वाढणारी कडाक्याची थंडी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानातील पेशी निर्जीव होतात. त्यामुळे हा भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसर दिसतो. मागील काही वर्षापासून ऊस पिकावर अति थंडीमुळे Chilling effect on sugarcane विपरीत परिणाम दिसत आहे. हा परिणाम ऊस पिकावर, पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे या विकृतीच्या स्वरूपात मर्यादित होता. या विकृतीमुळे होणारे नुकसान अत्यल्प होते. हवामान बदलामुळे झालेली ही शारीरिक विकृती आहे. ही समस्या पानापुरतीच मर्यादित राहते, त्याचा संसर्ग इतर पानावर होत नाही. तसेच तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या संपते.

अचानकपणे होणाऱ्या हवामान बदलांचा पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. हवामानातील बदलामुळे पिकावर जैविक किंवा अजैविक घटकांच्या माध्यमातून परिणाम होतात. यावर्षी महाराष्ट्रात हिवाळी हंगामात तापमान जास्त कालावधी पर्यंत कमी राहिलेले होते, तर काही भागात तापमान सरासरी किमान तापमानपेक्षा खूप कमी नोंदवले गेले. यंदाच्या हिवाळयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही भागात सकाळी थंडीच्या वेळी वारे वाहत होते. या हिवाळ्यात आद्रतेचे हवेतील प्रमाण अत्यंत आहे. साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस तोडणी करून राहिलेल्या खोडवा पिकात थंडीचा विपरीत परिणाम Chilling effect on sugarcane लक्षणीयरीत्या दिसून येत आहे.
पिकाची पाने जांभळ्या रंगाची होणे, पानाची टोके वाळणे, वाढ खुंटणे ही लक्षणे दिसत आहेत. थंडीचा परिणाम हा पानापुरताच मर्यादित असून वाळलेले पोंगे सहजपणे उपसून येतात, मात्र पोंग्यातील वाढणारा कोंब सुस्थितीत आहे. उसाच्या बेटातील मुळे कमी असली तरी जिवंत आहेत.
Chilling effect on sugarcane अति थंडीचा परिणाम
- ज्या शेताच्या सभोवती वाऱ्यास अडथळा आहे, त्या ठिकाणी पाने सुकण्याचे प्रमाण कमी आहे.
- गाळप हंगामास तयार झालेल्या मोठ्या ऊसात काही भागात वाड्यावरील पाने वाळलेली आढळली.
- पाचट आच्छादित खोडवा पिकास जिथे पाण्याचा ताण दिला आहे, अशा पिकात पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे. पाने वाळण्याची समस्या पाचट ठेवलेल्या शेतापुरती मर्यादित नसून पाचट न ठेवलेल्या पीकातदेखील दिसत आहे.
- ज्या पिकास वारंवार किंवा नुकतेच पाणी दिले आहे, अशा शेतात थंडीचा परिणाम Chilling effect on sugarcane कमी आहे. याउलट ज्या खोडवा पीकास पाण्याचा ताण दिला आहे, त्या ठिकाणी पिकाची पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे.
- सर्वच ऊस जातीमध्ये थंडीमुळे नुकसान झाल्याचे दिसते कोएम-265 आणि को-86032 या जातीच्या खोडवा पिकात नुकसानीचे प्रमाण इतर जातीपेक्षा जास्त आहे. या दोन जाती पैकी कोएम-265 या जातीत तीव्रता अधिक दिसते.
- आडसाली हंगामात लागवड केलेल्या पिकात तसेच या हंगामात राखलेले बेणे, खोडवा पिकात थंडीचा परिणाम अत्यल्प आहे. या पिकांमध्ये पाने जांभळी होणे, पानांची टोके वाळलेली दिसतात.
- जमिनीच्या उंच आणि सकल भागात थंडीचा परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो. परिणामाची तीव्रता उंच भागात असणाऱ्या पिकात जास्त आहे.
- ऊसाच्या बेटामध्ये नवीन मुळे कमी प्रमाणात आहेत, पण असलेली मुळे जिवंत आहेत.
- पाटपाणी दिलेल्या पिकात परिणामाची तीव्रता ठिबक सिंचनाखाली असलेल्या पिकापेक्षा कमी आढळली.
- भारी जमिनीतील पिकात थंडीचा परिणाम हलक्या जमिनीतील पिकापेक्षा कमी प्रमाणात आहे. ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, त्या जमिनीतील पिकात पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे.
- कमी परिणाम झालेल्या ऊस पिकात पाने वाळण्याव्यतिरिक्त पाने टोकाच्या भागात वाळणे, पाने सुरकुतणे, पाने जांभळी होणे आणि वाढ खुंटणे इत्यादी लक्षणे दिसत आहेत.
