भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असून शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. भारतातील सुमारे 60% शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु बदलत्या हवामानाचा Impact of climate change on agriculture शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. हवामान बदलाची ही समस्या सर्व जगालाच भेडसावत आहे. तापमान वाढीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. आठवड्यातील 60-70 तास राबूनही शेतीचा व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे अशक्य झाले आहे. अशातच शेतीला प्रतिष्ठा नाही, असे आजच्या तरुणाला वाटते त्यामुळे ते शेतीत कष्ट करायला तयार नाहीत. पर्यावरणातील बदलामुळे शेतीचे उत्पन्न कमी होत आहे, उत्पन्नाचे अंदाज फोल ठरत आहेत. त्यामुळे निवृत्तीच्या काठावरील शेतकरी या वयातही कष्ट करत आहेत, जे की कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक संकटांनी ग्रासलेले आहेत.
आपत्ती तर आलेलीच आहे, येणार आहे हे लक्षात घेऊन या आणीबाणीतून बाहेर पडण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. Impact of climate change on agriculture and alternative management या नियोजनाविषयी आपण या लेखात चर्चा करणारच आहोत पण त्यापूर्वी आपल्याला हवामान म्हणजे काय त्यामध्ये काय बदल झाले, होत आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे.
हवामान आणि हवामानातील बदल:
रंजन केळकर यांच्या मते हवामानातील बदल जेव्हा आपल्या अपेक्षा प्रमाणे होत असतात तेव्हा आपण त्याचा फारसा विचार करत नाही. परंतु आपल्याला अपेक्षित नसणारे हवामान जेव्हा आपण अनुभवू लागतो, तेव्हा त्यास ढोबळमानाने हवामानातील बदल असे म्हटले जाते. पृथ्वीचे तापमान हे अक्षवृत्तानुसार बदलते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेचे तापमान हे 1998 सालापासून वाढत असल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेचे शास्त्रज्ञ श्री. अलगोर व श्री. पचौरी यांनी सिद्ध केले आहे.
तापमान वाढीचे प्रमुख कारणे:
जगभरातील वाढती दळणवळणाची साधने, वेगाने वाढणारे उद्योगधंदे, कारखानदारी, वाढत्या एअरकंडिशन इमारती यामधून सातत्याने कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन वाढत आहे.
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून, कोळसा खाणींच्या उत्खननातून, जनावरांच्या रवंथ करण्यामधूनही मिथेन वायू बाहेर पडतो.
विशेषतः भात शेतीत होणाऱ्या अतिरिक्त नायट्रोजन खतांच्या वापरामुळे नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे.
हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन, आणि नायट्रस ऑक्साईड या वायूचे वाढते प्रमाण हेच तापमान वाढीचे मुख्य कारण आहे असे श्री. अलगोर व श्री. पचौरी यांनी आपल्या निष्कर्षामध्ये नोंदवले आहे.
तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शास्त्रज्ञांच्या मतानुसार ‘एल निनो‘ हे तापमान वाढीचे दुसरे कारण आहे.
एका बाजूला मानवाने वृक्षतोड केल्यामुळे आशिया खंडातील 60 दशलक्ष हेक्टर, आफ्रिका खंडातील 55 दशलक्ष हेक्टर, लॅटिन अमेरिकेतील 85 दशलक्ष हेक्टर जंगले आजपर्यंत नष्ट केली आहेत. म्हणजेच कार्बनडाय ऑक्साईड वापरणारी यंत्रणा (झाडे,वृक्ष,जंगले) मानवाने नष्ट केल्यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. हा कार्बनडाय ऑक्साईड वायू सूर्यापासून मिळणारी उष्णता व ऊर्जा धरून ठेवतो. परिणामी पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढले आहे. जेव्हा हवेचे तापमान वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो आणि वारा जास्त हवेच्या दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतो.
यामुळे ऋतुचक्रावर परिणाम होऊन पावसाळ्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टी, हिवाळ्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस तर उन्हाळ्यात गारपिटीचा तडाखा अशी परिस्थिती निर्माण होते. यामुळे त्या विशिष्ट हंगामातील पिके आणि एकूणच पीकपद्धती धोक्यात येते.
भारतीय शेतीवरील हवामान बदलाचे परिणाम: Impact of climate change on agriculture
- हवामानातील बदल हे पीक वाढीच्या टप्प्यावर गंभीर परिणाम करतात.
- पिकांच्या उत्पादकतेत घट होत असल्याने शेती अशाश्वत झाली आहे.
- सरासरी तापमानात वाढ झाल्यामुळे पावसाचे दिवस कमी होत आहेत, अनियमित पर्जन्यमानाचा सामना करावा लागत आहे.
