Nano Urea liquid- नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी वरदान!

सध्या शेतकरी पिकांच्या  वाढीसाठी आणि अधिक  उत्पादन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा  वापर करत आहे.  मात्र या रासायनिक खतांमुळे  जमिनीची सुपीकता कमी होत आहे.  गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये अनेक बदल होत चालले  आहेत.  नवनवीन  क्रांतिकारी संशोधन  होत आहे.  या संशोधनातूनच  शाश्वत शेतीला प्रोत्साहन  आणि  हरित तंत्रज्ञानाला चालना  देण्यासाठी,  पारंपारिक  युरियाला  पर्याय  म्हणून  वनस्पतींना नायट्रोजन  पुरवणारे  हे पोषक (द्रव) शास्त्रज्ञांनी  विकसित  केलेले  आहे. या संशोधनाची  सर्वात  महत्वाची  दुसरी बाजू म्हणजे Nano Urea liquid नॅनो युरियामुळे  पर्यावरणाला  कोणतीही  हानी  होत  नाही.  तसेच शेतकऱ्यांचे  काम  हलके झाले  आहे.

Nano Urea liquid
Nano Urea liquid Image Credit: IFFCO

 Nano Urea liquid नॅनो युरिया म्हणजे काय?

‘नॅनो युरिया हे प्रामुख्याने नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेले एक खत आहे, जे वनस्पतीची नायट्रोजन ची गरज पूर्ण करते.’  भारत सरकारने याला प्रोत्साहित देखील केले आहे. शेतकऱ्याला सर्वात जास्त खतांमध्ये, युरिया लागत असतो. पंरतु युरियाचा काही प्रमाणात तुटवडा भासत असल्याने यावर पर्याय म्हणून इफकोच्या गुजरातमधील कंपनीने लिक्विड युरियाचे (Nano Urea liquid) उत्पादन सुरू केले आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफको) गुजरातमधील कलोल येथे देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे. या युरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपरिक युरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्त्वे देतो. पिकाच्या उत्पादनासाठी फायदेशीर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे हे नॅनो युरियाचे संशोधन, देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट करू शकते.

      पिकांच्या वाढीसाठी युरिया (Primary fertilizer) खूप महत्त्वाचा घटक आहे. नॅनो युरियाची पानावर फवारणी केल्यानंतर तो सहजपणे पर्णरंध्रातून वनस्पती पेशीमध्ये प्रवेश करतो. पेशीमध्ये त्यांचे एकत्रीकरण केले जाते आणि पिकाच्या गरजेनुसार वनस्पतीमध्ये तो वितरीत केला जाते. मात्र पारंपरिक युरिया हा सॉलिड फॉर्म मधील रासायनिक घटक जमिनीवर टाकला जात होता, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत होता. आता मात्र द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया हा फक्त पिकाच्या पानावर फवारला जातो, यामुळे जमिनीची प्रत खालावणार नाही. म्हणून नॅनो युरियाचा वापर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तर फायद्याचा आहे शिवाय यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होणार नाही.

            पारंपरिक पद्धतीत  70 टक्के युरिया पिकांपर्यंत न  पोहोचता  हवेत  उडून  जातो किंवा अतिपाण्यामुळे जमिनीत  मुरून  बसतो.  ज्यामुळे  जमीन  अॅसिडिक  बनते.  जलस्रोत  प्रदूषित होतात.  जमिनीतील  युरियाच्या या वापराला  आळा  घालण्यासाठी  संशोधकांनी  द्रव रूपातील  नॅनो  युरिया विकसित केले  आहे.  तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे, फुले, औषधी आणि इतर सर्व पिकांवर नॅनो युरियाची  फवारणी केली जाऊ शकते.  नॅनो युरिया ड्रोनच्या  माध्यमातूनही  पिकांवर  फवारता  येणार आहे.  द्रवरूपातील अल्ट्रा स्मॉल पार्टिकल्स पानांच्या माध्यमातून जमिनीत शोषले जातात. युरिया वाया जात नाही, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते.

Nano Urea liquid
Nano Urea liquid

येथे विकसित केले: आत्मनिर्भर  भारत  आणि  आत्मनिर्भर  कृषीच्या  अनुषंगाने नॅनो  बायोटेक्नॉलॉजी  रिसर्च  सेंटर,  कलोल, गुजरात  येथे  नॅनो युरिया हे स्वदेशी खत विकसित केले गेले आहे.

