शेतकऱ्यांनी Mirchi मिरची लागवडीला अग्रक्रम का द्यावा? तर, सर्वप्रथम हिरवी मिरची आपण बाजारात विकू शकतो, पण जर यदाकदाचित बाजार भाव कमी असेल तर त्यावेळेस हिरवी मिरची लाल करून, वाळवून चढ्या दराने आपण बाजारात विकू शकतो असा दुहेरी फायदा या पिकापासून मिळतो.
आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरवी तसेच लाल मिरची वापरली जाते. त्यामुळे बाजारात हिरव्या मिरच्यांना नेहमीच मागणी असते. आपल्या जिभेला स्वाद व तिखटपणा देणाऱ्या भारतीय मिरचीला परदेशात सुद्धा चांगली मागणी आहे. महाराष्ट्रात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पीक घेतले जाते. मिरची या मसाला वर्गीय पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
हवामान:
Mirchi या पिकाची लागवड आपण वर्षभर म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये करू शकतो. मात्र उष्ण व दमट हवामानामध्ये मिरचीची जोमदार वाढ होऊन चांगले उत्पादन मिळते. पावसाळ्यात अति पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फुलगळ होते. तसेच थंड हवामान देखील या पिकास फारसे मानवत नाही.
जमीन/ पूर्व मशागत:
पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते काळी जमीन या पिकास योग्य असते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगले पीक येऊ शकते. चुनखडीयुक्त जमिनीतही मिरचीचे चांगले उत्पादन घेता येते. पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरची लागवड करावी.
मिरची लागवडीच्या आधी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी आणि त्या जमिनीत तीन ते चार ट्रॉली गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं शेणखत टाकून, बेड तयार करून घ्यायचे आहेत.
Mirachi लागवडीचा हंगाम:
खरीप Mirchi पिकाची लागवड जून, जुलै महिन्यामध्ये करावी तर उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी.
बियाणे:
एकरी 500 ते 600 ग्रॅम मिरचीचे बियाणे वापरावे.
Mirchi लागवडीसाठी सुधारित वाण:
पुसा ज्वाला:
ही जात हिरव्या मिरच्या साठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर पांडे असलेली असतात मिरची साधारणपणे 10 ते 12 सेंटीमीटर लांब, वजनदार व खूप तिखट असते.
पुसा सदाबहार:
या जातीची झाडे उंच असतात. यामध्ये हिरव्या मिरचीचे सरासरी उत्पादन साडेसात ते दहा टन तसेच वाळलेल्या मिरचीचे दीड ते दोन तर उत्पादन मिळते. पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची दिसते. हा वाण विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक आहे.
संकेश्वरी 32:
या जातीची झाडे उंच असतात, तसेच मिरची 15 ते 20 सेंटीमीटर लांब असते. मिरचीची साल पातळ असून त्यावर सुरकुत्या असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असतो. तिखट मसाल्यासाठी ही मिरची जास्त वापरली जाते.
ब्याडगी Mirchi:
ही जिरायत लागवडीसाठी योग्य जात आहे. या जातीची लागवड कर्नाटकतील धारवाड, शिमोगा, चित्रदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. पिकलेली मिरची गर्द लाल रंगाची, पृष्ठभागावर सुरकुत्या असलेली 12 ते 15 सें. मी. लांब, कमी तिखट असते. कमी तिखट गर्द लाल म्हणून या मिरचीला मसाल्यासाठी फार मागणी असून इतर मिरचीपेक्षा जास्त भाव असतो.
पंत सी-1:
हिरव्या व लाल मिरचीच्या उत्पादनासाठी ही जात अतिशय उत्तम आहे. ही मिरची पिकल्यावर आकर्षक लाल दिसते. मिरचीची लांबी 6 ते 8 सेंटीमीटर असून सालीला जाड असते. हा वाण बोकड्या रोगास प्रतिकारक आहे.
काश्मिरी Mirchi :
मिरची गर्द लाल बोराच्या आकाराची, बारीक असते. तिचा वापर बंगालमध्ये करी मध्ये बुडवून काढण्यासाठी करतात.
मुसळवाडी:
ही खरीप हंगामासाठी योग्य जात आहे.या जातीमध्ये मिरचीची झाडे उंच असतात. या मिरचीची झाडे बोकड्या आणि डायबॅक या रोगाला कमी प्रमाणात बळी पडतात.