- खरिपात दुबार पेरणीची वेळ येत आहे, तर पुरेसा ओलाव्याभावी रब्बीचे क्षेत्रही कमी होत आहे.
- चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.
- वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी कमी होऊ लागली आहे. तर बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे पिकांना, एकूणच सजीवांना ज्यादा पाण्याची गरज भासत आहे.
- वैरण/चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे, त्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे.
- मातीचे तापमान वाढल्यामुळे खनिजीकरण वाढले आहे. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकाऊ जमिनीची गुणवत्ता कमी झाली आहे.
- तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या जमिनीत खारट पाणी घुसून पिकाऊ जमिनीचे क्षेत्र घटत आहे.
- तापमान वाढीस संवेदनशील असलेल्या कीटकांच्या नवीन प्रजाती उदयास येत आहेत. कीटकांच्या स्थलांतरणांमुळेही कीटक व रोग यांच्या आक्रमणाचा धोका वाढलेला आहे.
- वातावरणातील या बदलामुळे 2040 पर्यंत गहू आणि भाताच्या उत्पन्नामध्ये अनुक्रमे 9% आणि 12% घट होऊ शकते. तसेच गव्हातील प्रथिनांचे प्रमाण 1% कमी होईल असे अभ्यासकांचे मत आहे.
वातावरणातील बदलानुसार पर्यायी शेती व्यवस्थापन:
हवामान बदलाचा सर्वात मोठा परिणाम शेतीक्षेत्रावर होत आहे. परिणामी भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊन शेतीक्षेत्र पुरते अडचणीत येणार आहे. यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती तर बिघडेलच परंतु देशाची अन्नधान्य सुरक्षा देखील धोक्यात येईल. अन्नधान्यात स्वयंपूर्ण असणाऱ्या आपल्या देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची वेळ येईल.
या अनुषंगाने शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नासाठी काही ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. जसे की,
1. पाण्याचा नियंत्रित वापर:
वाढते तापमान आणि बदलते पर्जन्यमान यामुळे भविष्यात पाणी हा एक दुर्मिळ स्त्रोत बनणार आहे. या अनुषंगाने शेतीमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. पिकानुसार सिंचनाची निवड करावी लागेल.
2. मल्चींग चा वापर:
शेत जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा लागेल जेणेकरून बाष्पीभवनाचा वेग कमी करता येईल. यासाठी आधीच्या पिकांचे अवशेष, पालापाचोळा किंवा प्लास्टिक मल्चींग चा वापर वाढवावा लागेल. फळपिकासाठी पाणीटंचाईच्या काळात हे आच्छादन खूपच फायदेशीर ठरते.
3. पीक पद्धतीत बदल:
बागायती जमिनीत गहू पिकाचे क्षेत्र कमी करून रब्बी ज्वारीची पेरणी करावी. कारण हवामानातील बदलामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातच पिकांना थंडीचा कालावधी मिळत आहे. गहू या पिकास थंडीचा कालावधी न मिळाल्यास उत्पादनात घट होते. म्हणूनच ऑक्टोबर महिन्यात रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत पीक निघते; व गारपीट, अवकाळी पाऊस यांचा धोकाही रहात नाही.
4. रुंद सरी-वरंबा पद्धती आणि बंदिस्त वाफे:
मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर करून हळद, सोयाबीन, ज्वारी, घेवडा या पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढवता येईल. रब्बी पीकपद्धतीत जमिनीच्या उतारानुसार मोठ्या आकाराचे वाफे तयार करून पावसाचे पाणी मुरवता येईल. ज्वारी पिकात या जलसंधारणामुळे हेक्टरी 30% उत्पन्न वाढ दिसून आलेली आहे.
5. संरक्षित शेतीचा अवलंब:
पॉलिहाऊसमधील पीक लागवडीवर भर द्यावा. प्रत्येक शेतकऱ्याने किमान 10 गुंठे क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर पॉलिहाऊसची उभारणी करावी. त्यामध्ये ठिबक सिंचनद्वारे पिकांना पाणी आणि द्रवरूप खते(water soluble fertilizers) देऊन ढोबळी मिरची, टोमॅटो, जरबेरा, गुलाब यासारखी पिके लावून शेतमालाचे उत्पादन व उत्पादकता यांची गुणवत्ता वाढवावी.
6. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर:
शेतीमध्ये ठिबक सिंचन जोडल्यास पाण्याच्या वापरात 50% बचत होते. ठिबकद्वारे द्रवरूप खते दिल्याने खतांच्या वापरात आणि उत्पादन खर्च बचत होते. यामुळे शेतीचे बागायती क्षेत्र व शेतमालाचे उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होते.
