भारतातील शास्त्रज्ञांनी उसाच्या बियांची निर्मिती करण्याचा क्रांतिकारक शोध लावला आहे. आता ज्वारी, गहू, भात, भुईमूग, सोयाबीन याप्रमाणे Sugarcane farming from seed उसाचे बियाणेही उपलब्ध होणार.
सर्वसाधारणपणे उसाची लागण डोळा पद्धतीने कांडी वापरून किंवा रोप लागण पद्धतीने केली जाते. आता यापुढे शेतकरी उसाच्या बियापासून रोपे तयार करून लागण करतील. इतकेच नव्हे तर उत्तम रोगप्रतिकारशक्ती, उत्पन्नात तिपटीने वाढ आणि पिकाचे आयुर्मानही कमी ठेवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

पारंपरिक ऊस शेतीमध्ये अमुलाग्र बदल
सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्राद्योगिक विश्वविद्यालयाच्या (मेरठ) जैव प्रादयोगीकी विभागाचे अध्यक्ष प्रा. आर.एस.सेंगर व डॉ. मनोज शर्मा यांनी आपल्या संशोधनातून जगात सर्वप्रथम उसाचे सिंथेटिक बीज(बियाणे) तयार करण्यात यश मिळवले आहे. इतकेच नाही तर या बियाण्याची तीन वेळा ‘फिल्ड ट्रायल’ ही घेतली आहे.
उसाच्या बियापासून रोपे तयार करण्याच्या त्यांच्या या पद्धतीमुळे उसाच्या पारंपरिक लागणीत आणि ऊस शेतीत अमुलाग्र बदल होणार असल्याचा दावा केला आहे. या बिजोत्पादनाचे शास्त्रज्ञाकडून पेटंट घेण्याची तयारी सुरू आहे. प्राध्यापक सेंगर यांनी संशोधित बीज टेक्निक वापरून उसाच्या बियांना गोळीच्या स्वरूपात तयार करण्यात यश आले आहे. याची उगवण आणि फुटवा ऊस कापून केलेल्या रोपापेक्षा दुप्पट क्षमतेने होते. या पद्धतीने रोगमुक्त रोपांची लागण केल्यामुळे उसाच्या उत्पादनात तिप्पट वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पारंपारिक लागणीत 35 % रोपे कीड, मर व रोग यामुळे नष्ट होतात. नर्सरीत तयार केलेल्या या रोपांची थेट शेतात लागण केली आहे. यामुळे रोगमुक्त असे पीक मिळते.
उत्पादन खर्च आणि श्रम यामध्ये बचत Sugarcane farming from seed
शास्त्रज्ञ डॉ. मनोज शर्मा म्हणाले बियापासून अगोदर नर्सरी तयार केली जातात. दीड ते दोन महिन्यांच्या आत ही रोपे लागणीस तयार होतात. त्यामुळे पिकाचा कालावधी 2 महिन्यांनी कमी होतो. पारंपारिक पद्धतीमध्ये 1 एकरासाठी किमान अर्धा टन ऊस लागतो, पण या पद्धतीत बियापासून तयार केलेली केवळ 6000 रोपे (एकरी) पुरेशी होतात. त्यामुळे खर्चात प्रचंड बचत होते.
यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टात आणि उत्पादन खर्चात निश्चितच बचत होणार आहे. भारतीय शास्त्रज्ञ या पद्धतीचे पेटंट मिळवण्याच्या तयारीला लागले आहेत. या शोधाला वैज्ञानिक क्षेत्रात दुसरी हरितक्रांती मानले जात आहे.