ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक प्रमुख पीक आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकावर आढळणाऱ्या Sugarcane disease control रोगांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, शुद्ध बेण्याची कमतरता या गोष्टीही याला कारणीभूत आहेत. ऊस पिकावर विविध प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अनेक रोगांचा प्रसार हा प्रामुख्याने दुषित बेण्यामार्फत तसेच कीटक, वारा, पाऊस, पाणी व जमिनीतून होतो.

पीक संरक्षणाविषयी शेतकऱ्यांना असणारी अपुरी माहिती, रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांची उदासीनता, रोग नियंत्रण उपायांचा कमी प्रमाणात अवलंब, हवामानातील बदल अशा विविध कारणामुळे रोगाच्या वाढीस व प्रसारास चालना मिळत आहे.
या रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार वाढू नये तसेच या रोगापासून ऊस पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. या लेखात आपण ऊसावरील प्रमुख रोग व किडी यांची माहिती घेणार आहोत. तसेच त्यांच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची Sugarcane disease control चर्चा करणार आहोत.
ऊसावरील प्रमुख रोग व उपाय :
तपकिरी ठिपके (ब्राऊन स्पॉट) :
पश्चिम महाराष्ट्रातील जास्त पावसाच्या भागामध्ये लॉन्जिपस नावाच्या बुरशीमुळे मान्सून हंगामात हा बुरशीजन्य रोग आढळतो. अनुकूल वातावरण असल्यास रोगाची तीव्रता वाढून सर्व पानांवर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानांवरील छोटे ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण होत नाही. त्यामुळे ऊसाच्या उत्पादनावर आणि साखर उतार्यावर अनिष्ट परिणाम होतो. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास ऊसाच्या कांड्याची लांबी व जाडी कमी होते.
गवताळ वाढ :
हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ऊसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून, त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसरतो.
गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे. ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा. रोगट ऊसाचा खोडवा ठेवू नये. मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे. Sugarcane disease control लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.

कांडी (गाभा) लाल होणे:
गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळयानंतर जेव्हा ऊसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते, तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त ऊसाच्या शेंड्यापासून तिसरे अथवा चवथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस उभा कापला असता, आतील गाभा लाल झालेला आढळून येतो. त्यात अधून-मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. अशा ऊसाला अल्कोहोलसारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.
लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.
चाबूक काणी :
चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. हा रोग ऊसाचे को -740 या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त ऊसाच्या शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी ऊसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तऱ्हेने रोग शेतात पसरतो.
काणी रोगामुळे ऊसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते.लागवडीच्या ऊसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

नयनाकृती ठिपके :
हिवाळ्यात हेलमिन्थोस्पोरियम सॅकरी नावाच्या बुरशीमुळे हा रोग ऊसाच्या पानांवर दिसून येतो. रोगाची लागण पोंग्यातील 2 ते 3 कोवळ्या पानांवर लहान, पाणथळ ठिपक्याच्या स्वरूपात दिसून येते. असे गर्द ठिपके व लांबट रेषा एकमेकांत मीसळून पाने करपलेली दिसतात.

Sugarcane disease control तांबेरा :
ऊसाच्या पानावर दिसून येणारा हा बुरशीजन्य रोग आहे. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूंना होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरून पाने करपलेली दिसतात. प्रकाशसंश्लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने ऊसाचे उत्पादन घटते.

पोक्का बोईंग :
ऊसाच्या मुख्य वाढीच्या काळात म्हणजेच 3 ते 4 महिन्यांच्या ऊसामध्ये मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व मान्सूनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ऊसाच्या पानावर पावसाच्या अथवा दवाच्या स्वरूपातील पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्त्वाचे व अनुकूल घटक आहे. पानावर
ओलसरपणा असताना बिजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी पानांच्या आंत प्रवेश करून रोग निर्मिती करते. या रोगाचा प्रसार दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो.

