ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तृणधान्य वर्गीय पीक आहे. आपली अन्नधान्याची गरज तसेच जनावरांना चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाची खरीप आणि रब्बी तसेच उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा लागवड केली जाते. कृषी विज्ञान केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ज्वारीचे अधिक उत्पादन घेता येते. Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन यासाठी खालील बाबींचा अवलंब करावा…
जमीन व पूर्वमशागत:
खरीप ज्वारी शक्यतो कोरडवाहू जमिनीतील पीक आहे, परंतु रब्बी किंवा उन्हाळी हंगामात ज्वारीचे पीक घ्यावयाचे झाल्यास पाण्याची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे. या पिकासाठी मध्यम ते खोल भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. सर्वप्रथम लागवडी खालील क्षेत्राची संपूर्ण नांगरणी करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्या. त्याचप्रमाणे ओलावा टिकून राहण्यासाठी उताराला आडवी नांगरणी करावी. काडी कचरा वेचून लागवडीखालील शेताची स्वच्छता करून घ्यावी.
भर खते:
ज्वारी पिकाला साधारणतः चार ते सहा बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रती एकरी देऊन जमिनीत चांगले मिसळावे.
रासायनिक खत: Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन
आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून रासायनिक खताचे मात्रा ठरवावी. माती परीक्षणाचा अहवाल सर्वसाधारण आल्यास 32 किलो नत्र 16 किलो स्फुरद व 16 किलो पालाश प्रति एकरी द्यावी यापैकी 16 किलो नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी सोबत (35 किलो युरिया +100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट +25 किलो एमओपी) व उरलेले 16 किलो नत्र आपले पीक 25 ते 30 दिवसाचे असताना द्यावे.
पेरणीची वेळ:
रब्बी ज्वारीची पेरणी 15 ऑक्टोबरपर्यंत ते 15 नोव्हेंबरपर्यंत करावी.
उन्हाळी हंगामात ज्वारी लागवड जानेवारीच्या 10 ते 15 तारखे दरम्यान करावी.
खरीप हंगामातील ज्वारीची पेरणी 15 जून ते 15 जुलै दरम्यान करावी.
ज्वारीचे सुधारित वाण:
खरीप हंगामातील वाण:
सीसीएच-5 ,सीसीएच-1, सीसीएच( advance), हायटेक 3201, हायटेक-5206, हरिता-540.
रब्बी हंगामातील वाण:
सीएसएच- 8(आर), सीएसएच-15 (आर), सीएसएच-13 (आर), सीएसएच-7(आर), स्वाती एसपीव्ही-504, मालदांडी 35-1 , सिलेक्शन-3, एसपीव्ही-1359.
उन्हाळी हंगामासाठी वाण:
मालदांडी 35-1 या लोकप्रिय वाणांबरोबरच परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या वाणांचे Jwari बियाणे पेरणीसाठी वापरावे.
बीजप्रक्रिया:
थायामेथाेक्झाम (70%) 3 ते 5ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा इमिडाक्लोप्रिड(48%) 10मिली + 20मिली पाणी प्रति किलो बियाणे. पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया केल्यास कणसात कानी येत नाही. यासाठी 3 ते 5 ग्रॅम गंधक 1किलो बियाण्यास चोळावे.
बियाण्याचे प्रमाण व पेरणीची पद्धत:
पेरणीसाठी एकरी 3 ते 4 किलो बियाणे पुरेसे आहे. ज्वारीची पेरणी 45 सेंमी. (1.5 फूट) च्या तिफनीने करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफनीचा उपयोग केल्यास पेरणीसोबत खत देणे सोयीचे होईल.
विरळणी:
पेरणी पासून पंधरा ते वीस दिवसांनी विरळणी करावी. त्यासाठी दोन रोपातील अंतर 15 ते 20 सेंमी. इतके ठेवावे. विरळणी करत असताना कमजोर खोडमाशीनेग्रस्त अशी रोपे काढून टाकावीत.
पाणी व्यवस्थापन:
ज्वारी हे पीक कमी पाण्यावर येणारे आहे. खरीप हंगामातील ज्वारी या पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही. या पिकाची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. परंतु दीर्घकाळपर्यंत पाण्याचा ताण आल्यास, ज्वारीच्या वाढीवर व उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन करताना खाली दिलेल्या पिकाच्या वाढीच्या नाजूक अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य नियोजन करावे.
1. पीक वाढीची जोरदार सुरुवात 35 ते 40 दिवस
2. पोटरी येण्याचा काळ 60 ते 65 दिवस
3. पिक फुलोऱ्यात येण्याचा काळ 70 ते 75 दिवस
4. दाणे भरण्याचा काळ 85 ते 95 दिवस
याबरोबरच पिकाची चांगली उगवण होण्यासाठी सुरुवातीच्या काळात जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध करून द्यावा. उन्हाळी ज्वारीला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.
