Integrated food management: भारतातील विविध पिके, पीक पद्धती आणि खतांचा वापर याविषयी विविध विचार प्रवाह आहेत. पिकांच्या साठी अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत हा जमीन आहे. एकूणच प्रत्येक स्त्रोताचा गुणधर्म किंवा उपयुक्तता ही वेगवेगळी असते. जसे की, सेंद्रिय खते ही जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म चांगले ठेवतात तर रासायनिक खताद्वारे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो तसेच जैविक खते ही टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतात. म्हणूनच सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा एकत्रित वापर, सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण आणि योग्य पीक पद्धतींचा अवलंब करून पिकांना अन्नद्रव्य पुरवण्याच्या पद्धतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन Integrated food management असे म्हणतात.

या पद्धतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबरच सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतातील काडीकचरा, धसकटे, मुळे, पालापाचोळा अशा टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून मिळणारा खतांचा समतोल साधला जातो.
अशी ही एकात्मिक अन्नद्रव्य (खत व्यवस्थापन) पध्दत पिकांना योग्य अन्नद्रव्य पुरवून चांगल्या शेतीपद्धतीचा सुवर्णमध्य ठरू शकतात.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातील घटक
सेंद्रिय खते- Integrated food management
वनस्पती व प्राणीजन्य खते ही जमिनीत मोठ्या प्रमाणात मिसळल्यास पिकांना फक्त पोषणच पुरवत नाहीत, तर जमिनीचा पोत व जलधारण क्षमताही सुधारतात. या सेंद्रिय खतांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.
1. भरखते
गांडूळखत, शेणखत, कंपोस्टखत, लेंडीखत, कोंबडीखत, सोनखत, शहरातील घनकचरा व शहरी द्रवरूप कचरा इत्यादी.
2. जोरखते
लिंबोळी पेंड, करंजी पेंड, सरकी पेंड, एरंड पेंड, भुईमूग पेंड, करडई पेंड, मासळीचे खत, हाडांचा चुरा इत्यादी.
3. हिरवळीची खते
ताग, धैंचा, तूर, मेथी, चवळी, शेवरी, सुबाभूळ इत्यादी, ही पिके फुलोऱ्यात येण्यापूर्वी ती जमिनीत गाडली जातात.
जिवाणू खते
वनस्पतींना पोषणद्रव्य पुरवण्यामध्ये काही फायदेशीर जिवाणूंचा सहभाग असतो. या जिवाणूंची संख्या जमिनीत पुरेशी असल्यास पिकांना पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहतो. जिवाणू खतामध्ये अशा प्रकारचे फायदेशीर जिवाणू हे सुप्ताअवस्थेमध्ये असतात. ही खते जमिनीत मिसळल्यानंतर ते जिवाणू कार्यक्षम होऊन पिकांना पोषक द्रव्यांचा पुरवठा करतात.
1. रायझोबियम
कडधान्यांच्या मुळावरील गाठीमध्ये नत्र स्थिर करणारी जीवाणू खते.
2. पी. एस. बी.
जमिनीतील स्फुरद विरघळविणारी जिवाणू खते.
3. ऍझोटोबॅक्टर आणि ऍझोस्पिरीलीयम
जमिनीत नत्र स्थिर करणारी जिवाणू खते.
4. ऍसिटोबॅक्टर
हे जिवाणू हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात.
5. मायकोरायझा
नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, जस्त, तांबे इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यासाठी पिकांना मदत करतात.
6. थायोबॅसिलस
हे जिवाणू गंधकाचे (सल्फर) ऑक्सिडायझेशन करतात व वनस्पतीसाठी उपयुक्त सल्फेट तयार करतात.
7. अझोला आणी निळे, हिरवे शेवाळ
विविध अन्नद्रव्यांचा पुरवठा उपलब्ध करण्यास पिकांना मदत करतात.
रासायनिक खते
विशिष्ट पोषणद्रव्यांची गरज भागवणारी खते जी जमिनीत योग्य प्रमाणात (माती परीक्षणानुसार) मिसळून पिकांची गरज भागवली जाते. रासायनिक खतांचे प्रकार पुढीलप्रमाणे –
1. नत्रयुक्त रासायनिक खते
युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट इत्यादी.
2. स्फुरदयुक्त रासायनिक खते
सिंगल/डबल/ट्रिपल सुपर फॉस्फेट, डाय कॅल्शियम फॉस्फेट, बोनमील इत्यादी.
3. पालाशयुक्त रासायनिक खते
म्युरेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम सल्फेट इत्यादी.
4. संयुक्त खते
नायट्रोफॉस्फेट (24:24:00), नायट्रोफॉस्फेट पालाशसह (19:19:00), डायअमोनियम फॉस्फेट (18:46:00) इत्यादी.
5. मिश्र खते
10:26:26, 12:32:16, 18:18:10 इत्यादी.
6. सूक्ष्म अन्नद्रव्य खते
फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, अमोनियम मॉलिब्डेट, चिलेटेड लोह, चिलेटेड झिंक, बोरॉन इत्यादी.
एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाची गरज काय?
*सध्या देशातील खताचे उत्पादन गरजेपेक्षा फारच कमी आहे. तसेच स्फुरद, पालाशसारखी रासायनिक खते परदेशातून आयात करावी लागतात. त्यावर सरकारला अनुदान द्यावे लागते. या अनुदानाचा भारही प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करून कार्यक्षमता वाढवली पाहिजे.
*अविद्राव्य खतांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्यासाठी व अन्नद्रव्यांचा पुरवठा संतुलीत होण्यासाठी जैविक खतांचा वापर करावा लागतो.
*जमिनीची सुपीकता आणि पिकाची उत्पादकता ही केवळ रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांच्या एकत्रित वापरानेच वाढवता येईल. जेणेकरून जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मात सुधारणा करता येईल.
*हरित क्रांतीनंतर रासायनिक खतांचा वापर बेसुमार वाढला. जमिनीच्या सुपीकतेकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही, ते आता देणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे
1. एकात्मिक अन्नद्रव्यांच्या साह्याने पिकांना संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करता येतो.
2. जमिनीतील कर्ब:नत्र यांचा प्रमाणात समतोल राखला जातो, त्यामुळे उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
3. अविद्राव्य खतांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते व स्फुरद, पालाश सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता वाढवता येते.
4. जमिनीची जलधारण शक्ती तसेच जैव-रासायनिक प्रक्रियांचा समतोल राखला जातो.
5. पीक अवशेषांचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास, जल व मृदा संधारणा बरोबरच अन्नद्रव्यांचा पुरवठाही होतो.
6. संतुलित खतामुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पिक उत्पादनात वाढ होते.
7. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात जसे की पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे, पाणी मुरवणे, जमीन भुसभुशीत करणे यामध्ये सुधारणा होतात.
8. सेंद्रिय व जैविक खतामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.
सारांश
जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, सुपीकता व उत्पादकता यावर परिणाम करतात.
जमिनीची धूप, पीकाद्वारे अन्नद्रव्यांची उचल (aptech) व असंतुलित अन्नद्रव्य पुरवठा यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधून जमिनीचे आरोग्य अबाधित राखून शाश्वत उत्पादन मिळवता येते.