ए के-47:
ऍडवांटा सीड्स ची काळ्यापाटीची, नावाप्रमाणे तिखट ही मिरची आहे. मध्यम उंचीची झाडे असून मिरची 13 ते 14 सेंटीमीटर लांब असते. बाजारामध्ये बाजारामध्ये या मिरचीला चांगली मागणी असते तसेच हिरवी व लाल दोन्हीपासूनही तिचे भरपूर उत्पन्न मिळते.
जी -2,3,4,5:
या सुधारित जातींची झाडे बुटके असतात फळांची लांबी 5 ते 8असते. या हायब्रीड व्हरायटीमध्ये भरपूर प्रमाणात फळधारणा होते. हिरवी आणि लाल अशा दोन्ही फळांचा रंग आकर्षक असतो लागवडीपासून सलग 8 ते 9 महिन्यापासून भरपूर उत्पादन मिळते. व्हायरस मुक्त ही व्हरायटी असल्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाचतो.
तसेच दोंडाईचा, देगलूर, पांढुरणी या स्थानिक जाती आणि सुजाता, सोनल, सितारा,सूर्या, अग्नी, ज्योती, भरारी, वैशाली,नवतेज या संकरीत वाणापासून ही चांगले उत्पादन मिळू शकते. आपल्या भागातील वातावरण, बाजारात होणारा उठाव, मिळणारा भाव अशा सर्व बारकाव्यांचा विचार करून आपण मिरची लावावी.
Mirchi लागवड :
सरी-वरंबा पद्धत:
उंच आणि पसरट वाढणार्या मिरचीच्या जातींची लागवड 30 * 60 सेंटीमीटर अंतरावर आणि बुटक्या जातींची लागवड 60 * 40 सेंटीमीटर अंतरावर करावी . सरी-वरंबा पद्धतीने रोपांची लागवड करताना लावणीपुर्वी,100 मिली जर्मिनेटर + 50 ग्रॅम बुरशीनाशक + 10 लि. पाणी या द्रावणामध्ये रोपे पुर्णपणे बुडवून घ्यावीत. त्यामुळे मर न होता, जोमदार वाढ होते. अशी रोपे सऱ्यांच्या बगलेमध्ये प्रत्येक ठिकाणी 1-1 रोप लावावे.
मल्चिंग पद्धतीने मिरची लागवड:
या पद्धतीने बेड तयार करण्यापूर्वी शेणखताबरोबर बेसल डोस जमिनीवर टाकावा. त्यानंतर पाच फुटाचे बेड तयार करावेत. हे बेड सपाट आणि भुसभुशीत असावे. बेडवर कागद अंथारण्यापूर्वी ड्रीप व्यवस्थित पसरून घ्यावे. किमान 20 ते 25 मायक्रोन चा पेपर वापरावा, जेणेकरून पाच ते सहा महिने टिकेल. मल्चिंग पेपरचे 4 फुट रुंदी व 1200 फूट लांबीचे 6 ते 7 बंडल एकरी लागतील. सव्वा फुटावर छिद्र पाडून रोप लागवड करायची आहे. लागवडीसाठी नर्सरी मधील निरोगी रोपांची निवड करावी.
मल्चिंग पेपरचे फायदे :
बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
जमिनीतील आर्द्रता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत होते.
बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. त्यामुळे भांगलनी, तणनाशकाच्या खर्चात बचत होते.
प्लॅस्टिक पेपरमुळे जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये वनस्पतीच्या पांढरया मुळांच्या विकासास मदत होते.
वनस्पतीच्या मुळांच्या आसपास सूक्ष्म हवामान तयार करते. लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते.
मिरची पिकाचे खत व्यवस्थापन:
माती परीक्षण अहवालानुसार कोणती अन्नद्रव्ये, किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जमिनीचा सामू किती आहे, यानुसार खताचे नियोजन करावे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार खताची मात्रा द्यावी. कोरडवाहू मिरची पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद हे जमिनीत घालावे. बागायती मिरची पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे जमिनीला द्यावे. यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्यावेळी जमिनीला द्यावी. उर्वरित नत्राची अर्धी शिल्लक मात्रा रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी मिरची पिकास गोलाकार /बांगडी पद्धतीने द्यावी.
