जमिनीची नांगरणी केव्हा करावी?
पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच नांगरणी Deep Plowing करणे अत्यंत फायदेशीर ठरते. पीक काढल्यानंतर जास्त वेळ थांबल्यास जमिनीतला ओलावा कमी होतो, परिणामी जमीन टणक बनते आणि नांगरटीस अडचणी येतात. तसेच, उशिरा नांगरट केल्यास मोठी ढेकळे तयार होतात, ज्यामुळे पुढील मशागतीच्या कामात अडथळे निर्माण होतात. योग्य वेळी नांगरणी केल्यास जमिनीत सूर्यप्रकाशाचा प्रवेश होतो आणि ती योग्य प्रमाणात तापते.
उन्हाळा हा हंगाम शेतीच्या दृष्टीने खास करून नांगरणीसाठी अत्यंत उपयुक्त काळ असतो. यामध्ये जमिनीची खोल नांगरणी Deep Plowing करून उन्हामध्ये तापत ठेवले जाते, ज्याचा अनेक नैसर्गिक व शाश्वत फायद्यांसाठी उपयोग होतो. ही प्रक्रिया केवळ तण व किड नियंत्रणापुरती मर्यादित नसून, जमिनीचा पोत आणि संरचना सुधारण्यास आणि पुढील हंगामाच्या योग्य तयारी करण्यासाठीही महत्त्वाची ठरते.

जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापत ठेवण्याचे फायदे:
पिकाच्या उत्तम वाढीसाठी जमीन भुसभुशीत असणे गरजेचे असते, तो भुसभुशीतपणा व पाणी धरून ठेवण्याची क्षमता नांगरणीमुळे वाढते. जमीन पालथल्यामुळे खालील भाग वर येतो, हवा खेळती राहते, कोरड्या हवेशी संपर्क आल्यामुळे अनेक सुप्त घटक सक्रिय होतात. जसे की नत्र,स्फुरद,पालाश स्थिरीकरण करणारे जिवाणू.
1) रोग व किडींचा नैसर्गिकरित्या नायनाट होतो
उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी केल्याने जमिनीतील लपलेल्या किडी, अळ्या, बुरशी, आणि जिवाणूंना उन्हाची तीव्रता सहन होत नाही. उष्णतेमुळे ते नष्ट होतात, त्यामुळे पुढील येणाऱ्या हंगामामध्ये देखील पिकाचे सुरक्षित नियोजन करण्यास मदत होते, आणि एकंदरीत उत्पन्न देखील जास्त वाढण्यास मदत होते.
2) तणांचे नियंत्रण
तणांच्या बियांना देखील अंकुरण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. उन्हाच्या जास्त तीव्रतेमुळे बिया पूर्णपणे नष्ट होतात, परिणामी पुढील हंगामात तणांचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे मुख्य पिकात पाण्याचे आणि अन्नद्रव्यांचे नियोजन केल्यावर पूर्णपणे ते पिकालाच मिळते.
3) जमिनीची संरचना सुधारते
खोल नांगरणीमुळे जमिनीचे थर हलके, भुसभुशीत होतात. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. हवा आणि पाण्याचा प्रवेश योग्य प्रमाणात होतो.
4) सेंद्रिय घटकांचा विघटन वेग वाढतो
वळीव पाऊस सुरू होण्याअगोदर आपली जमीन नांगरलेली असेल तर एक्टिनोमायसीट्स नावाचे जिवाणू सक्रिय होतात.पाऊस पडल्यामुळे जो वास आपल्याला येतो तो या जिवाणूमुळेच. हे जिवाणू मातीतील रोगकारक जीवाणूंना आळा घालते, तसेच जमिनीत मृत वनस्पती, पशु आणि बुरशीजन्य पदार्थामधील पॉलिमर विघटित करतात. जे पुढील पिकास अंत्यत फायदेशीर आहे.
5) जमिनीत हवा खेळती राहते
खोल नांगरणीने जमिनीत ऑक्सिजनची देवाणघेवाण वाढते, जे जमिनीतील उपयोगी सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजून झाडांना उपयुक्त अन्नद्रव्यांमध्ये रूपांतरित होतात, जमिनीची सुपीकता वाढते. तसेच पुढे पिकाची वाढ देखील चांगली होते.
6) जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी उपयुक्त
उन्हाळ्यात नांगरलेली व तापलेली जमीन पावसाळ्यात पाणी अधिक प्रमाणात शोषते, आणि ओलावा टिकवून ठेवते, जे खरीप पिकासाठी फायदेशीर ठरते. तसेच खरिफ हंगाम पिकांसाठी वापसा अवस्था पिकामध्ये बनून राहते.
1 thought on “Deep Plowing: खोल नांगरणी करून जमीन तापत का ठेवावी? जमिनीची नांगरणी केव्हा करावी?”