Sugarcane disease control रोगांचे नियंत्रण:
ऊसाचे निरीक्षण करून रोगाची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून खालीलप्राणे उपाययोजना करावी.
1) मान्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भावाबाबत ऊस पिकाचे सर्वेक्षण अथवा पाहणी करून प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. ऊस तुटून गेलेल्या जमिनीत पुनर्लागवड करायची असल्यास तुटून गेलेल्या ऊसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करावा.
2) निरोगी बियाणे मळ्यातील रोगमुक्त बियाणे लागवडीसाठी वापरावे. रोगप्रतिकारक जाती निवडून त्यांची लागवड करावी. योग्य निचरा होणार्या जमिनीत ऊस लागवड करावी. लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा.
3) नत्राची मात्रा वाढून शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यांपैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात घेऊन 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
4) ऊसावर पोक्का बोईंग व शेंडाकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी 1 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा 2 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोरायीड किंवा 3 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाण्याध्ये मीसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.( प्रतिकारक्षम वाण –को 86032 ).
5) ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास 0.3 टक्के (3 ग्रॅम/ लि.पाणी) मॅन्कोझेब अथवा 0.1 टक्के टेबुकोन्याझोल (1 ग्रॅम/ लि.पाणी) 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे.
ऊसावरील प्रमुख किडी :
खोडकीडा :
खोडकिडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत आढळून येतो. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी राखाडी अथवा चंदेरी धाग्याला लटकत ऊसाच्या खोडाजवळ येते. ही अळी खोडावरील मऊ पोंगा खाऊन उपजीविका करते व नंतर खोडाच्या आत शिरून उगवणार्या कोंबाला 7 ते 8 दिवसांत खाऊन टाकते. अळीने खाल्लेला पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याला उग्र वास येतो. किडीमुळे ऊस उशिरा तयार होतो, त्यामुळे उत्पादनात घट येते.

कांडीकीड :
या किडीचा प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून ऊस तोडणीपर्यंत आढळतो. भरपूर तापमान, कमी आर्द्रता व कमी पाऊस यामुळे कांडीकिडीचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. या किडीमुळे ऊसाची वाढ कमी होते. कांड्या लहान राहून ऊसाला पांगश्या फूटतात. पाचट काढल्यास त्यात विष्ठा व भुसा आढळून येतो.
लोकरी मावा :
या किडीची पिले व प्रौढ पानाखाली स्थिर राहून अणकुचीदार सोंडेच्या सहाय्याने पानातील अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा सुकतात. हा मावा पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतो. त्यामुळे त्याखालील पानावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडियम या बुरशीची वाढ झाल्यामुळे हे पान काळे पडते. त्यामुळे पानाची कर्बग्रहणाची प्रक्रिया मंदावते.

पिठ्या ढेकूण :
कांडीवर पाचटाखाली लांबट गोल आकाराची, लालसर गुलाबी रंगाची अंगावर मेणचट आवरणाची पिले दिसतात. पिठ्या ढेकणाचा जास्त प्रादुर्भाव वाढल्यास ऊसाचे डोळे खराब होतात. ही कीड जमिनीखालील मुळांवर व फुटव्यांवर हल्ला करून नुकसान करते.