- ऊस पिकाव्यतिरिक्त मका, ज्वारी, बाजरी, कलिंगड, काकडी या पिकावरही पाने वाळण्याची लक्षणे दिसत आहेत.
शास्त्रीय कारणे
- अति थंडी आणि त्याचा जास्त कालावधी, हवेतील कोरडेपणा तसेच थंड व कोरडे वारे यामुळे पानातील पेशी निर्जीव होतात. त्या निर्जीव भागात प्रकाश संश्लेषणाचे कार्य होत नाही, त्यामुळे तो भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसर राहतो.
- पोंग्यातील पानाचा निर्जीव झालेला भाग सडतो आणि त्यानंतर वाळतो. हवामान बदलामुळे झालेली ही शारिरीक विकृती आहे. ही विकृती समस्याग्रस्त पानापुरतीच मर्यादित असते. त्याचा संसर्ग इतर पानावर होणार नाही. तसेच तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या संपते.
- आडसाली हंगामातील पिकामध्ये आणखी काही दिवसानंतर वाड्याच्या कोवळ्या पानावर 2 ते 3 इंच रुंदीचे आडवे पट्टे ऊसाच्या समान उंचीवर आढळून येण्याची शक्यता आहे. या विकृतीस बँडेड क्लोरोसिस/कोल्ड क्लोरॉसिस असे म्हणतात. पानावरील पांढरे किंवा हिरवट, पिवळसर पट्टे ही विकृती कोणताही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे त्याचा प्रसार होणार नाही. या समस्येमुळे पिकाचे नुकसान होणार नाही. पानावरील पट्टे हे समस्याग्रस्त पानापुरतेच मर्यादित असतील.

अति थंडीत ऊस पिकासाठी करावयाच्या उपाययोजना
- साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील प्रभावित झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करावे. जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सोयीचे होईल.
- पूर्णपणे पाने वाळलेल्या पिकाचा खोडवा राखण्यास हरकत नाही. वाळलेल्या पिकाची जमिनीलगत धारदार विळ्याच्या सहाय्याने कापणी करावी. कापलेल्या ऊसाच्या बेटावर कार्बेन्डाझिम 15 ग्रॅम आणि इमिडाक्लोप्रिड (17.8%) 5 मिली प्रति 15 लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
- नियमित खत मात्रेव्यतिरिक्त एकरी 100 किलो युरिया खताची ज्यादा मात्रा शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमिनीतून द्यावी.
- पाचट राखलेल्या शेतात पाचटावर युरिया एकरी 50 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून पिकाला द्यावे. पाचट लवकर कुजण्यासाठी पाचट कुजवणारे जिवाणू संवर्धकाची फवारणी करावी किंवा शेणखतात मिसळून पाचटावर पसरावे.
- पिकाचे वय 2-3 महिने झाल्यावर मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची फवारणी करावी.
- पाचट कुट्टी केलेल्या खोडव्यात दातेरी कुळव किंवा बळीनांगराने जमीन भुसभुशीत करावी. रिझरने भरणी/मोठी बांधणी करू नये. मोठी बांधणी करावयाची असेल तर ती पिकाचे वय 3 ते 3.5 महिन्याचे असावे.
- ज्या पिकाची पाने वाळलेली नाहीत अशा पिकावर मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची शिफारसी प्रमाणे फवारणी करावी.
- सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांच्या मात्रा खोडवा तसेच लागण पिकास शिफारशीनुसार किंवा माती परीक्षण अहवालानुसार द्याव्यात.
- ज्या शेतकऱ्याकडे विहीर किंवा कुपनलिकेची सुविधा आहे, त्यांनी नदीतील पाण्याऐवजी विहीर किंवा कुपनलिकेच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.
- चुनखडीयुक्त जमिनीत केवडा तसेच थंडीमुळे वाळण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते. ही समस्या टाळण्यासाठी झिंक, फेरस तसेच मँगेनीज ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतात मिसळून द्यावी किंवा फवारणीद्वारे द्यावीत. यासाठी व्ही.एस.आय. निर्मित मल्टीमायक्रोन्युट्रीयंटचा वापर करावा.
- या पुढील काळात पीकास जैविक तसेच अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी व्ही.एस.आय. निर्मित वसंत ऊर्जा या कायटोसायनिन युक्त उत्पादनाचा वापर 5 मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी द्वारे केल्यास उन्हाळ्यात जास्त तापमान, तसेच संभाव्य किडी आणि रोगास प्रतिकारक्षमता वाढेल.
… डॉ. गणेश कोटगिरे
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी(बु.), जि.पुणे
1 thought on “Chilling effect on sugarcane वाढत्या थंडीचा ऊस पिकावरील परिणाम”