7. आंतरपीके घेणे:
मुख्य पिकाबरोबरच दुसरे एखादे आंतरपीक घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. बोनस उत्पादन मिळते. म्हणून सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करून बागायती जमिनीत उसाबरोबर+ भुईमूग, हरभरा, कांदा, कोबी, फ्लॉवर यासारखी आंतरपीके घेऊ शकतो. कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन+ तूर, बाजरी+ तूर, कापूस+ मुग-उडीद ही आंतरपिके घेऊ शकतो.
8. उच्च उत्पादनक्षम नवीन वाणांचा विकास करणे:
निसर्गात उद्भवणारे वातावरणातील बदल आणि जैविक ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये विकसित करावी. याबरोबरच प्रतिकुल परिस्थितीत जमिनीतून पाणी आणि पोषण तत्वे शोषून घेण्यासाठी मुळांची कार्यक्षमता सुधारावी. यासाठी अनुषंगिक अभियांत्रिकी मधील ‘जीन पिरॉमिडांग’ मध्ये अधिकाधिक संशोधन करून आदर्श वनस्पती प्रकारांची निर्मिती करावी.
9. मशीन लर्निंग मॉडेलचा वापर:
ज्यामुळे त्या परिसरातील माती, तिचा प्रकार व खोली, जलधारण क्षमता एकंदरीत पोत यांचे अंदाज मांडता येतील. पाऊस 8-15 दिवस उशिरा येणार आहे तर कोणते पीक घ्यायचे, कोणते टाळायचे याचे नियोजन करता येईल. वातावरणातील माहितीचा(हवामानाचा) अंदाज हा 5 दिवसांपर्यंत समजतो तर त्याचा संभाव्य कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन पुढे जाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सहज वापरता येण्यासारखे ‘मोबाईल ॲप’ विकसित व्हावेत. ज्यामुळे शेतीत पीकनिहाय व्यवस्थापन सुलभ होईल. हे सर्व करूनही जर पीक अपयशी झाले तर शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रभावी पिक विमा योजना राबवावी.
10. जलयुक्त शिवार अभियान:
महाराष्ट्र शासनाने राबवलेले हे अभियान शेतकऱ्यासाठी एक वरदानच आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी 5000 गावात शेतकऱ्यांसाठी साखळी बंधारे व तळी तयार केली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा तर होतोच पण भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढते. हे अभियान एक सामाजिक चळवळ म्हणून असेच सुरू राहिले तर कोरडवाहू भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटेलच आणि शेतीसाठीही पाणी उपलब्ध होईल. यासाठी या कामात उस्फुर्त लोकसभा वाढवला पाहिजे.
जलसंधारणाच्या कामांना गती देऊन जलसंचय वाढवण्यासाठी या कामासाठीची गुंतवणूक देखील वाढवावी लागेल.
तसेच आपल्या जमिनीच्या वापरायचे योग्य नियोजन करावे. उष्णता आणि पाण्याचा ताण कमी करण्यासाठी शेतीमध्ये शून्य मशागत तंत्राचा(SRT) अवलंब करावा. नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे.
वनीकरण, जंगल क्षेत्र वाढवणे यासाठी पडीक जमिनींचे योग्य व्यवस्थापन करावे. जेणेकरून जंगलातील जैवविविधता, वन्य प्राणी यांचे संवर्धन होईल. झाडांचा थेट संबंध समुद्राच्या वाफेशी आणि नियंत्रित तापमानाशी आहे. झाडामुळे मधमाशा, कीटक, पक्षांची संख्या वाढेल. पक्षामुळे शेतातील कीड नियंत्रणात येईल. परागीभवन सुलभ होऊन उत्पादनाचा दर्जा सुधारेल.
आपत्ती तर आलेलीच आहे, येणार आहे हे लक्षात घेऊन नियोजनाविषयी तत्परता, अल्पकालीन व दीर्घकालीन धोरणे आखली पाहिजेत. जागतिक तापमान वाढीच्या या आव्हानाला एक संधी म्हणून बघितले तर आपण शेतीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकतो…
voluptates fugit ipsum enim dignissimos odit ullam reprehenderit omnis. sequi sint id facilis non quia pariatur voluptatum quaerat. voluptatibus dolores quia est et voluptatibus enim nobis minus vel s
nemo ipsam nemo in aut et repellendus est. debitis aut fugiat voluptates officiis et sunt autem est aliquid et aut perspiciatis non.
earum voluptates non in qui ab cumque iure in voluptatem. deserunt laboriosam alias sed placeat ut et et perspiciatis qui dignissimos natus ab perspiciatis doloribus ratione. consequatur magnam earum