हुमणी :
हुमणीचा प्रादुर्भाव नदीकाठच्या जमिनी, हलक्या मुरमाड जमिनी तसेच सखल भागाध्ये सर्वत्र आढळून येतो. या किडीमुळे पानाची शीर व पाने पिवळी होतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. ऊस उपटला असता हुमणीच्या ‘सी’ आकाराच्या पिवळसर रंगाच्या अळ्या दिसून येतात. दुर्लक्षित ऊस पिकाध्ये 80 ते 100 टक्के नुकसान होते.
पांढरी माशी :
या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडल्यास व पावसाळ्यात पाऊस लांबल्यास जास्त होतो. या किडीची पिलू अवस्था पानाच्या खालच्या बाजूस गोल, नाजूक, पांढरट पिले व कोष स्वरूपात असून, पानातील रस शोषून घेतात.
पायरीला /ऊसावरील पाकोळी :
या कीडीची मादी पानाखाली किंवा बेचक्यात 40-50 अंडी पुंजक्यात घालते. या कीडीची पिल्ले व प्रौढ ऊसाच्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानाचा हिरवेपणा कमी होवून ती पिवळी पडतात. ही कीड शरीरातून एक प्रकारचा चिकटगोड पदार्थ बाहेर सोडतो. त्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होवून पानावर काजळी पडल्यासारखा रंग चढून, ऊसाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो. ऊसातील साखरेचे प्रमाण घटते. ऊसाच्या प्रतिवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
खवले कीड :
ही कीड ऊसाच्या पानातील व ऊसातील रस शोषून घेते त्यामुळे ऊस निस्तेज होतो आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते.
किडीच्या नियंत्रणाचे उपाय :
1) शक्यतो हलक्या जमिनीत ऊसाची लागवड करू नये. ऊसाची लागण 10 फेब्रुवारीपूर्वीच पट्टा पद्धतीने शिफारस केलेल्या हंगामातच करावी. शिफारशीत कीड प्रतिकारक जातींची (उदा. फूले 0265) लागवड करावी.
2) हुमणीच्या अळ्या आणि कोष नैसर्गिक शत्रूंना बळी पडण्यासाठी दोन नांगरटी जास्त कराव्यात. शेणखतामधूनच हुमणीच्या अळ्या शेतात जातात. त्यामुळे खताच्या प्रत्येक गाडीत 1 किलो 10 टक्के कार्बारील भुकटी सिळावी.
3) ऊसाची लागण करताना जमिनीत मेटारायझीयम अॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना 25 किलो शेणखतातून किंवा शेणकाला करून जमिनीत प्रति हेक्टर मिसळल्यास हुमणी अळ्यांवर या बुरशी वाढून प्रादुर्भाव कमी होतो.
4) पहिला पाऊस पडल्याबरोबर बाभूळ, बोर व कडूनिंब इ. झाडांवर हुमणीचे भुंगेरे रात्री साडेसात ते साडेनऊ या काळात पाने खाण्यासाठी व मीलनासाठी एकत्र येतात. हे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. तसेच, झाडांच्या फांद्या सवळून( छाटून) घ्याव्यात.
5) बेणे मळ्यातील निरोगी आणि कीडविरहित बेण्याची निवड करावी. किडलेल्या बेण्याचा लागवडीसाठी उपयोग करू नये. पिठ्या ढेकूण व खवले कीड नियंत्रणासाठी लागणीपूर्वी बेणे 300 मिलि. मॅलथिऑन किंवा 265 मिलि. डायमिथोएट 100 लिटर पाण्यात सिळून त्यात बेणे 10 ते 15 मिनिटे बुडवावे व नंतर लागवड करावी.
6) ऊसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास, खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल व पतंग बाहेर पडणार नाहीत.
7) खोडकीडा व कांडीकीड यांच्या नियंत्रणासाठी ऊस लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी 50,000 ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीडी प्रति हेक्टर या प्रमाणात साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 4 ते 6 वेळा सोडाव्यात. खोडकीड व कांडीकीड यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे शेतात लावावेत.
8) पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. पिठ्या ढेकूण कीड नियंत्रणासाठी कीडग्रस्त ऊसाचे, खालील वाळलेले पाचट काढावे. अशावेळेस वरील 8-9 हिरवी पाने ठेवावीत. डायमीथोएट 30 टक्के प्रवाही 30 मिलि. अथवा डायक्लोरोव्हॉस 76 टक्के प्रवाही 15 मिलि. प्रति 15 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