Nano Urea liquid- नॅनो/लिक्विड युरियाचे फायदे:

  • पारंपारिक युरियाला पर्याय म्हणून वनस्पतींना नायट्रोजन पुरवणारे हे पोषक (द्रव) आहे.
  • लहान आकारमानामुळे ते पेशीच्या भिंतीतून किंवा पानांच्या रंध्र छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात त्यामुळे  नॅनो युरियाचे कण पिकांना सहज उपलब्ध होतात.
  • द्रव  रूपातील नॅनो  युरिया  हे  पिकांच्या  पोषणासाठी  प्रभावी  आणि  कार्यक्षम  आहे,  जे पोषण गुणवत्तेसह उत्पादन वाढवते.
  • पारंपारिक युरियातून  वनस्पतींना 30-40% नायट्रोजन मिळत होता, तर नॅनो युरिया मधून 80 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त नायट्रोजन मिळतो.
  • युरियावरील खर्च कमी झाल्याने तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते.
  • या 500 मिली. बाटलीमध्ये 40,000 मिलीग्राम / एल नायट्रोजन असते, जे पारंपारिक युरियाच्या एका पिशवीद्वारे प्रदान केलेल्या नायट्रोजन पोषक तत्वांच्या परिणामाइतके आहे.
  • जिथे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असत, तिथे त्यांना त्वचेचे संक्रमण आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असत. अशा परिस्थितीत द्रव युरिया स्पर्श न करता आणि कोणतेही नुकसान न होता फवारणी करता येते.
  • नॅनो युरियामुळे  वनस्पतींना योग्य पोषण मिळते आणि कमी कष्टात पिकांचे चांगले उत्पादन घेता येते.  उत्पन्नात सरासरी 8% वाढ दिसून आली आहे.
  • कापणी केलेल्या उत्पादनाची पौष्टिक गुणवत्ता, प्रथिने आणि पोषक घटकांच्या बाबतीत चांगली असते.
  • यामुळे जमिनीतील युरियाचा अतिरीक्त वापर कमी करून संतुलित पोषण कार्यक्रमाला चालना मिळेल आणि पिके मजबूत, आरोग्यदायी बनतील.
  • नॅनो युरिया लिक्विडच्या वापरामुळे पर्यावरण, पाणी आणि मातीचे प्रदूषण होत नाही.
  • हे केवळ भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत करत नाही तर ग्लोबल वार्मिंगची समस्या सोडवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते.

नॅनो युरिया वापरतांना घ्यावयाची काळजी:

  • नॅनो युरियाची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवा.
  • नॅनो युरिया हे विषमुक्त आहे, तथापि, सुरक्षिततेसाठी पिकावर फवारणी करताना फेस मास्क आणि हातमोजे वापरण्याचा सल्ला दिला जातो.
  • एकसमान फवारणीसाठी सपाट पंखा किंवा कट नोजल वापरा.
  • नॅनो युरियाची सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करावी. तीव्र सूर्यप्रकाश, जोरदार वारा आणि जास्त दव असेल तेव्हा याची फवारणी करणे टाळावे.
  • नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर 12 तासांच्या आत पाऊस पडल्यास फवारणी पुन्हा करावी नाहीतर याचा पिकावर काहीच परिणाम होणार नाही.
  • सागरिका सारखे जैव उत्प्रेरक, 100% विरघळणारी खते आणि कृषी रसायने याच्यात मिक्स करून फवारणी केली जाऊ शकते.
  • नॅनो युरिया उच्च तापमान टाळून थंड आणि कोरड्या जागी साठवा.
  • लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा.
Nano Urea liquid
Nano Urea liquid Image Credit: IFFCO

वापरण्याची वेळ आणि पद्धत:

2 ते 4 मिली नॅनो युरिया (4% N) एक लिटर पाण्यात मिसळा आणि पिकाच्या सक्रिय वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर फवारणी केल्यास नायट्रोजन ची गरज प्रभावीपणे पूर्ण होते. सर्व प्रकारच्या पिकासाठी वापरता येते. इतर रसायनाबरोबर मिसळताना फवारणीपूर्वी सुसंगतता तपासून मिश्रण तयार करावे.

पहिली फवारणी:

फांद्या किंवा फुटवे निघण्याच्या  टप्प्यावर (उगवणीनंतर 30-35 दिवसांनी किंवा लावणीनंतर 20-25 दिवसांनी).

दुसरी फवारणी:

पहिल्या फवारणीनंतर 20-25 दिवसांनी किंवा पिकावर फुले येण्यापूर्वी.

साठवणे आणि वाहतूक करणे सोपे आहे.

नॅनो युरिया द्रवरूप स्वरूपात (बाटली) उपलब्ध असल्याने खतांच्या साठवणुकीसाठी लागणारे गोदाम, वाहतूक आदींच्या खर्चात बचत होते. शेतकरी  नॅनो  युरियाच्या  बाटल्या  पिशवीतून सहजपणे  घेऊन जाऊ शकतात.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

3 thoughts on “Nano Urea liquid- नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी वरदान!”

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version