आंतरमशागत:
सुरुवातीच्या काळात म्हणजे पीक 40 ते 45 दिवसाचे होईपर्यंत वेळोवेळी आंतरमशागत करून पिक तणमुक्त ठेवावे. यासाठी २ ते ३ वेळा कोळपणी व खुरपणी एक वेळा करावी. याबरोबरच तणनाशकाचा वापर सुद्धा करता येतो. त्यासाठी 2, 4-d इथील ईस्टर 38% हे तन नाशक पीक 30 ते 40 दिवसाचे असताना 60 मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी. Jwari ज्वारी पीकामध्ये अट्रॉझिन (50 टक्के डब्ल्यू. पी.) हे तणनाशक 500 ग्राम / एकरी 200 लिटर पाण्यातून पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी पीकात एकसमान फवारावे.
कापणी व मळणी:
ज्वारीचे पीक परिपक्व झाल्यानंतर कापणी व मळणी करावी. उन्हामध्ये चांगले वाळवून साठवणूक करावी साठवणुकीच्या वेळी ठाण्यातील ओलावा 10 ते 12 टक्क्यांच्या वर असू नये.
पीक संरक्षण:
ज्वारी पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करता येते.
1. खोडमाशी: वेळेत पेरणी आणि पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे, प्रादुर्भाव झालेली रोपे काढून नष्ट करणे, प्रादुर्भाव जास्त असल्यास क्विनोलफॉस 25% प्रवाही प्रति पंप 30 मिली या प्रमाणात फवारणी करावी.
2. खोडकिड: प्रादुर्भावग्रस्त पानावरील अंडीपुंज पानासहित तोडून नष्ट करावेत. क्लोरपायरीफॉस 20% – 500 मिलि प्रती 200 लीटर पाण्यातून फवारावे.
3. मावा, तुडतुडे: ईमिडाक्लोप्रिड 17.8% – 40 मिलि किंवा डायमिथोएट 30% – 200 मिलि प्रती 200 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
4. चिकटा, मावा: निंबोली अर्क 5% किंवा डायमिथोएट 30% – 200 मिलि प्रती 200 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच ज्वारी पिकांवर विविध प्रकारचे रोग पडतात. त्यामध्ये करपा, तांबेरा व काणी इत्यादी प्रमुख रोग आढळून येतात. या रोगांमुळे ज्वारी पिकांमध्ये 30 ते 50 टक्के नुकसान होते. योग्यवेळी आणि योग्यपद्धतीने नियंत्रण केल्यास नक्कीच Jwari या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविता येते.
करपा: झायनेब 75% – 500 ग्रॅम / मॅनकोझेब 80% – 600 ग्रॅम प्रती 200 लीटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. रिडोलिम एम. झेड या बुरशी नाशकाची 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.
तांबेरा: रोगग्रस्त झाडे व पाने नष्ट करावीत. झिंक सल्फेटची 0.5 टक्के याप्रमाणात फवारणी करावी. सल्फर या बुरशीनाशकाची 25 किलो पावडर प्रति हेक्टर या प्रमाणात धुरळणी करावी.
काणी: पेरणी पूर्व बियाण्यास तीन ते चार ग्राम थायरम किंवा सल्फर (गंधक) इत्यादी बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी.
FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
प्रश्न 1. ज्वारी किती महिन्याचे पीक आहे?
उत्तर – जाती नुसार ज्वारी ४ ते ५ महिन्याचे पीक आहे.
प्रश्न 2. कोरडवाहू लागवडीसाठी ज्वारीचे कोणते वाण चांगले आहे?
उत्तर – कोरडवाहू लागवडीसाठी मालदांडी 35-1 हे वाण चांगले आहे.
प्रश्न 3. खोडकिडा या किडीमुळे कोणती लक्षणे दिसतात ?
उत्तर – खोडकिडा या किडीमुळे पोंगे मर होतेच शिवाय पानावर छिद्रे पडलेली आढळतात.
प्रश्न 4. ज्वारी पिकाच्या कणसावर कोणकोणत्या किडींचा प्रादूर्भाव होतो ?
उत्तर- ज्वारी पिकाच्या कणसावर मिजमाशी, आणि कणसातील अळ्या या किडींचा प्रादूर्भाव होतो.
प्रश्न 5. ज्वारी पिकावर कोणकोणत्या रस शोषणाऱ्या किडी आढळतात?
उत्तर : ज्वारी पिकावर तुडतुडे, मावा आणि कोळी या किडी आढळतात.
प्रश्न 6. ज्वारी पिकामध्ये कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो?
उत्तर – ज्वारी पिकावर काणी, खडखड्या, दाण्यावरील बुरशी, तांबेरा, करपा आणि केवडया रोगांचा प्रादुर्भाव होतो.
हेही वाचलंत का?
khupach upyukt mahiti savistar dili aahe. dhanyavad