9) पांढरी माशी नियंत्रणासाठी व्हर्टिसिलिअम लिकोनी (फूले बगीसाईड) 1 किलो अधिक 1 लिटर दूध प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. फवारणी अगोदर औषध रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.रासायनिक नियंत्रणासाठी ऑक्सिडिमेटोन मिथायील 3.2 मिलि किंवा डायमिथोएट 2.6 मिलि किंवा 2 मिलि मॅलथिऑन किंवा डायक्लोरोव्हास 1 मिलि प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
10) हुमणीग्रस्त क्षेत्रात क्लोरोपायरीफोसची 1 लिटर 300-400 लिटर पाण्यातून आळवणी करावी.
11) पाकोळी (पायरीला) चे नियंत्रणसाठी मॅलथिऑन 850 मिलि किंवा डायमिथोएट 1000 मिलि किंवा क्विनालफोस 1200 मिलि प्रती 1000 लीटर पाण्यातून फवारावे.
12) खवले कीडीचे नियंत्रणासाठी मॅलथिऑन 2000 मिलि किंवा डायमिथोएट 2650 मिलि प्रती 1000 लीटर पाण्यातून फवारावे.
13) पांढरा लोकरी मावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरूवातीस किडग्रस्त पाने तोडून जाळून टाकावीत. डीफा अफीडोव्होरा या परभक्षी मित्र किटकाच्या हेक्टरी 1000 अळी/कोष प्रादुर्भावग्रस्त शेतात सोडावेत, किंवा क्रायसोपा या परभक्षी मित्र किटकाचे 2500 अंडी/अळ्या प्रती हेक्टरी सोडाव्यात. जैविक मित्रकिडी सोडल्यावर 3 ते 4 आठवडे कीटकनाशक फवारू नये.
रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी, कीडीचा प्रादुर्भाव आढळल्यास ऑक्सिडिमेटोन मिथायील 25% प्रवाही 600 मिलि 400 लीटर पाण्यात (लहान ऊस), 1050 मिलि 700 लीटर पाण्यात (मध्यम ऊस ), 1500 मिलि 1000 लीटर पाण्यात (मोठा ऊस) मिसळून फवारावे. पहिल्या फवारणी नंतर एक महिन्याने किंवा जास्तीचा प्रादुर्भाव आल्यास डायमिथोएट 30% प्रवाही 600 मिलि 400 लीटर पाण्यात (लहान ऊस), 1050 मिलि 700 लीटर पाण्यात (मध्यम ऊस), 1500 मिलि 1000 लीटर पाण्यात (मोठा ऊस) मिसळून फवारावे किंवा मॅलथिऑन 50% प्रवाही 800 मिलि 400 लीटर पाण्यात (लहान ऊस), 1400 मिलि 700 लीटर पाण्यात (मध्यम ऊस ), 2000 मिलि 1000 लीटर पाण्यात (मोठा ऊस) मिसळून फवारावे. फवारणीनंतर 10 ते 15 दिवस ऊस किंवा ऊसाचे वाढे जणावरांना खाऊ घालू नये.
6 महीन्यानंतरच्या ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आल्यास फोरेट 10 जी दानेदार 15 किलो प्रती हेक्टरी माती किंवा चांगले कुजलेले शेणखत (1:3) याबरोबर मिसळून शेतात पसरावे. 6 ते 9 महिन्यापर्यंतच्या ऊसाला जमिनीमध्ये वाफसा आल्यास हेक्टरी 20 किलो फोरेट 10 जी दानेदार प्रती हेक्टरी माती किंवा चांगले कुजलेले शेणखत (1:3) याबरोबर मिसळून शेतात पसरावे. फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडण्यापूर्वी 3 महीने वापरू नये.
Sugarcane disease control प्रतिबंधात्मक उपाय
- रोग प्रतिकारक जातींची लागवड करा.
- योग्य पीक चक्राचा अवलंब करा.
- भात आणि हिरवळीचे खत असणाऱ्या पिक चक्राचा अवलंब करा.
- उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करा.
- प्रभावित झाडे उपटून नष्ट करा.
- ऊसाची लावणी करताना ऊसाच्या कापलेल्या टोकांवर किंवा गाठींवर लालसरपणा दिसल्यास अशा ऊसाचे रोपण करू नये.
- शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करावी.
- प्रति एकर ट्रायकोडर्मा 10 किलो मात्रा 30 किलो शेणात मिसळून वापरावे.
- प्रति एकर 1 किलो स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स 50 किलो शेणात मिसळून वापरावे.
- खोडवा पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने, योग्य व्यवस्थापन करावे.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पोस्टला तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक लोकांना या माहितीचा लाभ घेता येईल आणि ऊसातील किडी व रोगावर नियंत्रण मिळवून, पिकातून अधिक उत्पादन घेता येईल.