे.) टाकून नंतर शेणकाला व जिवाणू यांचे मिश्रण सारख्या प्रमाणात पसरवून टाकावे. (शेणकाला तयार करण्यासाठी, एका ड्रममध्ये 100 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 100 किलो शेण व अर्धा किलो विघटन करणारे जिवाणू चांगले मिसळून घ्यावे.)

याप्रमाणे पाचटाचे थर लावून घ्यावेत. त्यामध्ये साधारण पाचटाच्या वजनाच्या 60% ओलावा राहील इतके ज्यादा पाणी टाकावे. अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीवरती 40 ते 60 सेंटिमीटर येईल इतका भरावा. हा संपूर्ण खड्डा शेणा-मातीने सर्व बाजूने लिंपून बंद करावा म्हणजे खड्ड्यातील पाणी हवेत उडून जाणार नाही.

अशा पद्धतीने तीन ते साडेचार महिन्यात पाचटापासून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.

खोडव्यामध्ये पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती

ऊस  तुटून गेल्यानंतर सर्वप्रथम शेतात  पडलेल्या  कांड्या गोळा करून घ्याव्यात. तोडणीनंतर बुडख्यावर असलेले पाचट सरीमध्ये दाबून घ्यावे. बुडखे उघडे करावेत  जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून, जमिनीखालील कोंब / डोळे फुटण्यास वाव मिळतो व नवीन कोंब जोमदार येतात.  तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास आणि ऊसाचे बुडखे जमिनीवर, राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. बुडख्याच्या छाटणीनंतर लगेचच, 15 ग्राम बाविस्टीन बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  त्यामुळे  मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

त्यानंतर सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी; 80 किलो युरिया + 100 किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट पसरून पाणी द्यावे.  पाणी देण्याच्या अगोदर  पाचट कुजवणारे जिवाणू 1 ते 2 लिटर प्रति एकरी पाचटावर फवारणी करावी.

ऊस तुटून गेल्यावर पहिल्या 15 दिवसात या क्रिया कराव्यात. त्यानंतर 3 ते 4 दिवसात वापसा आल्यावर पहारी सारख्या साधनांनी रासायनिक खतांची मात्रा सरीच्या एका बाजूला बुडक्यापासून 15 सेंमी. अंतरावर 15 सेंमी. खोल व 2 छिद्रातील अंतर 30 सेंमी. ठेवून खते मातीआड करावी. दुसरी खत मात्र सरीच्या विरुद्ध बाजूला त्याच पद्धतीने 130 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाटपाणी द्यावे.

अशाप्रकारे खोडव्यामध्ये पाचटाचे नियोजन केल्यास सुरुवातीच्या काळात सरीमध्ये आच्छादन म्हणून याचा चांगला उपयोग होतो. जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. साडेचार ते पाच महिन्यानंतर सर्व पाचट कुजून खोडव्यामध्ये उत्तम सेंद्रिय खत तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचे पाचट जाळून न टाकता या पद्धतीने नैसर्गिकरित्या सेंद्रिय खत तयार करून जमिनीची सुपीकता वाढवावी जेणेकरून  उत्पादनातही वाढ होईल.

हे ही वाचा…
ऊसाला तुरा येणे योग्य की अयोग्य?

माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.

Leave a Comment