Mirchi बेसल डोस प्रति एकरी खालीलप्रमाणे:
चांगले कुजलेले शेणखत -10 टन
सिंगल सुपर फॉस्फेट -250 किलो
मॅग्नेशियम सल्फेट -25 किलो
मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट -10 किलो
पिकाच्या योग्य वाढीसाठी विद्राव्य खते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून मुळाजवळ देणे फायदेशीर ठरते. तसेच यामुळे खताचा योग्य निचरा होऊन, वाया जात नाहीत. जमिनीमध्ये हवा, अन्न आणि पाणी यांचा परस्पर समतोल राखला जातो. जमीन कायमस्वरूपी वाफसा अवस्थेत राहते. ठराविक अंतराने खते दिल्याने, खते ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ होते. योग्य खते, योग्य वेळी दिली जातात. कमी पी.पी.एम. पातळीची खते जास्त परिणामकारक असतात. त्यांचे जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते. पिकाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारी 18 अन्नद्रव्ये योग्य वेळी प्रमाणात देता येतात.
मिरची पिकाचे पाणी व्यवस्थापन:
ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन: मिरची पिकाच्या मुळांची रचना सोटमूळ पद्धतीची आहे. सोटमूळ जमिनीत खोलवर वाढत असले तरी कार्यक्षम मुळांची कक्षा 1 फूटपर्यंत जास्तीत जास्त असते. अन्न आणि पाण्याचे शोषण या 1 फूट कक्षेतील मुळांकडून केले जाते, त्यामुळे कमी प्रवाह आणि कमी अंतरावरील ड्रीप असणारी ठिबक यंत्रणा निवडल्यास ओलिताची खोली नियंत्रित करता येते, खत आणि पाणी जास्तीत जास्त कार्यक्षम मुळांना देता येते.
मिरची पिकाला प्रमाणापेक्षा जास्त ही पाणी देऊ नये आणि कमी पाणी देऊ नये. रोपे लावणीनंतर दहा दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड हे रोपांना पाणी द्यावे. त्यानंतर एक आठवड्यात किंवा पाच दिवसांच्या अंतरानं मिरची पिकाला पाणी द्यावे. मिरचीची झाडे फुलावर आणि फळावर आले असताना, झाडांना पाण्याचा ताण द्यावा. जर तुम्ही मिरची लागवड हिवाळ्यात करत असाल, तर हिवाळ्यात 10-15 दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यावे. जर तुम्ही लागवड उन्हाळ्यात करत असाल, तर 6 ते 7 दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. आपल्या शेतीतील अनुभवाने जमिनीच्या मगदुराप्रमाणे मिरची Mirachi पिकाला पाणी द्यावे.
मिरची पिकातील रोग / कीड नियंत्रण:
मर रोग: कॅप्टन किंवा थायरमने 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड 50% मिसळून रोपांच्या मुळा भोवती ड्रेंचींग करावी.
किंवा मॅन्कोझेब 50-60 ग्रॅम 20लिटर पाण्यातून फवारावे.
फळे कुजणे आणि फांद्या वाळणे: या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किंवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे. किंवा टेबुकोन्याझोल 20 मिली. 20लिटर पाण्यातून फवारावे.
भुरी ( पावडरी मिल्डयू ): या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिली. कॅराथेन 10 लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
फूलकिडे: रोप लावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर, 15 दिवसांच्या अंतराने 16 मिलीमिटर डायमेथेएम 20 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8%एस एल 10 मिली. 20लिटर पाण्यातून फवारावे.
मावा: लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 % प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा फिप्रोनील 5%एस सी 30 मिली. 20लिटर पाण्यातून फवारावे.
फवारणीसाठी कीटकनाशके आलटून पालटून वापरावीत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने यामध्ये बदल करावेत.
FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मिरचीच्या पिकाची अंतर मशागत कशी करावी?
पहिली खुरपणी 20-25 दिवसांनंतर करावी. शेत तण विरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी खरीप मिरचीला मिरचीचा रोपांना भर द्यावी.
मिरची पिकाची तोडणी कधी करायची?
लागवडीनंतर साधारण अडीच महिन्यांनी मिरचीची पहिली तोडणी सुरू करावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने मिरचीची तोडणी करावी. साधारणपणे तोडणी सुरु झाल्यानंतर तीन महिने तोडे सुरू राहतात. वाळलेल्या मिरची साठी त्या पूर्ण झाडावर पिकून गेल्यानंतर त्यांची तोडणी सुरु करावी.
प्रति हेक्टर मिरचीचे उत्पादन किती निघते ?
बागायती हिरव्या मिरच्यांचे उत्पादन हेक्टरी 80-100 क्विंटल मिळते. तर कोरडवाहू मिरचीचे उत्पादन 60 ते 70 क्विंटल येते. वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन लागवड केलेल्या वाणानुसार 9-12 क्विंटल निघते.